Friday, 26 October 2018

आनंदाचे डोही आनंद तरंग.

व्यक्ती तितक्या प्रकृतीच्याच थाटात व्यक्तीपरत्वे आनंदाची भाषा वेगळी, कल्पना वेगळी.
आता हेच बघाना मला चहा ट्रान्सपरंट कपमधेच, मगमधेच घ्यायला आवडतो. 😋 आता बहुतांश वेळा सोबत कुणी असो वा नसो माझ्या घरात मलाच चहा करायची वेळ येते. त्यामुळे ट्रान्सपरंट मग्ज अट्टाहासाने वापरात येतातचं. पण आता फुटाफुट होऊन दोन तीनच असले मग्ज राहीलेत घरात. तर चहासाठी पाचसहाजणं जरी असले तरी I make it sure that I get my favourite transparent mug. I just adore them. 😍
मनापासून चहा पिणा-यांना पुर्ण मग भरुन चहा दिसतो,(इथ्थेच नजर निवते हो !) आणि दुसरं कुठलही डिझाईन, रंग लक्ष विचलित करायला नसतं.
बस! मै और मेरी चाय !🤗
आणि या ट्रान्सपरंसीमुळे पुर्ण मगभरुन चहाचा एकसारखा रंग आपल्याला दिसतो (which is very tempting) त्यामुळे over a period माझा चहा इतक्या परफेक्टली एकाच रंगाचा होतो की कधी कधी मलाही आश्चर्यच वाटतं. 👏
For this, the due credit goes to these transparent mugs !
हे असले घिसेपीटे येराचे जाड काचेरी मग्ज टिकतातही खूप. पातळ, नाजूक काचांचे पण देखणे कप, मग्ज मिळतात पण ते लवकर टिचून जीवाला घोर लावतात. नकोच ते.
आपण मग्जसाठी का मग्ज आपल्यासाठी ?😚
सुटसुटीत, सोईच्या पण आवडत्याच गोष्टी वापरायच्या.

एवढ्यातच नांदेडला जाऊन आले आहे. तिथे बहिणीकडे सुरेख ट्रांसपरंट मग्जमधूनच चहा घेतला. भलतेच आवडले. चौकशी केली तर मुंबईच्या डि'मार्ट मधून घेतलेले.
अगं चल..इथेच डिमार्ट आहे.
लगेच गेलो. नांदेडमधेही डिमार्ट धो धो धंदा करत आहे. पण तिच्याकडच्यासारखं डिझाईन तिथे नव्हते. म्हटलं जाऊ दे, मी आमच्या घराजवळच्या डिमार्ट मधे बघते.

औरंगाबादला माझ्या घरापासून पायी दहा मिनिटांच्या अंतरावर डिमार्ट आहे. पण मी आजपर्यंत तिथे गेलेली नाही. असले मोठे मॉल्स म्हणजे तर कल्पनेनीच माझ्या पायात गोळे येतात. 😒
एक तर वैयक्तिक लक्ष देऊन सामान चांगलं का वाईट हे बघायला दुकानदारासारखी दक्ष व्यक्ती तिथे नसते. सगळा नोकरांचा कारभार. खरेदीदार आणि विक्रेत्यांबरोबरचा पर्सनल टच तर मुळीच नसतो.
सगळा कोरडा व्यवहार. वर परत एक हजाराचं बजेट घेऊन जावं आणि दोन हजार बेमालूमपणे उडवून यावेत असा सगळा आतबट्ट्याचा खेळ.🙃
असल्या मॉल्समधे अवास्तव घे..घे..फार होते.
आणि मला तर शहरातल्या गल्लीबोळातूनच खरेदी करायची, फोटो काढत फिरायची, तिथल्या लोकांशी गप्पा मारायची भलती हौस आहे. त्यामुळे असल्या नामानिराळ्या मॉल्सच्या नादी लागणं मी अशक्य आहे.
माझ्या घराजवळ एक राजस्थानी किराणावाला आहे. उपर मकान, निचे दुकान. रोज संध्याकाळी त्यांची चनिया-चोळी घालणारी आई खाली बसलेली असते. सणावारी झकास राजस्थानी, देहाती दागिने घालते. मग काय अस्मादिकांनी लावली फिल्डिंग. त्यांच्या गावच्या सोनाराशी संपर्क साधलाय. आता येत्या हुरडापार्टीत एक दागिना उत्तर राजस्थानवरुन नक्कीच मागवणार आहे. 😃
तर अशा जिव्हाळ्याच्या गोष्टी मॉल्समधे जमत नाहीत असा माझा समज आहे. असो.
तरी अस्मादिक ट्रान्सपरंट मग्जच्या ओढीने गेलेच डिमार्टमधे. अपेक्षित तुडुंब गर्दी. हवे तसे मग्ज नाहीच मिळाले त्यामुळे जे होते ते पण सुरेख मग्ज आणले. तेवढ्यात मुंबईच्या बहिणीचा फोन. डिमार्ट मधे मी आहे हे ऐकून तिलाही धक्का बसला. कारण मुंबईतले सर्वप्रकारचे मॉल्स आणि तिथे सातत्याने जावून खरेदीचा, शॉपिंगचा आपला छंद, पॅशन आणि विरंगुळा अथकपणे जपणा-या तमाम सुखवस्तू मुंबईकर महिला हा माझ्या निरिक्षणाचा, बोलायचा, लिहायचा आवडीचा विषय आहे. 🤓 बरचसं लिहूनही ठेवलयं या विषयावर.
योग्य काळवेळ बघून पोस्ट करीनच.
लोकप्रियता टिकवायची असली की असं कुणाच्याही शेपटीवर कधीही पाय देता येत नाही हो ! 😊

तर स्वच्छ आणि सुरेख ट्रान्सपरंट नवीन मग्जमधूनच आजचा चहा घेतला. कौतुकाने मगच्या कानात एडेनियमचं टवटवीत फुलं अडकवलं. देखणं फोटो सेशन केलं. अर्थात त्या आधी दोन घोट गरमागरम चहाचे घेऊन विमानाबरोबरची आजची स्पर्धा अस्मादिकांनी जिंकली हे सांगायची गरज आहे का ? 😀

No comments:

Post a Comment