Thursday, 13 December 2018

ऑस्ट्रेलिया ट्रिप...३, सिडनी. कियामा बिच-ब्लो होल.

गुगलवरती सिडनीतील प्रेक्षणीय स्थळं शोधली की इतकी भली मोठी लिस्ट येते की जीवच दडपून जातो. अक्षरशः महिना सुध्दा कमी पडेल इतक्या विविध गोष्टी आहेत पहायला. मग त्यातल्या त्यात आपली आवड बघायची आणि निघायचं.

२०० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलिया एक आडबाजूचं पुर्णतः अनोळखी महाकाय बेट होतं. युरोपियनांनी या बेटाचा शोध लावला, इंग्रजांनी आपले क्रिमिनल्स इकडे शिक्षा म्हणून पाठवून दिले. इथल्या स्थानिक एॅबओरिजिनल्सना दडपशाहीने नेस्तनाबूत केलं, वसाहती वसवल्या मग सोन्याच्या खाणींचा शोध लागल्यावर तर ऑस्ट्रेलियाच नशीबच फळफळलं.(?) त्यामुळे इथे साधारणतः इंग्लिश कल्चरच आहे. पण नवा देश असल्यामुळे फारशा जुन्या, पुराण्या ऐतिहासिक गोष्टी इथे सर्रास पहायला मिळत नाहीत. जुनं पुराणं आहे पण ते एॅबओरिजिनल्सचंच. पण सद्य परिस्थितीत ते लोकं फार काही प्रवाहात नाहीत. त्यामुळे इथली प्रेक्षणीय स्थळं म्हणजे जी भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत ती किंवा जी परकीयांनी बांधली, उभारली आहेत तिचं.

ऑस्ट्रेलिया हा महाकाय खंड आणि देश इतर जगता पासून, भुमी पासून लाखोंवर्षांपूर्वीच दूरावलेला आहे त्यामुळे इथली वैविध्यपूर्ण नैसर्गिक ठिकाणं, भौगोलिक ठिकाणं, प्राणीजगत, वनस्पती इतक्या युनिक आहेत की सर्वांगिण ऑस्ट्रेलियाची अगदी तोंड ओळख करुन घ्यायची म्हटलं तरी काही वर्ष लागतील. Somebody has said, If you want see Australia thoroughly, you have to live twice.
थोडक्यात आमची आयटीनरी भारतात बसून ठरवणं हास्यास्पदच होतं. पण आमचे नातलग गेले दोन दशकांपासून इथे असल्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या.
तर आज सिडनी जवळच्याच कियामा ब्लो होल बिचवर जायचं ठरलं. झटपट सकाळीच निघालो. चहा, ब्रेकफास्ट आणि जेवण बरोबरच घेतलं होतं.

एक सुरम्य सकाळ, निळंभोर आकाश, कोवळी उन्हं, अप्रतिम रस्ते, दुतर्फा दृष्ट लागावी अशी झाडी, अधूनमधून इटुकले-पिटुकले सुबक कौलारु सुरेख घरं..the entire journey was dream like. प्रत्येक वळणावर ग्रिटिंग कार्डासारखं दृश्य.
अक्षरशः कुठे म्हणून खोटं नाही.
स्टॅनवेल टाॅपला थांबलो. हॅंग ग्लाईडिंग, पॅरा ग्लाईडिंगसाठी ही जागा लोकप्रिय आहे. उंचावरुन दिसणारा निळाशार साऊथ पॅसिफिक ओशन, खाली खळाळता बिच, एक दोघं सर्फिंग करताहेत. एवढं लोभस ठिकाण पण कुठेही गजबज नाही, कलकलाट नाही. नजरेत भरावी अशी स्वच्छता. भिकारी नाही, फुटकळ विक्रेते नाही, ठोक दुकानं नाहीत. समुद्र वारा भरभरून घेतला, एक सुरेख निसर्गदृश्य नजरेनीच प्यालो आणि स्टॅनवेल बिचवर निघालो. पुन्हा स्वच्छतेची, टापटीपीची तिचं सुखद कहाणी. प्रशस्त पार्किंग, मुलांसाठी खेळणी, जेवणासाठी एक शेड, तिथेच दोन-चार बांधीव टेबलं, काही बेंचेस. आपापलं जेवण आणायचं. जेवायचं आणि जाताना परत सगळं स्वच्छ करुन जायचं. जवळच भलेमोठे गार्बेज बिन्स ठेवलेले. संपूर्ण परिसर शांत, निरव.
हीच कथा वाॅशरुम्सची. जाऊ तिथे, थांबू तिथे अपटूडेट वाॅशरुम्स. इथल्या सगळ्या यंत्रणा बेमालूम कार्यरत. भरपूर पाणी-टिश्युज्, हॅंड ड्रायर्स, पेपर टॉवेल्स, वेस्ट बिन्स पण आरसे मात्र कुठेही नाहीत. इतक्या एकांतात लक्ष ठेवायला कुणीही नाही तरीही सगळीकडे टापटीप. जो तो जबाबदारीनेच वागणार.
भारतातली लाज घालवणारी बसस्थानकांवरची, पर्यटनस्थळांवरची सार्वजनिक शौच्चालयं आठवली.

