Wednesday, 12 December 2018

ऑस्ट्रेलिया ट्रिप...२, सिडनी.

ऑस्ट्रेलियातला आमचा दौरा बराच दीर्घ होता. दौ-याच्या मधे लग्नासाठी म्हणून पाचेक दिवस ठेवले होते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात दहा दिवस होते व लग्नानंतरही दहा दिवस हातात होते. त्यामुळे  सिडनी साठी वेगळे दिवस न देता अधूनमधून जमेल तसं सिडनी बघून घ्यायचं ठरलं होतं. यजमानांनाही लग्नाची तयारी होतीच.
आमची तीन घरं आहेत सिडनीत. तिनं भावंडं. तिघांचेही बंगले ५-१० किलोमीटरच्या अंतरावर. त्यामुळे सकाळी एकीकडे जेवण तर रात्री दुसरीकडे करत आमचे सिडनीतले दिवस लग्न आणि भटकंती यात कसे भुर्रकन उडून गेले कळलही नाही.

गेल्याच्या दुसऱ्याच दिवशी सिडनी बघायला नणंदेची सोबत घेऊन बाहेर पडलो. इथे ट्रेन्स-लोकल्सची तिकीटं रवीवारी बरीच स्वस्त असतात हे पथ्यावरच पडलं. नसता ऑस्ट्रेलियन डॉलर कन्व्हरटेड इंटू इंडियन मनीच्या प्रथमदर्शनी गोंधळात आम्ही घरीच मनी..मनी..सॉरी हरी..हरी करत बसलो असतो.😉

अगदी घराजवळच रेल्वेस्थानक. अगदी टापटीप, शांत. त्यात आज रविवार म्हणून तर जास्तच शुकशुकाट. सुरेख आणि सुलभपणे समजणारं ट्रेन्सच जाळं. ट्रेनमधे अत्यंत सोईच्या आणि इनोव्हेटिव्ह बसायच्या सिटस्. पाहताच जीव खुलला. सगळी स्टेशनं आटोपशीर, सुशेगात. कुठेही गोंधळ-गर्दी-आवाज नाही. जो काय आवाज होता तो आमचाच ! 😁
सिडनीतल्या मध्यवर्ती भागात फिरलो. डार्लिंग हार्बर एरियाचं नाव. साधारण चारेक किमीच्या अंतरावर सगळी नावाजलेली ठिकाणं. मधे मोठं गार्डन. मस्त हिरवळ, जागोजागी बेंचेस. मुलांसाठी खेळायचे, मोठ्यांसाठी व्यायामाचे विविध साधनं ठिकठिकाणी. कॅपिचिनो कॉफीचा दरवळ चहुकडे. एक प्रसन्न, चैतन्यदायी सिडनीतील पहिली सकाळ. भरपूर चाललो. इथेच स्थायिक झालेल्या नणंदेनी व्यवस्थित माहिती पुरवली. सगळी ठिकाणं, नियम समजावून सांगितले जेणेकरून परत एकटं फिरताना गोंधळून जायला नको म्हणून. येताना घरुनच सैन्डविचेस बांधून आणली होती. इथे बाहेर खाणं भरपूरच महाग आहे. Australia-Sydney is one of the most expensive city of the world.
मध्यवर्ती हिरवळीवर फिलिपिनो फेस्टिवल चालू होता. तसेही ऑस्ट्रेलियात चीनी, थाई, जपानी, फिलीपिनो, मलेशियन लोकांचं प्राबल्य खूपच आहे. बघू तिथे हेच लोकं दिसतात. त्यात आज त्यांचा फेस्टिवल. धूम चालू होती. खाण्यापिण्याचे स्टॉल्स, गाणी बजावणी, खेळणं..धमालच होती. हे बघून पॅडीज नावाच्या मार्केटकडे निघालो तर १२-१५ फिलिपिनो सुंद-या दिसल्या. टकाटक देशी पेहरावात. चौकशी केली तर कळलं फॅशन शो साठी तयार झालेल्या आहेत म्हणून. पॅडीज मार्केट म्हणजे फ्ली मार्केट सारखं रसरसलेलं मार्केट. ऑस्ट्रेलियन मापाने बरचस अनऑर्गनाईज्ड असणारं.
भरपूर गर्दी, ब-यापैकी कोलाहल, रंगबिरंगी देशी-विदेशी वस्तूंनी खचाखच भरलेला लोकप्रिय बाजार. पण आजचा दिवस ठावठिकाणा दाखवण्याचा होता त्यामुळे बाजार दुरुनच पाहिला, भरपूर पायपीट केली, करावी लागली. बोलबच्चन जगलरचा रोड शो पाहिला. थोडक्यात ही मध्यवर्ती जागा म्हणजे सिडनीतील हॅपनिंग ठिकाण आहे. नंतर उतरत्या उन्हात लॉंचने मॅनली हार्बरला गेलो. रात्र झाल्यामुळे तिथे न उतरताच परतलो. परतताना देखणं ऑपेरा हाऊस झगझगीत उमलत्या डिजिटल लालफुलात उजळून निघालं होतं.
चुबकणारं साऊथ पॅसिफिक समुद्राचं स्वच्छ पाणी, हवेत गुलबट गारठा, मावळतीचा सुर्य गडप करणारं गहिरं आभाळ, एकीकडे त्यावर उठून दिसणारा रेखीव हार्बर ब्रिज तर दुसरीकडे डिजिटल लाल फुलांनी झळाळलेलं ऑपेरा हाऊस आणि इतरत्र खुणावणारे लुकलुक दिवे. लॉंचमधून उतरलो तर परिसर अजूनच रसिला झालेला. तरुणाई टकाटक तयार होऊन बाहेर पडलेली. समुद्रावरुन येणारं रोमांचकारी गार वारं, देखणे तरुण, सुंदर ललना हातात हात घालून फिरताहेत, कॉफी-बियरचा आस्वाद घेत एक मनोरम संध्याकाळ अनुभवताहेत. रस्त्यावर कुणी ट्रंपेट वाजवतंय, नृत्य करतय..
अक्षरशः सिडनी तरुण होत आहे.
आम्हाला दूरचा पल्ला होता. अदलबदल करुन ट्रेनने  व घरी पोचायलाच नऊ वाजून गेले. तरी इथे रात्रीच्या आठपर्यंत रेंगाळणारा सुर्यप्रकाश असतो.
परत एकदा ट्रेनमधल्या एॅडज्स्टेबल सीट्स आणि सुखाचा प्रवास भावला. आपल्याकडे इतक्या सुविधा, टापटीप आणि खुलेपणा जागोजागी कधी दिसेल असा खंतावणारा प्रश्र्न मनाला विचारतच, भारताला पुनः पुन्हा आठवतच सिडनी मधल्या पहिल्या आणि सुरम्य दिवसाला निरोप दिला.

No comments:

Post a Comment