Sunday, 28 October 2018

को जागर्ति ?

घरामधे गवाक्षातून डोकावणा-या रुपेरी चंद्रप्रकाशात शांतपणे झोपलेल्या निरागस मुलासारखं औरंगाबादचं रेल्वेस्टेशन.
वेळ ब्रह्मवेळ.
मी अगदी पहाटेच्या ट्रेनने नांदेडला निघालेली.
वयामुळेही आणि गाडी चुकण्याच्या भितीमुळे अपेक्षेपेक्षा लवकरच प्रसन्न जाग आली.
झटपट आवरलं आणि निघाले. सुनित होताच पोहंचवायला.

कोजागरी पौर्णिमेची रात्र, आसमंतावर सुंदर झिरझिरीत जांभळट-निळसर आवरण पसरल्यासारखं. त्यातून झिरपणारी सौम्य, caressing चंद्र किरणं.
So romantic !
जाऊदे द्यावा प्रवास-बिवास सोडून आणि जावं असंच हिरण्यच्या वाटेवरल्या घाटामधे ड्राईव्हला.

एरवी मध्यरात्री सुनसान वाटणारे रस्ते भयाण न वाटता सुखद निद्रेत असल्यासारखे, आश्वस्त करणारे.
स्टेशनही तसचं. खुल्या दिलाने स्वागत करत असल्यासारखं.
घरंदारं नसलेले, पुढच्या प्रवासासाठी थांबलेले प्रवासी स्टेशनवरच पहुडत सुखासिन निद्रीस्त झालेले. दिवसा त्रस्त करणारे भिकारीही आयुष्यातला सगळा संघर्ष विसरुन निद्रादेवीच्या अधीन झालेले.

खरंतर रेल्वे स्टेशन्स इतकं बकाल कोणतंही ठिकाण नसतं. पण या ब्रह्मवेळी, कोजागिरीच्या शितल आणि नितळ प्रकाशात सगळंच जादू केल्यासारखं विलोभनिय दिसतय आणि खरोखर फार प्रसन्नपणे शांतही वाटतयं.
मुकपणे एक सफाई कामकार पहाटे चार वाजता प्लॅटफॉर्म झाडतोय.
कीती कौतुकास्पद आहे हे.

कुठेही कोलाहल-गदारोळ नाही. सगळीकडे सुखद, उबदार शांतता. नजरेनी टिपली जाईल अशी ब-यापैकी स्वच्छता.
त्या कोजागिरीच्या चंद्राने जणू जादूच केली आहे. ब्रह्मवेळच्या निळावंती प्रकाशात सगळंच विस्मयकारी दिसतंय, वाटतंय. अगदी दृष्ट लागावी अशी प्रसन्नता.

खरंच हे आपल्याच गावाच रेल्वेस्टेशन आहे का ?

अरे..आत्ताच रिझर्वेशन्स तर मिळालं, पण उद्या कशी येऊ ? हायकोर्टच्या एसी चेयरकार ने येऊ का जनरलने येऊ ?
You decide. तुला लिखाणाला विषय हवे असतील तर जनरलने ये आणि काही निवांतपणे लिहायचं असेल तर एसी चेयरकारने ये. 😃
Ok ! चल बाय, टेक केयर.

नव-याला बाय केला आणि एकटीच त्या जादूगार पौर्णिमेनं इथेतिथे..सर्वदूर शिंपलेलं चांदण अनुभवत, टिपत गाडीची वाट बघत शांतपणे बसून राहिले.

No comments:

Post a Comment