Saturday, 20 October 2018

बेडरुम का कुरुक्षेत्र ?

काही काही प्रस्थापित गोष्टीत बरचसं साम्य पण असतं आणि बराचशा विरोधी गोष्टी पण असतात. तरीपण मुख्य ताणाबाणा साधर्म्यी असतो. त्यामुळे उगाचच आपण ही एक गोष्ट, त्या गोष्टीला ताडून पाहतो, जूळवून पाहतो. आणि आपल्या दृष्टीकोनातून त्या दोन्ही गोष्टींचा काळ, वेळ वेगळा असला तरी कुठे तरी बिछडे भाईछाप साम्य आपल्याला जाणवत राहतं.
आता बेडरुम मधे आणि कुरुक्षेत्रात काही साम्य आहे का ? पण अस्मादिकांना ते जाणवलं. कसं ते सांगते.

पांडव पाच तर कौरव शंभर, आहे का काही बरोबरी ?
तशीच गोष्ट त्या मच्छरांची.
अरे त्या बेडरुम रुपी कुरुक्षेत्री आम्ही दोघंच नवराबायको आणि डास मात्र पाचपंचवीस. बरं दोन्ही पार्ट्या म्हटलं तर दुरुन गुण्यागोविंदाने नांदतात. पण आले खेटायला की शत्रू होतात. हां..आता एक महत्वाचा फरक आहे की महाभारताचं युध्द सुर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच नितीने खेळलं गेलं. पण आपलं आणि डासांच युध्द रात्रीच जहाल पेटतं. अर्थात दिवसाही कुरापती काढतातच मच्छर, पण आपण वडिलधाऱ्या नात्याने व नितिमत्तेनी दुर्लक्ष करतो.
पण रात्री माफी नाही. एक तर हे मच्छरं म्हणजे भलते चपळ आणि गनिमी. आता असं तं होणारचं. तोलामोलाचे शत्रू असतील तर नितीने लढतील ना ? आपल्या ५-६ फुटांपुढे, ८०-९० किलोंपूढे त्या नखभरच्या मच्छरांचा काय लाग लागणार हो ?
पण ऐका, लागतो त्यांचा लाग. आपली म्हणच आहेना नवरा म्हणू नये आपला, आणि साप म्हणू नये धाकला. त्यामुळे जीव लहान पण किर्ती महान अशी गत आहे या डासांची. भर अंधा-या रणात सळो की पळो करुन सोडतं हे काळूंद्र सैन्य.

सुर्य अस्ताला जायचीच वाट की बेडरुमचे दरवाजे-बुरुज बंद व्हायच्या आधीच हे सैन्य कोप-या कोप-यात दबा धरुनच बसतं. आला शत्रू तावडीत की भणभण, गुणगुण करत केलाच समजा त्यांनी हल्ला. आता या पाचपन्नास सैन्यातले काही तरुण सैनिक जरा बिघडलेलेचं असतात. म्हण्जे आपण जिंकू किंवा मरु सारख्या युध्दावर आहोत हेच ते विसरुन जातात. बसतात बेटे आरशात आपलं रुपडं बघत. मग काय अस्मादिकांना हीच पर्वणी असते. बेडरूमच्या कडेकोट मैदानात चीनी बनावटीची तलवार कम् ब्याट हाती घ्यायची आणि त्या नवथर सैन्याच सपासप शिरकाण करुन टाकायचं. अस्से पळतात हे भित्रट, नवखे मच्छरं की विचारता सोय नाही. अगदी विकट हसू फुटतं अस्मादिकांना.
मग आपण मानवी तेजतर्रार बुध्दी वापरुन त्या हिटलरसारखंच आपल्या बेडरूममध्ये गैस चेंबर करुन ठेवतो. पण च्यामारी, तिथं ही आडल्ट्रेशन आहेच की. एक डास त्या गैसला भिक घालेल तर नशीब.
असो पण चीनी ब्याट कम् तलवारींना तोड नाही. झोपायच्या आधी छप्पा छप्पा हेरुन आम्ही दोघही ही डासांची एक फळी यमसदनी पाठवतो. आणि जेत्याच्या आनंदात गुडूप झोपतो.
आता दिवसभराची बाहेरची लढाई, रात्रीची ही लढाई, पडल्या क्षणी डोळा लागतो हो.
दोनचार छटेल मच्छरं गाणं गात खिजवून जातात पण चालायचच. हाथी चलत है अपने चाल, कुत्ता भुकत है अपने हाल. सो जाओ.

पण आपली एक गाढ झोप झाली की मात्र जाणवायला लागतं की या मच्छर गनिमांनी आपल्यावर यशस्वी हल्ला केला आहे आणि ब-या पैकी रक्तपातही झाला आहे ते.
च्यामारी.. काय कटकट आहे.
त्या छटाकभर मच्छरांची ही हिंमत.
आपणही खडबडून जागे होतो, ढसाढसा पाणी पितो आणि ब्याट कम् तलवार त्वेषाने उपसतो तेव्हा रात्रीचे सुनसान तीन वाजलेले असतात.
बरं मच्छरांचं सैन्य जरी कौरवांसारखं एकजूटीने लढत असलं तरी ज्याला त्याला वैयक्तिक फायदे कळतातच की. आहो शेवटी माणसांच रक्त पिऊ, पिऊ डासं घडलेत की. त्यामुळे काय होतं, आपण बेसावध असलो की जो तो डास गटगट रक्त पिऊन घेतात आणि असले टंब फुगतात की  जीव वाचवायला पळायची काय चार पावलं टाकायची पण त्यांच्यात शक्ती रहात नाही. कुळाचाराचं येथेच्छ जेवलेल्या एखाद्या बामणासारखे हे मच्छरं ठिकठिकाणी घोरु लागतात. नं जीवाची काळजी न जगाची शुध्द. आता आपणही झोपेतच असतो म्हणा तरी शक्तीचं बळ ते शक्तीचच बळ हो !
काय ?
बस ! बेडरुममधले लाईटं ठणठण लावायचे, घ्यायची ती ब्याट कम् तलवार हाती आणि सपासप खतमा करायचा या जडावलेल्या सैन्याचा. या मच्छरांनी देखील अगदी दुष्काळातून आल्यासारखं पी..पी आपलं रक्त पिलेलं असतं. सुस्तीमुळे न त्यांचे डोळे उघडत का न त्यांना चाहूल लागत. पटापट मरतात साले. गनिमी कावा त्यांना येतो तर आम्हालाही येतो म्हटलं.
यशस्वी तलवारबाजी करुन सुखाने झोपायला जावं तर मायला कसची झोप येते आता ?

साला ये मच्छर भी क्या निंद हराम कर देते है।
गड आला पण सिंह गेलाच्या चालीवर
डासांची खांडोळी केली पण आपल्या झोपेचीही शकलं झाली असं खतरनाक वाक्य मनाशी जुळवत झोपेची आराधना करायची न काय !

No comments:

Post a Comment