Friday, 14 December 2018

ऑस्ट्रेलिया ट्रिप...५, दि ग्रेट बॅरियर रिफ. केर्न्स,

कंडक्टेड टूरबरोबर इथलं साईट सिंईग होतं. सकाळी बहुदा आठ वाजताचा पिकअप होता. स्वतंत्र घर, स्वैपाकघर..चहाचे रतीब जरा रेंगाळलोच. खाली उतरायला ५मिनिटं उशीर झालेला. बसवाला २ मिनिटांची वाटपाहून निघून गेला.
झालं !
कुठे जायचं माहित होतं पण अंतर, पुढची कनेक्टीव्हीटी काहीच माहीत नव्हती. लगेच सामुहिक 'चर्चा' करुन टैक्सीने त्या बसला गाठायच नसता पुढच्या डेस्टिनेशनपर्यंत टैक्सीनेच जायचं ठरवलं. पर्यायच नव्हता. पुढची बुकिंग्ज कोलमडली असती. टैक्सीसाठीची फोनाफोनी होईपर्यंत आम्हाला न्यायला दुसरी बस आली आणि आम्ही अक्षरशः सुस्कारा सोडला.
टूर ऑपरेटरच्या सौजन्याने भारावून जाऊन वेळेच्या बाबतीतला घ्यायचा तो धडा आम्ही मनोमन घेतला आणि प्रवासाला सुरुवात झाली. माझं होमवर्क फारसं झालेलं नव्हतं, पण पल्ला दूरचा होता. उजव्या हाताला, अगदी हाकेच्या अंतरावरच निळाशार साऊथ पॅसिफिक ओशन तर डाव्या हाताला घनदाट जंगल. इथली जंगली वनस्पतीही वेगळीच आहे. अगणित प्रकारचे पामस्, विविध फुलझाडं, झुडपं..मला तर अगदी हरखून गेल्यासारखं झालं ती अनोखी दमट हिरवाई बघून. हा सगळा ट्रॉपिकल रेन फॉरेस्टचा भाग. उंचच उंच झाडं, त्यांची रुपंही वेगळी. तास-दिडतास कसा गेला कळलही नाही. बस पोर्ट डग्लसला थांबली आणि लगेच आम्ही एका मोठ्या बोटीवर चढलो. दोनेकशे लोकांना सामावून घेणारी बरीच मोठी बोट.
चहा-कॉफी-बिस्किटांची मोफत(म्हणजे ऑलरेडी पेड) सोय, अद्ययावत वॉशरुम्स आणि चहूबाजूंनी निळभोर आकाश आणि निळाशार समुद्र.
वेगाने बोट निघाली. या आसमंतीय निळाईत बोटीच्या पाणी कापण्याने उडणारे तुषार अक्षरशः हि-यांसारखे दिसत होते. एक अतिव सुखाची सकाळ अनुभवत होतो. डेकवर उभं राहून काना-नाकात भन्नाट वारं भरुन घेत होतो, डोळ्यांनी ती अपूर्व निळाई पित होतो आणि सदर्न हेमिस्फियरच्या उन्हानी शरीर शेकत होतो.
हाही प्रवास तासाभराचा. बघता बघता समुद्रातलं डायव्हिंग स्टेशन आलं आणि एकच गडबड उडाली. पटापट उतरलो आणि जथ्याने डायव्हिंग सूट घालायला पळालो. एॅक्चुयली हे समुद्रातलं मानव निर्मित स्टेशन भरपूर मोठं आणि दणकट आहे. डायव्हिंग सुटस, लाईफ जॅकेट, फ्लिन्स्, स्नॉरकेलिंगच कीट याची इतकी व्यवस्थित वर्गवारी करुन ठेवली होती की खरंतर गोंधळ व्हायचं कारणं नाही तरीही गोंधळ होतो, झाला. एकीकडे जेवणाचा बुफे लागलेला असतो, दूसरीकडे ही धावपळ असते. तरीही १५-२० मिनिटांत कपडे बदलून, डायव्हिंग सुट घालून सगळे तयार झालो. काढलेले कपडे तिथेच ठेवायचे. पण व्हॅल्युएबल्ससाठी मात्र ठराविक जागा होत्या. मग परत गोंधळ. पासपोर्ट, पैसे, दागिने..आपली एक भानगड असते का ?🙄
वेळीच तयार होऊन डाईव्हिंग स्टेप्सवर जाऊन बसलो. इथे गाईड करणारे बरेच संयमी असतात. पुन्हापुन्हा शंकानिरसन करतात. तरीपण नाकावर मास्क घालून तोंडाने श्वास घेणं जमेपर्यंत जीव घाबरा होतोच. परत गार पाण्यातली उडी. तिथेही बरेच जणं कचरतात. खरं अवघड काहीच नसतं. पण हे काठावर बघून समजणं शक्य नसतं.