शेडमध्ये आम्ही झकास ब्रेकफास्ट केला आणि बिचवर गेलो. अगदी निर्मनुष्य पण नितळ किनारा.
फेसाळ लाटा पायावर घेतलेल्या, फोटो काढले आणि निघालो तर एका बसमधनं १५-२० जख्ख म्हाता-यांची ट्रिप आली होती. आल्या आल्या त्यांनी शेडचा ताबा घेतला. आम्ही टेबलं स्वच्छ करुन दिली तर आमच्यावर थॅंक्यू, थॅंक्यूचा मारा सर्वांनीच केला.

इथून पुढे कियामा बिच, ब्लो होल या ठिकाणी गेलो. खडकाळ बिच पण ऐसपैस पसरलेल्या निळ्याभोर पॅसिफिक समुद्रानी वेड लावलं. इथे एका खडकाला मोठं भगदाड पडलेलं आहे त्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटा रोंरावत या भगदाडी खडकावर आपटतात आणि भगदाडातनं एक जोरदार पाण्याचा फव्वारा वर उडतो. अतिशय सुंदर दृश्य. ओहोटीला जरा जोर कमी असतो. तरी निसर्गाची गंमत वाटली. आणि त्या गमतीचं अप्रुप वाटून घेणा-या मानवाचही कौतुक वाटलं. खडकावर पाणी आपटण्याचा घनघोर आवाज आणि तृषार्त फवारा वर उडण्याचं  दृश्य नजर खिळवून ठेवतं. भरदुपारी तर उन्हाची किरणं पडून या फवा-यात इंद्रधनुष्यही लपंडाव खेळताना दिसत रहातं.

Absolutely picture perfect nature !
One of the best outings in Australia.
मस्त खडकांवरनं फिरलो, ब्लो होलचा आनंद घेतला, घरच्या पदार्थांवर ताव मारला, हिरवळीवर बसून मनसोक्त गप्पा मारल्या, मी एक स्केच पण केलं.
एक लक्षात आलं इथे स्ट्रे डॉग्ज हा प्रकारच अस्तित्वात नाहीये. त्यामुळे कुठेही पंगत बसली तरी कुठलाही प्राणी आसपास घुटमळत नाही, गार्बेजेस चिवडत नाही. पण समुद्र पक्षी मात्र ऑस्ट्रेलियन शिस्तीला न जुमानताच जिथे तिथे जरा त्रासच देतात. गंमत म्हणजे इथले कावळे फार काळेकुट्ट असतात आणि ओरडतातही घसा बसल्यासारखे. लेमन कलरचा तुरा आणि पंख असलेले कबुतरांसारखे पांढरे कॉकाटू (cockatoo) इथे सगळीकडे दिसतात. रंगबिरंगी पोपटही भरपूर आहेत इथे. पक्षी, प्राणी आणि वनस्पतींच इतकं युनिक वैविध्य आहेना इथे की अभ्यासकाला एक जन्म देखील अपूरा पडावा.

