कुठे गेली ती दिवाळी ?
थंडीच्या कडाक्यात, जांभुळक्या झुंजूमुंजूत उठवणारी..
आकाशकंदीलाच्या उजेडात रांगोळी काढून घेणारी..
कुरकुरत का होईना पण ऊन ऊन पाण्याने आंघोळी-पांघोळी उरकवून घेणारी..
सकाळीसच लाडू-चिवडा-चकलीचा फराळ करायला लावणारी..
पिवळ्याधम्मक झेंडू फुलांच्या उग्र वासाने घरादारात घमघमणारी..
कुठे गेली ती दिवाळी ?
आपल्याच शाळकरी मुलांना अरे..अरे करायला लावणारी..
मुलांच्याच आवडीचे नेटके पदार्थ करुन घेणारी..
मुलांच्या आनंदासाठी आपल्याकडनं वारेमाप धावधाव करुन घेणारी..
आपणच काढलेल्या रांगोळीत आळंबळं मुलीकडनं रांगोळीत रंग भरुन घेणारी..
दे..दणादण दिवसा ढवळ्या लक्ष्मीबॉम्ब फोडणा-या मुलाची काळजी करायला लावणारी..
कुठे गेली ती दिवाळी ?
नातलगांचे एकमेकांकडे जाण्या-येण्याचे बेत महिनाभर आधीच आखून घेणारी..
लक्ष्मीपूजनाला ही साडी नेसू का ती साडी नेसू असं संभ्रमात पाडणारी..
सहेतुक पाडव्याची अपेक्षित ओवाळणी यजमानांच्या कानावर टाकायला लावणारी..
आसपासच्या घराघरातनं घमघमणा-या वासांवरनं पदार्थ ओळखून घेणारी..
कोणे एकेकाळी येणाऱ्या अनेकानेक दिवाळी ग्रिटींग कार्डांची आठवण काढत हळवी करणारी..
एका छोट्याशा पणती प्रकाशात पण मनातला अंधार दूर करण्याचं सामर्थ्य असणारी..
गणगोतांना मनाजवळ आणणारी, त्रयस्थांना उंबरठ्याशी आणवणारी..
कुटुंबाला चुंबकासारखं एकत्र धरुन ठेवणारी, चराचरातला एक चैतन्य बिंदू व्हायचं भाग्य आपल्याला देणारी..
कुठे गेली ती दिवाळी ?
ग्लोबलाझेशन, व्यक्तीस्वातंत्र्य, विधीनिषेध शिक्षणव्यवस्था, व्यावसायिक यश, आर्थिकसंपदेच्या चिरेबंद भिंती, मोबाईल क्रांती, स्वमग्नता या सर्वांनी या आठवणीतल्या दिवाळीला संपवलय.
No comments:
Post a Comment