Friday, 2 November 2018

वाट पहाणं.

दिवाळी अगदी दारात. घरातल्या पुरुषांचे महागडे झब्बे दुरुस्तीला काढलेत. भर दिवाळीत अल्ट्रेशनसाठी कुणीही दारात ऊभं करत नाही. शोध घेत घेत गेले तर जवळच्याच एका आतल्या गल्लीत कलीमभाई अल्ट्रेशनवाले मिळाले. शहरातल्या आडबाजूच्या भागातली आतली गल्ली. एरियाचं नाव मुसलमानी तरी पण हिंदूचही ब-यापैकी तुळशी वृंदावनी आस्तित्व जाणवत होतं.
एका सर्वसाधारण इमारतीच्या जिन्याखाली या कलीमभाईंच बस्तान. रया गेलेली सुमार मशीन, फुटकळ स्टूल आणि खूपसारे गाठोडे.
कलीमभाई दाढीवाले मुसलमान. हसतमुख, बोलायला मोकळे ढाकळे, प्रसन्न. त्यांचा फक्त अल्ट्रेशनचाच व्यवसाय आहे त्यामुळे त्यांनी आनंदाने काम घेतलं.
पण पहिल्या भेटीतच आपको मेरा पता किसने दिया असं मात्र आवर्जून विचारलं. कदाचित माझं त्या आडबाजूच्या जागेवर पोहंचणं त्यांना आश्चर्यकारक वाटलं असावं.

दोन दिवसांनी काम झालं, पण त्यातही काही चुका झाल्या. मग परत कपडे दिले. परत दोन दिवस मधे गेले. मग परवा सांगून कपडे आणायला गेले तर दुकान उघडं पण कलीमभाई जागेवरच नाही.

आधीच घरात वैतागले होते. निघाले तर स्कुटर अगदी पार रिझर्वच्या शेवटच्या काट्यावर येऊन ठेपली होती. त्यात हा माणूस जागेवर नाही. परत जावं तर पेट्रोलचा प्रॉब्लेम आणि परत फोन करुन यावं तर खाना खानेकू गया, नमाज को गया असली कारणं असतातच हजर.
जरा तावातावातच फोन केला. पण कलीमभाईंची न शांतता ढळली असेल ना चेह-यावरच स्मित मावळलं असेल हे त्यांच्या फोनवरच्या बोलण्यावरनंच जाणवलं. शेवटी चरफडत दहा मिनिटं बसून काम करुनच जायचं ठरवलं आणि तिथल्या कलीमभाईच्याच स्टुलावर बसले.

मनातल्या मनात धुसफुस चालूच होती. मग विचार केला आपण डॉक्टरकडे तासंतास बसतो. लग्नसमारंभात, एयरपोर्टवर तर किमान दोन तास तरी अवघडून बसतो. आणि या आडवळणाच्या गल्लीत दहा मिनिटं थांबायला इतकं काय जिवावर येतंय आपल्या ? खरंतर आपल्या तर फार जिव्हाळ्याची आहेत अशी ठिकाणं. उगाचच आज वैतागलेलो आहोत म्हणून त्रागा करतोय आपण.
आणि पाहिलं तर खरचं गल्ली भरदुपारची इतकी वैविध्यपूर्ण चहलपहलनी रसरसलेली होती की कंटाळा येणं अशक्य आहे.
आपण Out of place, out of mind असलो तरी काय झालं ?
There's so much to observe here.

मनानी, शरीराने सैलावले आणि दिलोदिमागसे त्या मशीनसमोर बसून गल्लीचा आस्वाद घेत राहिले.

आधुनिकीकरणात रुंदावलेली आडबाजूची अंतर्गत गल्ली. छोटासा चौकच. चौकात चहाभजांचं फुटकळ पण इमारतीतलं हॉटेल, झेरॉक्स, भांडी दुकान, मैचिंग सेंटर, इमिटेशन ज्वुलरीची दुकानं. तिथल्या परिसरात दबदबा असलेला दवाखाना, शेजारी मेडिकल, दुस-या बाजूला खलीया-चाप-पायाच कळकट हॉटेल. सायकलींची, बाईक्सची धावपळ.

अगदी भरदुपारची वेळ तरी या व्यावसायिक गल्लीला आत्ता कुठे जोश येतोय.
काही ठिकाणी तर आत्ताशी झाडझूड सुरु आहे.
एक बेकार तोतरा माणूस झाडतोय. बाकीचे तरतरीत पोरं त्याची टर उडवताहेत. माझ्या शेजारी एकजण आडोसा घेऊन मोबाईलवर गेम खेळण्यात इतका दंग आहे की त्याने मी कलीमभाईंच्या स्टुलावर हक्काने बसले याची दखल सुध्दा घेतली नाही.
दवाखान्यात गर्दी होतेय. वयस्कांना मश्रुम कटवाले तरुण बाईकवरनं दवाखान्यात सोडून सुं पळताहेत.
एक नऊवारीतली म्हातारी काठी टेकत, टेकत दवाखान्यातन बाहेर येऊन चोळीतला मोबाईल काढून एका मश्रुम कटवाल्या किडकिडीत तरुणाला मोबाईल लावून द्यायला सांगत आहे. बहुदा चिरंजीवांना अथवा नातवाला बोलावून घ्यायच असेल. एकदोन बुरखेवाल्याही तुरुतुरु दवाखान्यात वळल्या.
कामगार, कष्टकरी वर्गातल्या तरुण हिंदू आया आजारी पोरांना घेऊन दवाखान्याच्या पाय-या चिंताग्रस्त
चेह-यांनी चढताहेत. बाहेर आल्या की शेजारीच औषध घेताहेत.
तरुण, सुबक बांध्याच्या महिला. चटपटीत साड्या,
रुंद-खोल-वळणदार गळ्यांचे जरीचे गोठ लावलेले ब्लाऊजेस, त्यातून दिसणा-या त्यांच्या शिसवी-लयदार पाठी, मांसल कमरा, घाटदार पाठमोरा बांधा..माझ्या शेजारच्या हाटेलीतले रिकामटेकडे बघे बघून उगाचच काळजी वाटली. 
दोनचार शाळकरी मुली खाली माना घालून पण खुसखुसतच घरात गेल्या. एका संथ पण वाहत्या गल्लीत काही जवान मश्रुमकटवाले सुसाट बाईक्स पळवत जान आणायचा प्रयत्न करताहेत.
बीस के डझन, बीस के डझन म्हणत पिवळीधम्मक केळी विकणारा दाढीवाला गल्लीला तजेला देतोय.
शेजारच्या हाटेलीत किशोर गातोय.

