Wednesday, 17 October 2018

दर्शन !

दर्शन !

नेहमीची तरुण, सडसडीत, मनमोकळं बोलणारी कामवाली कामावर. सहसा वरच्याही खोल्या झाडून पुसून घे म्हंटल्यावर तोंड वाकडं करणारी. पण आज नाचतच वर आली. पाहिलं तर भल्या मोठ्या चमकदार कुड्या कानामधे, कपाळाला भगभगीत मोठा कुंकवाचा टिळा आणि चक्क चेह-यावर हसू.
बापरे ! आज कुठे दौरा होता ?
हसून..काकू आज कर्नपू-याच्या देवीला गेल्ते. मैत्रीणीसंग. लगी चारलाच उठलो, आंगोळीपांगोळी केल्या आन पायीच गेलतो सर्व्याजनी. लयीच मस्त वाट्ते सक्काळी दर्शनाला जायाला.
हं तरीच नट्टापट्टा दिसतोय.
काकू मी जरीची पिवळी साडी नेसून गेल्ते, पन आता इथं कामावर कशी नवी साडी नेसाची नां ?

झालं का व्यवस्थित दर्शन ?
मंग ? काकू लगी तिस रुपयात नारळ, कुंकू, हळद, अगरबत्ती घेत्ली द्येवीला वाहाला.
एकटीच गेलीस का ? मुलांना नाही नेलस ?
न्हाई काकू. चारला उठाचं, आंगोळी, परत पायी जायाचं, यायाचं..पोरं किरकिरत्येत. त्यांच्यासाटी रिक्शा, खरेदी आपल्याला बी पुरलं पायजे ना ?

ल्हाना पोरगा लयी रडला घरला आल्यावर की मला जत्रेतून काईतरी खेळनं का न्हाई आनलं म्हणून. मी म्हनलं अरे पैशे नव्हते माज्याकडं. तिस रुप्ये होते त्यांच द्येवीला नारळ चढिवला.
अगं पैसे नव्हते तर नाही देवीला नारळ चढवायचा पण आणायचं मुलाला एक खेळणं.
(माझ्या डोळ्यासमोर नारळं, साडी-खणांच, फुलांच्या वाहाण्याचं-विक्रीचं एक व्यावसायिक चक्र फिरलं आणि शुल्लक खेळण्यासाठी हिरमुसलेले पोरही आलं)
अगं नुस्ती कुंकू अगरबत्ती वहायची देवीला.
ऑं ? असं कसं काकू ? येवढं तं लगी करावंच लाग्ते देवीला.
काकू..समजावलं की समजत्ये माझ्या पोरांना.
जाऊ द्या काकू. किती परिक्षा बघल देवी आपली ?
बग म्हणावं. कदी ना कदी तरी पांग फेडनच आपलं.
तिला बी कळत आसलं ना आपल्यावर्चा अन्याय.
आपलं तं समजा सगळे झालं आता.
पन आता आपल्या लेकराचं चांगलं झालं पायजे. लेकरांसाटीच सगळं सहन करत्ये हो काकू. न्हाय तर काय राम हाये या जगन्यात आन सोंसारात ?
पप्पा नाही, नौरा असा, भाऊपन नाही, भैनीच बी तस्स.

काकू..तुमाला खोटं वाटल पन मी फार भांड्त्ये देवासंग. माझा दोसच काय तू मला असा छळू लागला म्हनून.
कदी कदी लयीच कदरते हो मी. आपली काय बी चूक नाई तरी आपलं नशीब असं.

फरश्या पुसता पुसता एक कोळपलेला जीव मनमोकळं करतोय. किती सहजपणे या महिला आयुष्य आहे तसं स्विकारतात.
प्रेमही तसचं, शिवीगाळ-भांडणतंटाही तसाच आणि भक्तीही तशीच.
अशा निरलस भक्तांमुळेच देवसंस्थानं भरभराटीला येताहेत. यातलं दुष्ट चक्र, पिळवणूकीचं षडयंत्र माझ्या बुध्दीला जाणवतय.
पण अगतिकपणे का होईना पण हे असं देवाला निरागसपणे जाब विचारणा-या मनाचं दर्शनही कुठेतरी जीवाला श्रांत करत आहे.

No comments:

Post a Comment