ऑस्ट्रेलियात मराठी पुणेकर नातलगांकडे लग्न म्हणून पाच जणांच्या टोळी कम व-हाडानी ऑस्ट्रेलियाला जायचं ठरलं. माझा पहिलाच परदेश प्रवास. उत्सुकता कम धाकधूकही होतीच. परत ग्रुप बरोबर हिंडायचं, नातलगांच्या घरात रहायचं, तेही थोडं थोडकं नव्हे तर चांगले २५ दिवस. नाही म्हटलं तरी जीवाला चिमटीभर का होईना पण घोर होताच.
पण हमपांच टोळी उत्साहाने निघालीच लग्नाला.
ऑस्ट्रेलिया म्हणजे तसा आड बाजूचा देश त्यात दूरचा पल्ला. त्यातही व्हाया दुबई म्हणजे अजून पाचेक तासांची आहुती. पण प्रत्येक क्षण काहीतरी शिकवूनच जातो हे एकदा पटलं की कशाचाही कंटाळा येत नाही. आणि एकदा उखळात डोकं घातलं की चार घाव असे तर चार घाव तसे हे समजूनच चाललं तरच काही खरं असतं.
असो.
तर आम्ही पाचजणं मुंबई एयरपोर्ट वर उत्साहाने जमलो, तिथले सगळे वेळखाऊ सोपस्कार पार पाडून विमानात बसलो आणि उडालो ते थेट अरबी समुद्र पार करुन दुबईत उतरलो.
हल्ली बरेच जणं दुबई एयरपोर्टची फार तारीफ करतात. पण मला फार काही वेगळा वाटला नाही तो एयरपोर्ट कम एक्सक्लुसिव्ह मॉल. हो मॉलच. केवढी ती चकाचक दुकानं बापरे. म्हणजे लोकं प्रवासाला निघतात का खरेदीला निघतात असा प्रश्न पडावा अशी आडमाप दुकानं आणि त्यातली गर्दी.
नाही म्हणायला काही गो-यागोमट्या इंग्रजाळलेल्या बुरखाधारी खालांनी या झगमगाटात मजा आणली. परिपूर्ण सोई-सुविधांनी युक्त असा अवाढव्य दुबई एयरपोर्ट. देशोदेशीचे माणसं इथे दुकानांवर कामं करायला. नेपाळचेच दोघंतिघं भेटले. इतका ओपननेस इथे दुबईत बघून छान वाटलं
हां..एक सांगायचंच राहिलं. एमिरेट्सच्या या विमानात आम्हाला चक्क दिवाळीनिमित्त बुंदीचा लाडू देण्यात आला. तोही झक्कास अशा लालजर्द डब्यात पॅक केलेला. चला आमच्या प्रवासाला मुहूर्तही चांगला लागला आणि सहिष्णू एमिरेट्सचही कौतुक वाटलं. वेळ काढत उगा इकडे तिकडे फिरलो. इतर गोष्टींबरोबर सोन्या-हि-यांचीही भली मोठी दुकानं चौकीत करत होती पण काहीही घ्यावंसं वाटेना, कुठेही मन रमेना.
We were more eager to reach Australia.
दुबई-सिडनी हा प्रवास फार वेळखाऊ, त्यात टाईमझोनचा डिफ्रंस. एकूणातच समजून घेतलं तर मजा होती. खाण्या'पिण्याची' रेलचेल होती तरी त्या माणसांनी, लेकरांनी ठासून भरलेल्या विमानाच कौतुक थोडक्यातच आटोपलं. बसून बसून कंटाळा आला. अर्थात समोरच्या स्क्रिनवर गाणी, सिनेमे, न्युज आणि फ्लाईट अपडेट्सची करमणूक हात जोडून उभी होती पण अस्मादिकांना असल्या गोष्टींचा भारी कंटाळा.
काही काय ? विमानात काय ते फिल्मी मुलीके परांठे आणि गाजर के हलवेयुक्त हिंदी सिनेमे पहायचे ? नशीब रिजनल लैंग्वेजमधे कोणी ए..आये वाला दादा कोंडके छाप मराठी सिनेमा नाही लावला ते.😉
तर अशा रितीने आम्ही रात्री सिडनीला पोहोंचलो. जरा सिक्युरिटी चेकिंगचा धाकच होता. लगिनघरी जात होतो त्यामुळे जरा सढळपणेच वस्तू भरलेल्या होत्या सामानात. पण बिनबोभाट सुटलो. तरी आमच्या जवळच्या पेरुच्या वासाने शंका उपस्थित झालीच. पण निभावलं.
बरेच दमलो होतो बसून, बसून. तरीही रात्रीचं सिडनी भावलं. सुरेख रस्ते, चतुरस्त्र स्वच्छता, आवाज नाही, गोंधळ नाही. आमचेही नातलग आता त्याच मुशीत घडलेले. शिस्तबध्द जगणारे.
माझ्या दिरांची कॉलनी सुरेख टुमदार, बैठ्या बंगल्यांची. सगळीकडे निरवता. एखाद्या रिसॉर्टमध्ये असते तशी झाडी, टापटीप. दिरांच घरही प्रशस्त मोठं. मागेपुढे अंगणं, सुबक बाग, आखीवरेखीव वरखाली भरपूर खोल्या. पाऊल ठेवताच मन प्रसन्न झालं. नातलगांच्या कौतुकी स्वागतात हसतखेळत भरपेट जेवलो आणि ऑस्ट्रेलियन खिडकीतून मंदपणे झिरपणारं सदर्न हेमिस्फियरचं अनोखं चांदणं पांघरुन गाढ निद्राधीन झालो.
No comments:
Post a Comment