मला पोहता येतं त्यामुळे मला पाण्याची तशी भिती नव्हती, पण ते नाक बंदनी जीव घाबरा झाला. पण मारलीच उडी. स्नाॅर्केलिंग करताना तुम्ही पाण्यात डोकं बुडवू शकता पण पुर्णपणे पाण्याखाली जायचं असेल तर ते या सामुग्रीने शक्य होत नाही. त्यासाठी स्कुबा डाईव्हिंगचा ड्रेस घातला पाहिजे. मी स्कुबाच करायला पाहिजे होतं हे मला हा अनुभव घेतल्यावर कळलं. असो.
छातीभरुन श्वास घेतल्यावर डोकं-चेहरा पाण्यात बुडवायचा आणि पाण्याखालचं एक अनोखं विश्व न्याहाळायचं. सुखनैव भ्रमंती करणारे लहान-मोठे रंगबिरंगी मासे, आतल्या लवचिक वनस्पती, कोरल्स (?) जे दिसतं ते प्रथमदर्शनी अविश्वसनीय वाटतं. अक्षरशः जीव हरखून जातो. एका अद्वितीय जगाची झलक आपण बघतो आणि मग, वेड्यासारखे बघतच जातो.
घे श्वास की बुडव डोकं आणि बघ ते चैतन्यदायी विश्व. एक नादच लागतो पुन्हा पुन्हा डोकं बुचकळायचा आणि पाण्याखालचं अनोखं विश्व न्याहाळायचा.
साधारण एक २०-२५ हजार स्क्वेयर फिटचा दोरीने कन्फाईड एरिया असतो. दोरी पकडत पुर्णपणे चौकोन तुम्ही फिरावं ही अपेक्षा असते. काॅन्फिडन्स वाढला आणि तंत्र जमलं की काहीही अवघड नाही. अस्मादिक पुर्ण चक्कर मारुन आले.
अक्षरशः या पृथ्वीच्या, समुद्राच्या यांची देही, यांची डोळा या अपूर्व रुपाने आपली मती गुंग होऊन जाते.
एका बजबजलेल्या कमर्शियल ठिकाणी जर हे अनोखेपण असेल तर अजून अंतर्गत शांत समुद्रात तर कीती विस्मयकारी चमत्कार असतील ?
परमेश्वरा...एक जन्म अपूरा आहे रे बाबा!
कीतीही भान हरपलं तरी वेळेचं गणित होतंच डोक्यात. जमेल तेवढं हे विश्व बघून वर आले तर एक पारदर्शक बोट सफरीला निघतच होती. आमची मंडळी आधीच पोहोचली होती तिथे. आम्ही दोघंही धावतपळत पोहोंचलो. बोटीचा तळं आणि पाण्याखालच्या बाजू ट्रांसपरंट होत्या त्यामुळे मनसोक्तपणे हे पाणविश्व पहायला मिळाले. लाईव्ह कमेंटरी पण होतीच. या फिरस्तीत विविध प्रकारचे, रंगांचे एकांडे मासे, टोळी मासे, कासवं आणि शार्क मासा ही दिसला. जमेल तसं बघणं आणि फोटो काढणं चालूच होतं तरीपण क्रेपच्या उडणा-या झिरमिळ्यांसारखी लवचिक वनस्पती नाही टिपता आली याचा खेद अजूनही होत आहे.
हा टूर आटोपून वर आलो आणि लगेच जेवणाकडे वळलो. इतक्या अंतर्गत समुद्रात व्हेज जेवणाकडून फार अपेक्षा नव्हतीच. तरीपण सलाडस् बाजी मार गये. मला काय आवडलं असेल तर आवळ्याच्या आकारातले वाफवून व्हिनेगरमधे मॅरिनेट केलेले बीटरुटस्. अहाहा..काय चव होती त्या बीटरुटसची. अप्रतिम !
नंतर पण मॅरिनेटेड ऑलिव्हज् आणि काकड्या खाल्ल्या पण बीटरुटसना तोड नाही. ऑस्ट्रेलियात येऊन व्हिनेगरमधल्या मॅरिनेटेड गोष्टींच्या तर मी प्रेमातच पडली आहे. बस्स, आता परतल्यावर वेळ मिळाला की याच्याच मागे हात धुवून पडायचं आहे.