परतताना अजून दोन ठिकाणं बघायची होती म्हणून लवकरच उठलो. परतीला लागलो. डावीकडे निळा शांत समुद्र तर उजवीकडे वैविध्यपूर्ण झाडी आणि दर फर्लांगावर उन्मुक्तपणे फुललेला जॅकरंडा. कितीही फोटो काढले तरी नभीच्या निळाई वर जॅकरंडाचं वारेमाप फुललेलं जांभळं रुप पकडताच यायचं नाही. पण इथल्या जॅकरंडानी घरची आठवण मात्र दिली. हिरण्यला जी काही पहिली झाडं लावली आहेत त्यात चार दोन जॅकरंडाही आहेत. अजूनही ती झाडं आहेत. माफकच वाढली आहेत आणि मोजकीच फुलतात. आम्हाला त्याचंही कवतिकच आहे हो ! पण इथल्या जॅकरंडाच्या फुलण्याला तोड नाही. समुद्र किना-या लगत टुमदार घरं. घरासमोर फुललेल्या बागा, लंब्या गाड्या, पोर्टेबल बोटी, कॅरॅव्हॅन्स...सुखाची सर्व साधनं दारोदारी आहेत पण माणूस कुठेही दिसत नाही. वा कुठेही त्याची चाहूल देखील लागत नाही. इथली माणसं प्रायव्हसी फार जपतात. दिवेलागणीला घरातले दिवे लागले की पडदे ओढलेच पाहिजेत हा पायंडा. घरं फार जवळ-जवळ पण नको असतात. आधीच इथली लोकसंख्या कमी त्यात देश अवाढव्य, त्यात परत हा प्रायव्हसी जपण्याचा खाक्या. आपल्यासारख्या तहहयात सार्वजनिक आयुष्य जगणा-यांना हे अगम्य वाटू शकतं.
असो तर पुढची दोन्ही ठिकाणं बंद निघाली त्यामुळे वेळ हातात राहिला. मग वाटेवरच्या बालाजी मंदिरात डोकावलो. प्रशस्त आवार, मोठं मंदिर. भारतातनं कारागिर आणून बांधलेलं. इथले कामगारांच्या मोबदल्याचे नियम कडक आहेत. कष्टाला किंमत आहे. त्यामुळे भारतीय कारागिरांना भारतीय करंसीत मोबदला द्यायचा कॉन्ट्रॅक्टरचा बेत इथल्या औसी एॅडमिनिस्ट्रेशनी उधळून लावला आणि त्यामुळे मंदिर बरंच चर्चेत आलं म्हणे. मंदिर म्हणजे यथातथाच होतं. कदधारी दक्षिण भारतीय पुजारी अस्खलीत इंग्लीश बोलत होता. आरती-दानथाळीत डॉलर्स, सेंट्स पाहून खुदकन हसू आलं. दोनेक भारतीय तरुण कुटुंबही दर्शनाला आलेली. तद्दन ऑस्ट्रेलियन लांड्यालुंड्या पेहरावात. मायदेशीचे डोक्यावर कपडा घेतल्या शिवाय मंदिरात प्रवेश न देणारे नियम आठवले.
मायग्रेशनच्या रेट्यातून देवही सुटले नाहीत !
असो. बाहेरचे डवरलेले गुलाब, झाडी, त्यावरच्या कॉकाटू, पोपटांनी परिसरात जान आणली. परत एकदा टापटीप वॉशरुम्सचा सहारा घेतला आणि निघालो.

इकडे घरी रात्रीच्या मेजवान्या वाटच पहात होत्या. माझ्या या दोन दिरांकडे आणि नणंदेकडे गेल्या अठ्ठावीस वर्षात कोणी भारतातनं डोकावलं नव्हतं याचं बेदम उट्ट आम्ही पंचकडी काढत आहोत.
👴👩🧓🧑👵
एकमेकांच्या घरी आलटून पालटून रोज मेजवान्या झोडणं चाललं आहे.
एक तर बाहेर फिरवा तरी नसता पंगती तरी वाढा या थाटात आदरातिथ्य करवून घेत आहोत.🤗
At times it became very embarrassing.🙄
पण काय करता ? सुटका न त्यांची न आमची, उखळात जे डोकं घातलं ते !😜
आलीया भोगासी असावे सादर !😁
चला..म्हणा वदनी कवल घेता.....

No comments:

Post a Comment