इथले मध्यमवयीन लोकं रोज इथे तासंतास असेच बसत असावेत असं वाटतय.
कट-फूल चायचे रतीब सुरु आहेत. इथेही एखादा चकणा, थोडासा अपंग, मतीमंद सांभाळला जातोय.
दिवसभर पडेल ती कामं करायची आणि त्या बदल्यात दोनतीन चहा आणि थोडेफार भजे पोटासाठी मिळवायचे.
कळकट-मळकट कपड्यातले हे कर्ते-नाकर्ते पुरुष. कुणाची दाढी वाढलेली, कुणाची राखलेली. कुणाची पांढरी, कुणाची मेंदीची. कुणाचे केस अस्ताव्यस्त तर कुणावर सुरकुत्यांच जाळं, कुणी भिरभिर बघणारा तर कुणी शुन्यात हरवलेला. कुणी हास्यकल्लोळात सोबत्यांबरोबर भकाभक धूर सोडणारा तर कुणी एखादा लयदार धुराबरोबरच मौनातून हितगुज करणारा.

कोण आहेत ही माणसं ? उपजीविकेसाठी काय करतात ही माणसं ? मुळ कुठल्या गावची असतील ? काय शिकलेली असतील ? यांची कुटुंब-घरं कुठे आणि कशी असतील ? यांच पुर्व आयुष्य काय असेल ? यांच भविष्य कसं असेल ? इथल्या प्रत्येकाच्या मनात डोकवायला, त्यांना बोलकं करायला, जाणून घ्यायला आपल्याला फार आवडेल नाही ?

प्रत्येक माणूस म्हणजे जणू एक समुद्र किनाराच नाही ?
प्रत्येकाचा व्यावहारिक जगण्याचा किनारा वेगळा आणि भावनिक मनोलहरींची सातत्याने होणारी आंदोलनही वेगळीच.
किती अगणित माणसं आहे या जगात.
खरंच यातल्या काहीजणांना जरी मनस्वीपणे जाणून घेतलं तरी केवढं घबाडी साहित्य मिळेल आपल्याला.

तो भोळसट तोतरा, ती लंगडी म्हातारी, म्हातारीचा फोन लावून देणारा तरुण,  हा शेजारचा मोबाईलग्रस्त मुलगा, त्या पाठमो-या टंच महिला, नजरेनीच जग
टिपणा-या त्या बुरखाधारी महिला, तो केळीवाला,
ही फिदीफिदी हसणारी, गाड्या पळवणारी तरुण मुलं, त्या खालमुंड्या मुली, तो चकणा मंद माणूस,
तो डॉक्टर, तो मेडिकलवाला, हा चहावाला, तो बिर्यानीवाला, हसरे, प्रसन्न कलीमभाई आणि येताजाता वैतागणारी मी.

उफ्फ !
मानवी जीवनाचा, भावनांचा, मनसुब्यांचा केवढा धगधगता यज्ञ आहे इथे, तिथे, सगळीकडे.
म्हटलं तर केवढं रंजक आणि रोचक. म्हटलं तर माणसा सारखीच माणसं. उन्नीस बीस इकडे का तिकडे.
पण त्या उन्नीस बीस मधल्या फरकातच केवढं वैविध्य आहे, चकीत करणाऱ्या, दिग्मुढ करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत.

खरोखर दूर दूर तक कंटाळा, नैराश्य, वैताग नामक गोष्टी दिसूही नयेत एवढं सर्वव्यापी चैतन्य चराचरात भरलेलं असतानाही आपण वैयक्तिक पातळीवर खचतो, वैतागतो, हतबल होतो.

आपल्याला कायम हे हुकमानी तळ्यात मळ्यात करायला जमलं पाहिजे नाही ?
व्यक्तीगत स्तरावर निराश झालो की या सर्वव्यापक चैतन्यात डुबी मारता आली पाहिजे आणि सर्वदूर खचवणारी परिस्थिती झाली की आपल्याच काळजातल्या चैतन्यदायी ज्योतीवर दुर्दम्य विश्वास ठेवता आला पाहिजे.
त्यासाठी आपली आपल्याच मनावर, विचारांवर जबरदस्त हुकमत पाहिजे.

त्यासाठी काय करावं बरं ?

No comments:

Post a Comment