दसरा जाऊन जूना झाला, दिवाळीची नवलाई अजून आहे.
या वर्षी दस-याला सटीकपणे झेंडू फुलं आदल्या दिवशीच घेऊन ठेवले. हार करायचा मला भारी उत्साह.
सकाळीसच ड्रायव्हर आला. मी आसपास नव्हते. साहेबांकडून हाराचे पैसे घेऊन त्यानेही तत्परतेने गाड्यांसाठी हार आणले. काही काही ड्रायव्हर्सचं मालकापेक्षाही गाडीवरचं जबरी प्रेम असतं. माझ्या लक्षात येईतो गाड्या धुवून-पुसून हार लागले पण. माझी फुलं दूरडीत तशीच राहिली. शेवटी ती हिरण्यला पाठवली. म्हटलं पाऊस असो वा नसो, पूरा ही फुलं कुठेतरी पाण्याजवळ. हुरडापार्टीत छान दिसतील फुलली की.
आज ड्रायव्हरला घेऊनच बाहेर पडले.
...अरे कुठेही झेंडूची फुलं दिसली तर गाडी थांबव हं. आपल्याला फुलं घ्यायची आहेत आज.
आज नसतील म्याडम, लक्क्ष्मी पूजन उद्या हायं.
...अरे हो..पण मला आजच सवड आहे. हार आजच करुन ठेवायचे आहेत मला.
हारं-गिरं कुटं घरी करता म्याडम, उद्या लगी जागजागी हारं भेटत्येत.
...हे बघ, मला हार स्वतःच्या हातांनी बनवायला अतिशय आवडतं. त्यामुळे दिसली फुलं की तू आपली गाडी थांबव !
एकदाची हवीतशी ताजी फुलं दिसली, लगेच विकत घेऊन टाकली. मनात विचार आला सरसकट स्त्री-पुरुषांच्या सृजनात्मक विचारात किती फरक असतो नाही. माझी धडपड स्वतः हार करण्याची, त्यातून आनंद घ्यायची आणि याची कामं उरकण्याची.
मुलीला शॉपिंगला जायचं होतं. इतक्या ऐन दिवाळीत त्या मॉल्सच्या गदारोळातल्या तंगडतोडीचा विचार करुनच अंगावर काटा आला. झेंडू फुलंही खुणावत होतीच.
जाना तू बाबाबरोबर. त्यालाही शॉपिंग करायचय. मी जरा हार करते, त्यावर काही लिहिते. मला काही सुचलय. मग तिला ती दस-याला मी आणलेल्या झेंडू फुलांची कथा आणि व्यथा, आजचं हारं-गिरंच संभाषण सांगितलं. स्त्रिया आणि पुरुषांच्या दृष्टीकोनाबद्दल माझं मत सांगितलं तर...
आई..Don't generalise पुरुष असे आणि बायका तशा म्हणून. There might be some men around who are interested in making haar and sort of things.
...अगं..हो..पण मेजॉरीटी अशाच पुरुषांची असते.
आणि मी आता ठरवलयं. आपल्याला जशी दिवाळी साजरी करावीशी वाटते तश्शीच करायची. कुणी सोबत असो वा नसो. आकाशकंदील, रांगोळी, तोरणं..बस्स no more compromises. आपल्या आवडतंय, आनंद मिळतोय, मग करायचच. तर आता मला तोरणहार करायचे आहेत. त्यामुळे तुम्ही दोघं जा.
अगं इतकं प्रसन्न वाटतं ना हे हार करताना, फुलं हाताळताना. एक वेगळाच सुवास दरवळतो घरात हे हार करताना. आम्ही तर लहानपणी हार करता करताच झेंडू फुलातलं खोबरं पण खायचो.
खोबरं ? झेंडूचं ?
...हो..हे बघ... या पाकळ्या काढून टाकल्या, हे हिरवं, निब्बर देठ काढून टाकलं की हा पांढूरका भाग खायचा, खोब-यासारखा लागतो म्हणून खोबरं म्हणायचं याला.
