कालच्या बसवाल्याने दिलेला धडा न विसरता आम्ही आज झटपट तयार होऊन वेळेआधीच खाली येऊन बसलो. ठरलेल्या वेळी बस आली, आम्ही निघालो.
आजच्या प्रवासात सिनिक ट्रेंन आणि सिनिक स्काय रेलचा प्रवास होता. काही मिनिटांतच आम्हाला एका लुटूपुटूच्या पण गोंडस रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आलं. जुन्या काळातलं लाकूड आणि रॉट आयर्नच सुबक स्टेशन. इथल्या सगळ्याच गोष्टी कौतुकास्पद. छोटासाच कॅफेटेरीया, वेटिंग बेंचेस. रेल्वेच्या डब्यातच रेस्टॉरंट् थाटलेलं. लहानांपासून मोठ्यांनाही मौज वाटणारं ठेसन. फोटो काढत कॉफी पिऊन होत नाही तो ट्रेन आली. जुन्या पद्धतीची रुबाबदार ट्रेन. सगळाच भातुकलीसारखा मामला.
कू..करत रेल्वे निघाली वळणावळणाने डोंगर काबीज करत. लगेच अटेंडटने या रेल्वेचा इतिहास सांगायला सुरुवात केली. आसपासच्या झाडांची, डोंगरांची देखील माहिती दिली. मग थोड्या अंतरावर ही रेल्वे आम्हाला एक धबधबा दाखवण्यासाठी थांबली. दहा मिनिटांचा ब्रेक. दूरवर दिसणारा, महाकाय खडकातून कसाबसा वाहणारा सुमार धबधबा. घोर निराशा झाली. कुरांदा येईपर्यंत पुढच्या प्रवासात भारतातील टॉय रेल्वेज आणि धुवांधार धबधबे याचच गुणगान आम्ही गायलं. खरंच आपल्याही कडे केवढं नैसर्गिक सौंदर्य आहे पण आपल्याला त्याचं सुखसुविधांसह मार्केटिंग करणं जमत नाही.
छ्या...टीप..टीप पाडणारं पाणी आणि धबधबा म्हणे. इथे येऊन चूक केली की काय असं वाटायला लागलं. आपलं माथेरानचं जंगल आणि रेल्वे आठवायला लागली नाही तोच कुरांदा स्टेशन आलं. परत एक सुबक, गोंडस आणि टापटीप स्टेशन. कुरांदा म्हणजे एॅबओरिजिनल्सचं वास्तव्य असलेलं डोंगरमाथ्यावरच टुमदार गाव. पण दुर्दैवाने इथे मार्गदर्शक नव्हता त्यामुळे आमचे आम्हीच विचारपूस करत निघालो. डोंगरांवरचे चढ उताराचे पण सुबक रस्ते, पाथवेज, लाईनशीर दूकानं...एका पेक्षा एक सुरेख क्राफ्टी गोष्टींनी भरलेली. शॉपिंगला मजा येणारे इथे. चौकाचौकात पिंजारलेल्या केसांचे व तांबारलेल्या डोळ्यांचे एॅबओरिजिनल्स चकाट्या पिटत बसलेले. पैशांच्या अपेक्षेने एकजण डिजीरीडू वाजवत बसलेला पाहून अस्मादिकांची नजर निवली.
दर्दी ओळखून त्यानेही तडफेने ते वाद्य वाजवून दाखवले. त्याच्या टोपलीत पैसे टाकून पूढे गेलो. इथे फुलपाखरांचही मोठं गार्डन आहे. Koalas चीही sanctuary आहे, एॅबओरिजिनल्सचं एक्सक्लुसिव्ह मार्केट पण आहे. तुमचं तुम्ही शोधा आणि फिरा हा खाक्या. ग्रुपमध्ये असलात की प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे असतात, त्यामुळे वेळेचं गणित जमवणं अवघड असतं. तरी आम्ही एकमेकांच्या टप्प्यात रहात वैयक्तिक आवडीनूसार फिरलो.
कुरांदा या गावाला एक वेगळाच जंगली वास आहे. इथली झाडं-झुडपही फार युनिक वाटली. प्रत्येक कोपऱ्यात एखादं वेगळंच झाड नजरेस पडे. तशीच ती स्टीलमधे बनवलेली आकर्षक शिल्प पण.
का कुणास ठाऊक पण इथे काळ थांबल्यासारखा वाटतो. इथल्या हिरव्या दमट वासात खरंच एक जादू आहे. फारसं ठोस काही बघण्यासारखं नसलं तरी पाऊल निघत नाही इथनं. निदान मला तरी इथे दोन दिवस राहून सगळे प्रहर अनुभवायला, एॅबओरिजिनल्स बरोबर चकाट्या पिटायला, जंगल पायतळी तुडवायला नक्कीच आवडेल. पण कंडक्टेड टूर म्हणजे सतत धावणं, पाहाणं आणि संपवणं. वैताग आला तर या धावण्याचा. तरी धावलोच. भराभर थोडंफार शॉपिंग केलं. मुख्य म्हणजे डिजिरिडू घेतलं. तरीपण ब-याच गोष्टी राहूनच गेल्या घ्यायच्या. धावत-पळत सिनिक स्कायरेल गाठली. आकाशातून खालचं जंगलं वरुनच टिपलं. एका ठिकाणी उतरलो. थोडासा डिझाईन्ड वॉक घेतला. लंबेतडांग झाडं, वेली, फर्नस्, पामस् पाहिले. रेन फॉरेस्टची जीवनसाखळी समजून घ्यायचा प्रयत्न केला. जितकं पहात गेलो तितकं कळत गेलं की आपण फार वरवरची झलक पहात आहोत म्हणून. जगातलं एक वेगळं जंगल अनुभवायला वेळ पाहिजे. निदान आठवडाभर राहून ही जंगलं पायतळी तुडविली पाहिजेत असं प्रकर्षाने जाणवलं. अर्थात अशा जंगल ट्रेक्सचे, वॉक्सचेही टूर्स इथे असतात. आपल्या मानसिक, शारिरीक आणि आर्थिक क्षमतांचा अंदाज घेऊन तिथपर्यंत आधीच पोचता आलं पाहिजे. असो.
जे पहायला मिळालं याचं समाधान मानायचे का जे निसटलं त्यांची चुटपुट लावून घ्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न. परत स्कायरेलमधे स्थानापन्न झालो आणि परतीला लागलो. स्कायरेलने रेल्वेस्थानका जवळच उतरलो. परत बस मधे बसलो आणि अपार्टमेंटवर परतलो.
रेल्वेस्थानकजवळच एॅबओरिजिनल्सचा नाच बघायची सोय आहे. त्यांची आर्ट तुमच्या शरीरावर, चेह-यावरही रंगवून घ्यायचीही सोय आहे. पर्यटकांना आवडतील अशा अजूनही ब-याच गोष्टी इथे आहेत. पण वेळ आणि पैशाच गणित जमवणं अवघड आहे. इथे प्रत्येकच गोष्ट खूप महाग आहे. आणि खर्च करुन परत सगळा शोकेसी डेमो. ओरिजनल काहीच नाही. या तकलादू मार्केटिंगचाही वैताग आला. जे पाहिलं ते उत्तम होतं अशी स्वत:चीच समजूत घातली आणि शांत चित्ताने निद्राधीन झाले.
No comments:
Post a Comment