परत फटाफट तो चिपकू डायव्हिंग ड्रेस (मदतीने)बदलला, सामान जमवलं आणि बोटीवर परतीच्या प्रवासासाठी निघालो. सगळे थकलेले पण दिग्मुढ झालेले या अनुभवामुळे. अंतर्मनापर्यंत पोहोचणारा एखादा अनुभव आला की मला शांत बसायला आवडतं. अबोलपणे मी पुन:पुन्हा त्या अनुभवाभोवती रुंजी घालत बसते, चर्या भावलेल्या अनुभवाला मनोमन शब्दबद्ध करते.
In short I love to ponder about it in solace.

एकटीच बसले. समोर अथांग समुद्र. त्याच्या अथांगपणात आज काही बुड्या मारुन आलेली मी.
केवढं अथांग निसर्गरुप आहे या भुतलावर. आपण भुतळीच्याच रुपानी चकीत होतो. पृथ्वीवर ७० टक्के पाणी आहे. काय विस्मयकारी विश्व असेल तिथे ?

परतीला जरा कंटाळवाणं झालं. मग बोटीच्या समोर एकटीच जाऊन बसले. पाहिलं तर तिथे या विश्वाची माहिती देणा-या पुस्तकांची थप्पी. एक जाणकार पुस्तक हाताळतोय. बसले त्याच्याशी बोलत. अभ्यासक, शोधक अजून दूरवर जातात समुद्रात बुडी मारायला. पृथ्वीवरची ही ग्रेट बॅरियर रिफ ही सुजाण मानवाला अजूनही एक चॅलैंजच आहे. ऑस्ट्रेलियाच्या ईस्ट किना-यावर ही रिफ सलगपणे जवळपास २००० किलोमीटर पर्यंत पसरली आहे. दुस-या महायुद्धाच्या वेळी बरीच नष्ट झाली. पण आता तिचं अनन्यसाधारण महत्त्व जाणून या रिफच्या संवर्धनाचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत.
या रिफ शिवाय या किनाऱ्यावर अनेक लहान-मोठी बेटं आहेत. एकेक ऐकत गेले आणि अजून किती मोठं विश्व बघायचं राहिलय याचा अंदाज आला. पुस्तकं चाळली. आपण जे पाहिलं ते अक्षरशः चिमुटभर तोंडी लावण्यापेक्षाही फार कमी आणि जुजबी होतं हे कळलं. Yet there's so much to see and explore. असो. फार वाईट वाटून घ्यायचं नाही. इथवर आलो नसतो तर हेही विश्व अनभिज्ञच राहिलं असतं नाही का ?

पोर्ट डग्लसला बोट पोहोचली. दूपार सरत आहे. धावतच बस पकडायची होती. परतीचे रस्ते खचाखच भरलेल्या सोविनियर्सच्या दूकानातूनच सहेतूक जातात. पण वेळच हातात नसतो. जाताना लक्षात न आलेली गोष्ट लक्षात आली. हे डग्लस पोर्ट अतिशय देखणं आहे. जगावेगळ्या बोटींनी ठासून भरलंय. ग्रेट बॅरियर रिफचा सखोल शोध घेणा-यां साठी, अभ्यासकांसाठी ही काशी आहे.
आपलं हे झुंडीने धावत येणं..वरवर बघणं काही खरं नाही. एक हूरहूरच लागली जीवाला हे पोर्ट सोडताना.
परतल्यावर भारतातली स्कुबा डायव्हिंगची ठिकाणं शोधली पाहिजेत असा बेत मनोमन करत बसमधे बसलो आणि मार्गस्थ झालो.

No comments:

Post a Comment