औरंगाबाद-पुणे रस्त्यावरचं एक नावाजलेला आणि प्रशस्त फूड जाॅईंट. तमाम कारचालक आणि शिवनेरी बसेसचा हक्काचा थांबा. स्वच्छ, नेटक्या वॉशरुम्स आणि खाण्याच्या पदार्थांच्या अनेक तरत-हा. फार थोड्या काळातच हे ठिकाण नावारुपासही आलं आणि दिवसेंदिवस महागही होत राहिलं. अगदी चारजणांच्या कुटूंबाचा जरी नास्ता आणि चहा-कॉफी घ्यायचा म्हटला तरी पाचेकशे रुपये युं उडणारच. जरा महागच आहे तरीही धो धो व्यवसाय चालतोय यांचा गेले आठेक वर्ष. मग यांचा धंदा बघून जाता येताच्या रस्त्यांच्या बाजूनेही दोन-चार फूड जॉईंटस नव्याने सुरु झाले आणि बघताबघता लोकप्रिय झाले. विशेषतः या नामांकित फुड जॉईंटजवळचा चहाचा जरासा फुटकळच स्टॉल तर एवढ्यात बराच नावारुपाला आला. बघायला गेली तर मोठीशी चहाची टपरीच आहे ही, तरीपण गवती चहा, अद्रकवाला वाफाळता चहा, ताजे गरमागरम पोहे तेही वाजवी दरात परत झटपट आणि बाहेरच्या बाहेरचं. म्हणजे गंमत अशी व्हायला लागली की लोकं गाड्या तिकडे पार्क करुन, तिथल्याच वॉशरुम्स वापरुन बाहेरच्या बाहेरचं इथला चहा, पोहे करुन रस्ता पकडायला लागले.
शेवटी त्या प्रस्थी जॉईंटने पार्किंग जवळ एक खमका माणूसच बसवला. बारीक नजर ठेवायला. म्हणजे नुसत्या आपल्या चकाचक वॉशरुम्स वापरुन बाहेरच्या टपरीवरचा चहा घेऊन जाणा-या गि-हाईकांना हा माणूस नेमकं टिपायला लागला, जाब विचारायला लागला. इकडच्या फुकटच्या सोई आणि चहा-पोहे मात्र तिथले हे पटतं का तुम्हाला म्हणून दुहेरी निष्ठावाल्यांना भावनिक, व्यावहारिक आवाहन करायला लागला.
आजही तसंच झालं. फक्त झक्कास चहाची तल्लफ होती आणि वॉशरुमचीही गरज होती. शिका-याने बरोबर आम्हाला हेरलं.
काहो..तुम्हाला पटतं का हे ? पार्किंग आमचं, वॉशरुम्स आमच्या पण धंदा मात्र त्यांचा. एवढं आहे तर लावा नं गाडी तिकडे. वापरा त्यांच्या अशातशा वॉशरुम्स. आमच्याकडे कशाला गाडी लावता ऑं ?
गडी बोलत होता ते सगळं खरं होतं. पण इथल्या निटसं वॉशरुम्स आणि तिकडचा फर्मास चहा. दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी योग्यच होत्या आणि सोडवतही नव्हत्या. त्यांचं आपलं पुन्हा पुन्हा जाब विचारणं सुरुच होतं. आमचाही हट्ट सुटत नव्हता. शेवटी काहीतरी इथून विकत घ्यायचं प्रॉमिस केलं आणि तिथल्या मनासारख्या सुविधा पदरात पाडून घेतल्या, इथला चहा घेतला. अवाजवी दरातलं तिथून विकत घेतलेलं पॉपकॉर्नचं पॅकेट निष्ठावान (?) दरवानासमोर झळकवत निघालो.
हे सगळं अनुभवलं आणि आयुष्यातली, जगण्यातली एक व्यवहारी रस्सीखेचच अनुभवायला मिळाली. रोजच्या जगण्यात असे द्विधा टाकणारे प्रश्न आपल्याला नेहमीच गुगली टाकत असतात नाही ?
या अनुषंगाने पंचतंत्रातल्या एका गोष्टीचा मतीतार्थ आठवून हसू आलं.
रोज उजाडलं की आज शिकार कशी आणि कोणाची करायची हा प्रश्न सिंहाला पडतो तर आज कुणापासून आणि कसा जीव वाचवायचा अशी घोर चिंता सशाला लागते. आणि या ताणाताणीतच जीवन बहरतं.
So everyone has their own share problems and worries, and solutions for that also !☺️
No comments:
Post a Comment