ध्यानी मनी नसतानाही अचानकच एक निर्मळ फ्रेम नजरेसमोर येते. मानव निर्मित बांध तोही निळा, त्यातल्या गवाक्षातून दिसणारा अपरंपार अवकाशाचा एक बिलोरी तुकडा, त्यावर विहरणारे शुभ्र ढग, बागडणारे पक्षी, हिरवळीची माफकच महिरप.. तपकिरी, हिरव्या आणि निळ्यातल्या निळाईची एक प्रसन्न फ्रेम. काही बंधनातलं तर काही स्वच्छंदी. बंधनातलं स्वच्छंदीपण, स्वच्छंदीपणातलं बंधन. मनाला न भावलं तरच नवल आहे.
हल्ली त्या एमेसिबीची काय भानगड आहे कळना झालंय. कालही लाईट गेले. आजही म्हणजे आत्ता पण लाईट गेलेलेच आहेत. दिनक्रमात काही अडथळा नाही म्हणून काही वाटत नाहीये. उगा आपली शास्त्रापुरती एक मेणबत्ती लावून ठेवली आहे. पण हे काळोखात लपेटलेलं घरही नजरबंद रुपानी घायाळ करत आहे. मेणबत्तीचा जीव तो केवढा तरी पण एखाददुसरी उजळून निघालेली खिडकी कायापालट झाल्यासारखी चित्तहरण करत आहे. दिवसाढवळ्या बंद खिडकीबाहेर उपेक्षिताचं जिणं जगणारा वेल या ऐसपैस खिडकीतून किती सुरेख दिसतोय. अंधारलेल्या अख्ख्या घराचा पॉईंट ऑफ एट्रेक्शन झाली आहे ही खिडकी. फिक्कटसर झिरपणारा बाहेरचा प्रकाश आणि त्या प्रकाशातच सावलीरुपानी उजळलेला तो वेल आणि त्या अनवट सावळरुपाला टिपणारी मी.
खरंच अंधाराला का घाबरतो आपण ?
एवढ्या थोरल्या घरात या अंधारात मी एकटीच आहे असं तरी कसं म्हणू ? ही धिटुकली मेणबत्ती आहे ना सोबतीला. आणि तिच्या मंद उजेडात सौम्यपणे उजळून आपल्याला आश्वस्त करणारी ही स्वैपाकघरातली अतिपरिचित खिडकी आणि दमदार भालदारासारखा खिडकीतूनच आपल्याला निश्चिंत करणारा तो वेल.
आपल्या घरातली सौंदर्य स्थळं आपल्यालाच हाताला धरुन दाखवणारा तो पाहुणा काळोख.
आणि एवढ्या चतुरस्त्र काळोखालाही न घाबरता मिण मिण उजळलेली मेणबत्तीची ज्योत.
दिवसा उजेडीच्या वैभवसंपन्न घरात बसावंच कधीतरी असं तिन्हीसांजेला अंधार पांघरुन ध्यानाला. डोळे भरुन बघावीच ती धिटुकली मेणबत्ती आणि आजमावंच तिचं ते तेजस्वी धारिष्ट्य एकदा.
आले लाईट की गृहकृत्यदक्षतेने मारावी एक फुंकर त्या लयदार तेजावर. इतक्यावेळ लयदार नर्तन करणारी ती सायंज्योत जरा वेळ थरथरते, फडफडते आणि आपला कार्यकाल संपला हे जाणून अनंतात विलिन होते. अगदी क्षणभरच जरासा नाराजीचा धूर आणि दरवळ पसरतो आणि पुढच्या क्षणी इथे काही जाज्वल्य होते का नव्हते असा विभ्रम आपल्यालाच पडतो.
मग या भकभक उजेडात हरवते ती आपल्याला अंतर्मुख करणारी खिडकीची चौकट आणि विसरही पडतो मग त्या झिरझिरीत खिडकीतून डोकावणा-या वेलाचा देखील.
आणि इतक्यावेळ हितगुज करणारा काळोखही आल्यापावली करतो पोबारा.
उजेडाच्या साक्षीने मग आपणही म्हणत रहातो मला अंधाराची भिंती वाटते. पण खरंतर काळोखंच आपली आपल्यालाच एक गहिरी ओळख करुन देत असतो.
No comments:
Post a Comment