Thursday, 13 December 2018

ऑस्ट्रेलिया ट्रिप...४, केर्नस.

आज ऑस्ट्रेलियातल्या उत्तरेकडच्या केर्नस या शहरासाठी उड्डाण होतं. ऑस्ट्रेलियातल्या बहुरुपी क्विन्सलॅंड राज्यातलं हे गाव. सिडनी पासून बरंच दूर आहे. इक्वेटरच्या जवळ असल्यामुळे वैविध्यपूर्ण घनदाट जंगलं, दमट हवामान आणि जगप्रसिद्ध ग्रेट बॅरियर रिफसाठीचं मोक्याच समुद्र किना-या लगतचं सुप्रसिद्ध ठिकाण.
जाऊन येऊन ५ दिवसाचं वास्तव्य होतं इथे. अपार्टमेंटच रेंटवर घेतलं होतं. पोहंचेस्तवर दूपार उतरणीला लागली होती. झटपट चहा घेऊन इथल्या नाईट मार्केटसाठी पायीच निघालो. पायपीटीचा त्रास झाला तरी पायी फिरुन एखादं गाव जेवढं बारकाव्याने कळतं तेवढं कशानीच कळत नाही. म्हणजे रस्ते सुखावह असले तरी पण चालायच्या यातायातीला पर्याय नाही. निदान ऑस्ट्रेलियात तर नाहीच नाही. ती तयारी असेल तरच कुठल्याही प्रवासाला निघावं नसता घरीच बसावं.🤔

छोटेखानी आटोपशीर सुबक गाव. रात्र पडता सुस्तावलेलं. तरीही झगमगाटाचा मागोवा घेत पाय मोकळे करत नाईट मार्केटकडे निघालो. रेखीव, सुनसान रस्ते, दुतर्फा झाडी तिही चक्क आपल्या परिचयाची. एकेक झाड अंधारातही ओळखत गेलो आणि चकीत झालो. गुलमोहर, सदाफुली, वड फैमिलीतले वृक्ष, एग्झोरा, बसावा, मुसांडा, चाफा, पेल्टोफोरम, स्पॅथोडिया, शिरीष अशी एक ना अनेक झाडं आपलीच. शोध घेत चालताना मजाच आली.😊

छोटासाच पण झगमगीत रात्र बाजार. रेस्टॉरंट्स, कॅफेज्, बार्स, निरनिराळ्या रंगबिरंगी, अनोख्या वस्तूंची दूकानं. हरखून गेलो. छोटे छोटे सोवेनियर्स, लाकडी, कापडी, काचेच्या वस्तू, दागिने, पर्सेस इत्यादी खच्चून भरलेली दूकानं. आपल्या हत्ती-उंटांचे प्रिंट्स असलेले कपडे, चादरी, स्टोल्स देखील ढीगांनी होते. पण सगळ्यात अचंबित कशाने झाले तर कांगारुंची, वालाबीजची कातडी सर्रास विक्रीला होती. आणि नुसती कातडीच नाही तर मगरींची कातडी, पंजे, जबडे, बेडकांची चपटी शरीरं आणि त्यापासून बनवलेल्या असंख्य विविध वस्तू अगदी राजरोसपणे विक्रीला होत्या. लोकही निर्धोकपणे विकत घेत होते. आफ्रिकन हेयर स्टाईलिंगची सलून्स, मसाज सलून्सही जागजागी होती. छोटेखानी रेस्टॉरंट्स मधला मासे आणि तत्सम मासांचा वास त्रासदायक वाटत होता. ऑस्ट्रेलियाभर थाई, मलेशियन, चिनी लोकं भरपूर आहेत त्यामुळे इथला मांसाहार आपल्या कल्पनेपलिकडला असतो.
पावला गणिकच्या सुवासिक कॉफीच्या दरवळालाही हा वास भारी ठरतो.
एॅबओरिजिनल्सच्या कलाकृतींचीही दूकानं होती. पण पहिल्याच दिवशी खरेदीचा घाट नको म्हणून फक्त विंडो शॉपिंगवरच भर दिला. पण इतकं रंगबिरंगी आणि रसरशीत मार्केट बघून बरं वाटलं. इतक्यात अपरिचीत आवाजातलं मराठी कानावर आलं.😁
केसरीवाल्यांचा ग्रुप आला होता. ग्रुपमधला हमखास 'हरवाहरवीचा' आणि 'आपण यांना पाहिलंत का'चा पर्यटनातला यशस्वी खेळ इथेही चालू होता.
🙈🙉🙊
बहुतांश लोक मुंबईचे होते. अग्ग बाई, अरेच्याच्या ह्रद्य देवाणघेवाणी आमच्याशी करुन ती मंडळी उर्वरीत शोध कार्याला लागली आणि आम्हीही परत रमत-गमत झाडाझुडपांचा धांडोळा घेत रुम्सवर परतलो.☺️

उदया सकाळी ग्रेट बॅरियर रिफसाठी निघणार आहोत.😍
परवाच्या दिवशी कुरांदा सिनिक व्हिलेजची टूर आहे आणि तेरवा डेंट्री ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ची टूर आहे. मेट्रोपॉलिटन ठिकाणांहून ही ठिकाणं वेगळी असणार आहेत ही कल्पना होती तरीही प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर या ठिकाणांनी मनामधे जी अनन्य साधारण जागा पटकावली ती शेवटपर्यंत राहीली.

Cairns is THE Australian place for nature lovers, learners and researchers.
Never ever miss it !

No comments:

Post a Comment