Monday, 5 November 2018

सुस्वागतमी रांगोळी.

सातत्याने उत्कांत होत जाणाऱ्या मानवाची अत्युत्तम सृजनशीलता काय असेल तर आपलं रहातं घर, आपल्या वापरातल्या वस्तू आपला परिसर सुंदर आणि आकर्षक करत रहाणे. तदनंतर त्याला धार्मिकतेची, पारंपरिकतेची जोड देणे. स्वतःचं शरीर सुशोभित, आकर्षक करणं तर फार प्राथमिक सृजनशीलता आहे पण घरादारापासून परिसराच्या सुशोभीकरणासाठीची मानवाची धडपड करणे, कलात्मक नजर विकसित करणं पाहिलं की थक्क व्हायला होतं.☺️

आपल्या हिंदूस्थानात तर प्रत्येकच सुस्थिर प्रांतातल्या घरोघरी अंगणात, दारासमोर रांगोळी काढायची पध्दत आहे. प्रांतवार रांगोळी काढण्याच्या माध्यमात फरक आहे, कलात्मकतेत फरक आहे, नावंही वेगळी आहेत पण त्यामागची भावना मात्र एकच आहे.

आयुष्यातली पहिली रांगोळी कधी पाहिली आणि काढली हे आता आठवत नाही. बहुधा घरोघरच्या अंगणातल्या रोजच्या हळद-कुंकू वाहिलेल्या ठिपक्यांच्या रांगोळ्या, देवपाटासमोरच्या धार्मिक रेषी रांगोळ्या आणि पंगतीना शोभा आणणा-या सरसर वेली रांगोळ्या बहुतांशपणे पाहण्यात आल्या असाव्यात. तेही नांदेडला. तेव्हा नांदेडला सुबकशी अंगणं, बागा, तुळशी वृंदावनं घरोघर असायची. अजूनही आहेत.
पण मी बहुदा स्वतः रांगोळी काढायचा प्रयोग कोटला कॉलनीतल्या कोबा केलेल्या फरशीवर केला असावा.
आणि फारचं टीम स्पिरीट जोरात असेल तर सहा घरं बाळगून असलेल्या इमारतीसमोर झाडलोट करुन सडा टाकून ऐसपैस रंगबिरंगी रांगोळ्या मैत्रीणींबरोबर सहकारतत्वाने काढल्या असाव्यात. मला एकदा तिथल्याच गणपती उत्सवात रांगोळीसाठी दुसरं बक्षीस मिळालं होतं. पहिल्या नंबरवालीच्या रेघा माझ्यापेक्षा बारीक आणि एकसारख्या होत्या म्हणून तिला पहिलं बक्षीस देण्यात आलं होतं. असो.😃

पण आमच्या कुटुंबात रांगोळीच प्रस्थ दैनंदीन जीवनात मुळीच नव्हतं. सणावारी, समारंभी, विवाहसमारंभात मात्र माझी आई, आम्ही बहिणी रांगोळ्या काढायचो. तशा सगळ्याच मुली त्याकाळी रांगोळ्या काढायच्या म्हणा.😀
पण दिवाळीत सगळ्यांनाच फार स्फुरण चढायचं. त्याकाळी मोबाईल काय पुस्तकांची पण रेलचेल नव्हती. कुणा एखादीकडे पुस्तक असायचं. मग त्यातल्या आवडलेल्या रांगोळ्या आम्ही शाळेच्या रफ वहीत कॉपी करुन घ्यायचो आणि अहमिकेने दिवाळीतल्या निवांत दुपारी रांगोळ्या काढायचो.🤗

