Thursday, 18 October 2018

विजयादशमी..२०१८

दस-याची फुलं आणायला म्हणून सकाळच्या भाजीबाजारात. बाजार भाज्यांपेक्षा झेंडू फुलांनीच जास्त बहरलेला.
नेहमीचे भाजीवाले या ताई, या मैडम करुन हाकारे देताहेत. दोनेक गृहिणी इथे 50 रु. किलो झेंडू कसा तिथे तर ४० ने आहे म्हणत घासाघीस करताहेत. ज्या वस्तूचा, गोष्टींचा धंदाच मुळी काही तासांचा असतो तिथे काय घासाघीस करायची ?
आसपासच्या परिसरातली शेतकरी कुटुंब अक्षरशः रात्रभर झेंडू फुलांच्या पथा-या मांडून तिथेच झोपतात. आपल्यासाठी दहावीस इकडे का तिकडे काही फरक पडत नाही. असो.
आज बाजारात वांगी चक्क विस रुपये पाव.
फारचं महाग आहे हो ?
काय करता ताई दुष्काळ पडलाय.
मन चरकलं.
खरंच दुष्काळ सदृश्य परिस्थिती झालीच आहे. सरकार दरबारीही ओरड सुरु झाली आहे. तरी सर्व सामान्यांनी, तेही शेतक-यांनी दुष्काळाला दुजोरा देणं काळजीत टाकून गेलं. रात्रीसच पहाटेच्या स्वप्नात हिरण्यला पाऊस पडतोय असं दिसलं होतं आणि जीव सुखावला होता. तरी आज ढगाळ हवा आहे.
पाण्याची बोंब तर आहेच. सर्वदूर रखरखाटही झालेलाच आहे. आता पुढचे महिने कसे जाणार ?
घरचं पाणी-बाग, आमच्या हिरण्यचा हुरडा फेस्टिव्हल, आमची झाडं, आमचा महाराष्ट्र दिन आणि शुष्कतेने व रणरणत्या उन्हाने भाजून काढणारा ऊन्हाळा...
कसं निभावणारं आपण ?
सुस्थितीत असलेल्यांची ही कथा तर बाकीच्यांच काय ?
पण खरं सांगू ? सगळ्यांच्याच सुखाची, आलबेलीची झालर असेल तरचं जीवन सर्वार्थाने सुखावह आहे.
तरच त्याला समाधानाची किनार आहे.

सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !

No comments:

Post a Comment