...अगं..अगं..मी सांगितलं कि लगेच तसंच नको खाऊ.
का ? तू खाल्लं, तूला काही झालं नाही.
मग मलाच कसं काही होईल. मी खाऊन बघणार.
...मायगंगे ! खरयं तूझं. पण हल्ली पेस्टिसाईडस् मारतात ना म्हणून म्हटलं.
पुर्वी कुठलीही गोष्ट कुणाशीही बोलायच्या आधी दोनदा विचार करावा असं सरसकट ज्ञानामृत दिलं जायचं. हल्लीच्या मुलांपुढे तोंड उघडायच्या आधी दहावेळा विचारा करावा अशी सध्या परिस्थिती आहे.
असो.
Some how she agreed to go with her father.
शांत मध्यान्हीची वेळ. दिवाळीतली सुस्तावलेली दुपार.
स्वैपाकपाणी, जेवणखाण आटोपून स्वच्छ, निटस व निरव घरात एकटीच हार करत बसले.
दूरडीभर पिवळे-नारिंगी टप्पोरी, ताजी झेंडू फुलं. या फुलांच रंगरुपच इतकं पारंपरिकरित्या आकर्षक आहे ना की यांना बघताच सणावारीचे हंगाम आठवतात. घट्टमुट्ट असंख्य पाकळ्या, दामटून त्या निब्बर देठात कशाबशा मावत असतात. या फुलांची एकच पाकळी तर कुणाच्या खिजगणतीतही न येणारी. पण घट्टपणे एकत्रित असलेल्या या पाकळ्यांच रुप खूप सुखद आणि दमदार असतं. टवटवीत, टप्पोरी पिवळीधम्मक, जर्द नारिंगी फुलं पाहिलीकीच हार करायला हात शिवशीवतात.
सुई-दो-यांशीवाय यांना माळता येणं अशक्य आहे.
भक्कम पुडीचा दोरा आणि भल्यामोठ्या नाकाड्याच्या सुई शिवाय इथे काही लाग नाही. चांगलीच दांडगी असतात ही फुलं. तरीपण देठांमधे बळजबरीने सुई खुपसताना जरा जीव खालीवरच होतो. फुलांचा आणि देठांचा उग्र घमघमाट घरभर पसरवत सरसर हार कधी तयार होतो कळतही नाही. मुळात फुलंच इतकी आकर्षक आणि भारदस्त असतात ना की हार करायला काहीच विशेष कौशल्य लागत नाही. एकरंगी, एक आकारी फुलं निटसपणे ओवली तरी हार सुंदरच दिसतो. आणि कितीही धसमुसळेपणाने हाताळा, ही फुलं मुकाटपणे अत्याचार सहन करतात आणि चारेक दिवस तरी आपल्या घरादाराची शोभा स्वतःच्या ताजेपणानी, चटपटीत रंगानी वाढवत रहातात.
आणि हे हार करताना पाकळ्यांचा, दुभंगलेल्या फुलांचा जो काही कचरा पडतो ना त्याचही काही विशेष वाटत नाही बघा आपल्याला. जसा आपल्या लेकरांनी केलेला पसारा सुखावहचं वाटतो, तसंच या झेंडू फुलांच असतं.
या झेंडू फुलांचे ना कुठले नखरे, ना कुठला गाजावाजा, ना कुठलं स्तोम, ना किमती आकाशाला भिडलेल्या,
तरी यांच्याशिवाय पान हलणार नाही का शुभकार्य होणार नाही. हक्कानी पाचपन्नास फुलं आणावीत, एकेक फुलं वहावं वा सुईदो-याने सरसर फुलं ओवावीत, देखणा हार बनवावा आणि शुभकार्याला चारचांद लावावेत.
इतकी भली आणि सज्जन असतानाही या फुलांच्या नशीबी नेहमी हेटाळणी येते.
No one takes them seriously.
अतिपरिचयात अवज्ञा का काय म्हणतात तसं असेल का ?
No comments:
Post a Comment