सुबक देखण्या रांगोळ्यांचेही काही ठोकताळे असतात. आपल्या महाराष्ट्रात गारांची (दगडांची) चरचरीत पिठोरी पण कोरडी रांगोळी रेखांकनासाठी वापरली जाते. दक्षिणेत भिजवून एकजीव वाटलेल्या तांदूळाची ओल्या रेघांनी रांगोळी काढली जाते. जे सहजपणे उपलब्ध आहे ते वापरायचं हा खाक्या.
महाराष्ट्रात बहुतांशपणे ठिपक्यांची रांगोळी काढली जाते. शक्यतो चौरस रांगोळीच असते. पण काही विशिष्ट डिझाईन्स मात्र चढत्या-उतरत्या ठिपक्यांनीच तयार होणारे असतात.
तर उभे-आडवे ठिपके एका ओळीत एका अंतरावर आले तरच त्यावर पुढच्या डिझाईनच परफेक्शन अवलंबून असतं. महाराष्ट्रीयन रांगोळीचा कणा म्हणजे हे एकसारख्या अंतरावरील एकसारख्या ओळीतले गोलसर ठिपके आहेत असं म्हटलं तरी वावगं नाही. नेटक्या ठिपक्यांबरोबरच रेखांकनाची रेघही एकसारखी आणि बारीक आली पाहिजे. इथे सहसा भौमितिक आकारच प्रामुख्याने वापरले जातात. त्यामुळे चारीबाजूंचे तेही कोन, काटकोन, रेषा परफेक्टच जमले पाहिजेत.
नंतरचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे रंग भरणे. रंग शक्यतो विरुध्द दिशांना सारखे भरायची पध्दत तेव्हां तरी होती. शाळकरी वयात आईने घेऊन दिलेले एक साताठ रंगच हाती असायचे. आम्ही तर ठिपक्याला ठिपके जोडून इतके चौकोन, त्रिकोण, अष्टकोन करुन ठेवायचो की शेवटी रंगांच वैविध्य कमी पडायचं आणि नियोजन निट नसेल तर एकच रंग शेजारी शेजारी येऊन रांगोळीचा विचका करुन ठेवायचे. म्हणूनच ते विरुध्द दिशेच्या सिमिट्रीची आयडीया आली असेल.
रांगोळी काढण्यातल्या पहिलटकरणीला चार बाय चारची रांगोळीचा आधी सराव करावा लागे. त्यात प्राविण्य मिळालं की मग सहा बाय सहाच्या रांगोळीचा, एकसारखे ठिपके काढण्याचा सराव करावा लागे. पाच ते दहाच्या ठिपक्यांचे चौकोन माध्यमिक शाळेपर्यंत जमत असतं. मग वाढत्या वयाबरोबर, समजेबरोबर ११×११, १५×१५, २०×२० अशा ठिपक्यांच्या चौकोनाची प्रगती होत असे. जीतके ठिपके जास्त तितकी जास्त देखणी डिझाईन्स तयार करता येत असतं. यात शक्यतो दिवे, आकाशकंदील, तुळशीवृंदावन, भौमितिक फुलं-पानं, ससे-बदकं-मोर-चिमण्याही असत. घरातली निष्णात मुलगी रांगोळीचं ठिपक्यांसहच बेसीक रेखाटन करत असे आणि नंतर मग लिंबू-टिंबू बहिणींना रंग भरायला उदार अंतकरणाने देत असे. खरंतर रंग भरणं सुध्दा कौशल्याचच काम आहे. पांढऱ्या रेषेबाहेर रंग गेले नाही पाहिजेत. अतिशय पातळपणे रंग एकसारखा भरता आला पाहिजे. यासाठी खूप सराव लागतो. साधी साताठ इंची रेष सुध्दा सराव नसेल तर एकसारखी व सरळ येऊ शकत नाही.
मला तेव्हा ठिपके फार सुबकपणे मांडता यायचे. आणि सम संख्येपेक्षा विषम संख्येतल्या ठिपक्यांच्या रांगोळ्या जास्त आकर्षक आणि वैविध्यपूर्ण होतात हा माझा अनुभव आहे.☺️

आठवणीतली रांगोळी जरी महाराष्ट्रीयन पध्दतीची असली तरी मला भावते ती दक्षिण भारतातलीच रांगोळी. रात्रभर तांदूळ भिजवायचे. अतिशय एकजीव आणि बारीक वाटून घ्यायचे आणि त्या पातळ द्रावणात बोटं भिजवून किंवा कापसांची गुंडी भिजवून सरसर वळणार, लयदार रांगोळी काढायची पध्दत मला मनापासून आवडते. औरंगाबादेत फारशा अशा रांगोळ्या बघायला नाही मिळत. पण मुंबईत माझी चंगळ होते. बहिणीच्या टोलेजंग इमारतीत मला नेमाने या दक्षिणभारतीय रांगोळ्या बघायला मिळतात. त्या काढणा-या महिलांशी माझी यामुळेच मैत्रीपण झाली आहे.
दोनेक वर्षांपूर्वी दक्षिण भारतात गेले होते तर चिंदबरम मंदिरासमोर दक्षिण भारतीय रांगोळीचं(कोलमचं) गलेलठ्ठ पुस्तक मिळालं. तामिळी भाषेतलं. भाषा समजो ना समजो रेषांची भाषा कळतेच की आपल्याला.

हल्लीच्या आधुनिक घरातल्या मार्बल, ग्रानाईटवर रांगोळीची काहीच मजा नाही. खरी रांगोळी पहावी ती सारवलेल्या जमिनीवर. रंगांबरोबर रांगोळी सुगंधीपण होते. सारवण्याचे वळणादार शेणकट फर्राटे आणि त्यावरची शुभ्रधवल लयदार रांगोळी. खरोखर मन प्रसन्न झाल्यावाचून रहात नाही.😍
आता नाहीच सारवलेलं अंगण बाळगणं शक्य तर निदान गेरु रंग तरी पार्श्वभूमीवर असावा.

माझं एक स्वप्न आहे. बांधलच कधी घर तर अंगणात निदान एक चौरस तरी सारवलेला ठेवावा. रोज सुबकशी रांगोळी काढावी. आपलं कौशल्य आपणंच जोखावं आणि पाठीवर आपणच आपली थाप मारुन घ्यावी.
दिवाळी असो वा नसो, रात्रीच्या प्रहरी पणतीच्या मंद उजेडात चमचमून उजळणारी रांगोळी पहाण्यात अतीव सुख आणि स्वप्नाळूपणा आहे.

~~~आज मी काढलेली रांगोळी. चौकोनी फरशी कधीची करुन घेतली आहे, पुस्तकं आहेत, रंग आहेत पण का कुणास ठाऊक हात वळत नाहीयेत रोज रांगोळी काढायला.
मुलं लहान असताना मधेमधे करत धसमुसळेपणा करत  त्यामुळे रांगोळी विस्कटून जात असे. आज मुलं मोठी झालीयेत तर त्यांच्या लाडक्या मांजरीने उडी मारुन कार्यभाग साधला.
मला स्वतःला पारंपरिक रांगोळीच आवडते. तरी आज फ्री हॅन्ड डिझाईनला कौल मिळाला.

No comments:

Post a Comment