Monday, 19 November 2018

India, Long way to go.

आजचा दिवस ऑस्ट्रेलियातलं, सिडनीतलं बांधकाम विश्व, तंत्रज्ञ जाणून घेण्याचा.
ग्रिटिंग कार्डासारखी सुरेख, टुमदार, आखीवरेखीव उतरत्या छपराची घरं. मागेपुढे अंगणं, इटुकल्या बागा, प्रशस्त गराजेस, वळणदार चढउताराचे अत्यंत नेटके रस्ते. प्रथमदर्शनी तर कुठे म्हणून खोटं नाही.
Highly impressed !
तर आज बांधकाम चालू असलेली घरं आवर्जून बघायला गेलो.
सगळी कामं शिस्तीत आणि आटोपशीरपणे चाललेली. घरं बांधायची पध्दत वेगळी पण नक्कीच अनुकरणीय. बांधकाम ठिकाणी मोजकेच कामगार  तेही दांडगे पुरुषच. तेही एकेकटेच. दारु पिऊन कामावर यायची परवानगीच नाही. सगळ्या साईट्सवर पोर्टेबल कॅपसूलसारखे टॉयलेट. व्यवस्थित दार असणारं. कुठेही त्याची घाण दिसत नाही वा वासही येत नाही. अक्षरशः चकीत करणारी एक अत्यंत महत्वाची सुविधा.
कामगारांप्रती, पर्यावरणाप्रती, स्वच्छतेप्रती ऑस्ट्रेलियन यंत्रणेची इतकी काळजी बघून थक्क झालो. साहजिकच लगेच आपले भारतातले बांधकाम कामगार आठवले आणि मन विषण्ण झालं.
बांधकामाच्या ठिकाणी पत्र्याच्या टिनपाट टिचभर गरम खोलीत रहाणारं ४-५ जणांचं कुटुंब, कामाच्या तासांकडे न बघता दिवसरात्र राबणारे कामगार, तिथल्याच मातीत, सिमेंटमधे खेळणारी त्यांची शेंबडी, नागडी पोरं आणि शौचासाठी डबे घेऊन आडोसा शोधत फिरणा-या पडदानशीन त्यांच्या बायका-मुली.
पुरुष कष्टक-यांना सुध्दा प्राथमिक सुविधा देणारं हे सुबक बाथरुम पाहिलं आणि आयुष्यभर प्रातर्विधीसाठी लज्जीत होऊन आडोसा शोधणा-या आपल्या भारतीय महिला डोळ्यासमोर आल्या आणि अक्षरशः डोळे तळावले.
खरंच केवढा दूरचा पल्ला गाठायचा आहे अजून आपल्याला !

No comments:

Post a Comment