काही जणांना रोजच्या स्वैपाकातसुध्दा रेडीमेड मसाले वापरायची भारी सवय असते. धावतपळत नौकरी करणा-यांना, कधीही न सांगता येणाऱ्या पाहुण्या-राऊळ्यांच घर असलं की हे रेडीमेड मसाले फार कामास येतात. पण रोजच्या स्वैपाकात पण आधीच करुन ठेवलेले मसाले वापरणं मला तरी खटकतं. परत तयार मसाले असले की स्वैपाकही एकाच चवीचा वाटायला लागतो.
असो. ज्याची त्याची मर्जी.
सणासुदीचे दिवस आहेत. कधीही, कुणीही पाहुणे येऊ शकतात. दिवाळी जरी चार दिवसाची असली तरी एकदोन आठवडे मेजवान्या, गेटटुगेदर्स चालूच रहातात. अशावेळी जरा हाताशी तयारी असावी म्हणून काल चिंचेचा सॉस करुन ठेवला आणि आज इडली-सांबार मसाला तयार करुन ठेवला. चिंचेचा चटपटीत सॉस तयार असला की कुठलीही डिश झटपट चटपटीत करता येते.तसच इडलीही महिन्यातून दोनतीनदा होतेच. सांबार मसाला तयार असला तर गरमागरम सांबारचा घाटही झटपट निभावता येतो. साधारण चारवेळा वापरता येईल एवढा मसाला मी तयार करते आणि डीप फ्रिजमधे ठेवते.
चिंचेचा सॉस.
दोनतीन बचकाभर चिंच धुवून रात्रभर भिजत घालावी. त्याच बरोबर दहाबारा खजूरही भिजवावे. दोन्ही गोष्टी रात्रीतून छान भिजतात. मग सकाळी भिजलेल्या चिंचेतल्या आणि खजूरातल्या बीया, दोरे काढून वेगवेगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. वाटलेली फक्त चिंच नंतर गाळणीने गाळून घ्यावी व कढईत ते मिश्रण गरम करायला ठेवावे. उकळी आली की अर्धा ग्लास पाणी टाकून आणि आवडीप्रमाणे गुळ टाकून मंद आचेवर चिंच शिजू द्यावी. यातच नंतर वाटलेला खजूरही टाकावा. तसेच अंदाजाने धणे, जिरे, मिरे, लवंगा, दालचिनी आणि कमी प्रमाणात बडीशेप मिक्सरमध्ये वाटावी आणि ही पावडर उकळत्या चिंचेत टाकावी. अंदाजाने व आवडीप्रमाणे तिखट, मीठ टाकावे, गुळ टाकावा आणि चांगल्या दोनतीन उकळ्या आल्या की गॅस बंद करावा. घट्टसर शिजलेला हा सॉस गार झाला की बाटलीत भरुन फ्रिजमधे ठेवून द्यावा. लागेल तसा हा घट्ट-पातळ सॉस वापरावा. झटपट चाटचे पदार्थ करताना हा सॉस खूप सोईचा पडतो. वेळेवरची मेहनत वाचते त्यामुळे मेन्यू ठरवायचं दडपण येत नाही.
सांबार मसाला.
दोन मुठी धणे, एक मुठ प्रत्येकी उडीद आणि चणा डाळ, एक मुठ किसलेलं खोबरं, मुठभर हिरवा कढीपत्ता, एक मोठा चमचा जिरे, अर्धा चमचा लवंगा, दालचीनी, मिरे, पाव चमचा मेथी दाणे आणि चार पाच सुक्या मिरच्या. सगळं साहित्य एक डाव तेलावर खमंग परतून घ्यायचं आणि गार झालं की मिक्सरवर बारीक वाटून घेतलं की झाला सांबार मसाला तयार.
एक लिटरभर पाण्याच्या सांबारात चार चमचे हा तयार मसाला घातला की सांबार झकास लागतो.
इडली-सांबार-चटणी हा प्रकार करायला सोपा असला तरी जरा आधीपासूनच याची तयारी करावी लागते नसता गडबडच होते. विशेषतः चिंच भिजवणे आणि तूर डाळ गाळ शिजवून घेणे वगैरे कामं. अशावेळी हा तयार सांबार मसाला वापरणं फार सुखाचं वाटतं.
करुन बघा. आवडेल सगळ्यांना.
No comments:
Post a Comment