आपल्याकडे म्हणजे भारतात विविध प्रकारच्या पालेभाज्या वर्षभर ताज्या मिळतात. अगदी कहरी उन्हाळा सोडल्यास. पावसाळ्यात तर रान पालेभाज्यांच प्रांतबरहुकूम उदंड पीक येतं. हिवाळ्यात तर काय भाज्यांची रेलचेलच असते. डॉक्टर्स सुध्दा रोज एकतरी पालेभाजी जेवणात खावीच म्हणतात.
साधारणतः प्रौढ माणसं सगळ्याच भाज्या, त्यातही पालेभाज्या आवर्जून खातात. पण मग प्रश्न रहातो लहान वाढत्या वयाची मुलं आणि तरुण.
तर मुलांना, तरुणांना साधारणतः शेंग भाज्या आणि बटाटेच फार प्रिय असतात. आणि पालेभाज्यात तर पालक-मेथीशिवाय कशाचाही विचार देखील ही मंडळी करत नाहीत. मग घरच्यांनी कितीही विविध प्रकारांनी विविध पालेभाज्या केल्या तरी ही मंडळी ढुंकूनही त्या भाज्याकडे बघत नाहीत. त्यामुळे जरा वेगळ्या वासाच्या, चवीच्या भाज्या असतील तर विचारायलाच नको.
अशीच एक वेगळी भाजी म्हणजे शेपू. 🙂
आजपर्यंत किती जणांनी नाकं मुरडली ?🤔
पावसाळ्यात तरारुन येणारी ही एक हिरवीगार भाजी आहे. आयुर्वेदात हिचं महात्म्य सांगितलेलंच आहे. आणि एकदा का ही भाजी चांगली नाही, फार वास आहे असा हिच्याबद्दलचा मेंटल ब्लॉक काढला तर ही भाजी फार छान वाटते, आवडायला लागते.☺️
तर आज मी शेपूच्या भाजी ऐवजी शेपू पु-यांमधे वापरलाय. मला स्वतःला शेपू फार आवडतो.
मुगडाळ लावून, बेसन लावून, तुरीच्यावरणात शिजवून किंवा नुसतीच परतूनही ही भाजी झक्कास लागते.
पण घरात हे शेपूचे कुठलेच प्रकार न खाणा-यांसाठी शेपूच्या पु-या हा परफेक्ट पदार्थ आहे.🤗
आयुष्यात शेपूकडे नाक मुरडून बघणारे देखील या
पु-या फार आवडीने खातात. म्हणजे शेपूच्या पु-या खाऊन आवडल्या नाही असं म्हणणारी एकही व्यक्ती अजून मला भेटली नाहीये.
अजून काय कौतुक करु शेपूचं ?😀
शेपूच्या पु-या.
बारीक काड्यांचा कोवळा पोपटी( गर्द हिरवा शेपू जरठ असतो, व पचनालाही जड असतो) शेपू निवडून, धुवून घ्या आणि बारीक चिरा. चिरलेल्या शेपूत चवीनुसार तिखट, मीठ, हिंग, हळद, तिळ, जिरे, ओवा टाकून कालवा. मग त्या मिश्रणात दोन हात कणीक तर एक हात बेसन आणि दोन डाव कडकडीत तेलाचं मोहन टाकून पीठ घट्ट भिजवून घ्या.
नंतर मिडियम साईजच्या-जाडीच्या पु-या लाटा आणि मध्यम लालसर तळून घ्या. मस्त टंब फुगतात या पु-या.
या पु-या कैरी-लिंबू लोणचं, सॉस, लोणी, दही वा कुठल्याही चटणीबरोबर छान तर लागतातच. पण मुळात पु-याच इतक्या खमंग होतात की गरमागरम चहासोबत, चहात बुडवून सुध्दा बेस्ट लागतात. येताजाता नुस्त्याही खाल्ल्या जातात.
घरात शेपू न आवडणा-या मंडळींना न सांगता या पु-या एकदा खाऊ घाला आणि बघा.
नाही बहिष्कृत शेपू, सन्मानाने घरात स्थानापन्न झाला तर माझं नाव बदला. 😍
No comments:
Post a Comment