गेल्या फेब्रुवारी पासून मी नियमित योगासनांच्या क्लासला जाते. आठेक वर्षांपूर्वी झालेल्या चिकन गुनियापासून माझं घरच्या घरी योगासनं करायचं जे थांबलं होतं ते थांबलच. चालणं मात्र भरपूर आणि रेग्युलर चालूच होतं. पण मागच्या हिवाळ्यात महाराष्ट्र टाईम्सने ऑर्गनाईझ केलेल्या हैपी स्ट्रिटमधे 15-20 दोरीवरच्या उड्या मारायचं निमित्त झालं बहुदा आणि माझ्या टाचा ब-याच दुखू लागल्या आणि माझं सकाळचं तासाभराचं चालणं मला बंद करावं लागलं.
कळेचना कशामुळे काय झालय म्हणून ? टाचेच हाड वाढलं असेल म्हणून तीही तपासणी केली पण काहीच तसं निघालं नाही. चपला बदलल्या, बुट बदलले पण टाचा म्हणजे टाचांच्या वरचा नळीसारख्या भागाजवळचा भाग दुखणं काही थांबलच नाही.
मध्यंतरी म्हणजे वर्षभरापूर्वी घरीच जरा योगासनं केली तर जो डावा दंड-खांदा दुखायला लागला की विशिष्ट अँगलने हात-दंड वळवताच येईना. तोही एक नवीनच प्रॉब्लेम सुरु झाला. टाच दुखीमुळे सकाळचं चालणं नाईलाजाने थांबवावं लागलं आणि इकडे दंडाचा मसल् जाम दुखावला गेला त्यामुळे घरची योगासनंही थांबली आणि मी खडबडून जागी झाले.
तसही आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर चालणं महत्वाचंच आहे. आणि मला तर चालणं, मॉर्निंग वॉक म्हणजे तर टॉनिकच आहे.
It gives me lot of energy and nutures my creativity.
अक्षरशः झोप उडाली या टाचांमुळे.
चालणं नाही म्हणजे काय ? आक्रीतच हो !
वाढतं वय, वजन आणि मेनोपॉजमुळे कंटाळ्यानी जगण्याला घेरलं होतचं. रोजच्या कंपल्सरी हालचालींशिवाय काहीच व्यायाम, हालचाल होईना. त्यात झुकेरबर्ग या व्याह्याने धाडलेलं फेसबुक नावाचं घोडं होतच हातात चोवीस तास. तासंतास बैठक व्हायला लागली. स्वतःहून काहीही करावसं वाटेना. अर्थात compared to others Hiranya keeps us damn fit. तिथे चालणं व्हायचच. पण या टाचांमुळे जरा अवघडलेपण आलं त्या चालण्यात. खूप दिवसांनी भेटणारे विचारू लागले की तुला चालायला त्रास होतोय का ? का अशी अवघडून चालत आहेस ?
त्या मॉल्सच्या गुळगुळीत फरश्यांवर चालणं म्हणजे तर गोरी चलो ना हंस की चाल अशी अवस्था व्हायला लागली. मग सगळा सारासार विचार केला, धोक्याची घंटा ऐकली आणि तातडीने निर्णय घेतला आणि प्रख्यात योगाक्लासला नाव नोंदवलं. माझ्या मैत्रिणीचाच आहे हा क्लास. जवळच आहे.
आमच्या एडव्हान्स्ड बॅचची वेळ मध्य सकाळची. सकाळच फेसबुक, घरातली कामं सोडून जरा अडनिड्या वेळेवर जायला जीवावर यायचं पण इलाज नव्हता. जायलाच लागले.
नवीन नवीन तर वज्रासनात, मांडी घालून देखील दहा मिनिटं बसता यायचं नाही. शरीर लवायचं नाही, वळायचं नाही. खूप अवघडून जायचं.
म्हणजे आत्तापर्यंत सराईतपणे योगासनं करणारं आपलं लवचिक शरीर इतकं स्टिफ झालेलं पाहून चिडचिड व्हायची. आपणच दुर्लक्ष केलं याचाही राग यायचा.
पण हळूहळू जरा सुधारणा होऊ लागली. कंबर वाकू लागली, हातपाय वळू लागले आणि उत्साह वाढला. आसनांमधे पण परफेक्शन येऊ लागले. हालचालीत चैतन्य आले पण टाच दुखी अधूनमधून जाणवूच लागली.
एकूणच पन्नाशीपुढे आपली शरीरयंत्रणा तरुणपणासारखीच सुरळीत चालवत ठेवणं फार कठीणही आहे पण गरजेचही आहे.
Health is wealth हे याच वयात फारच जाणवत रहातं. नेमकं याचवेळी आपणही आता आपल्यासाठीच जगायच ठरवलेलं असतं. आयुष्याच्या याच टप्प्यावर आपण भरपूर पर्यटन करायचे बेत आखायला लागतो.
पण बरेचदा या असल्या शारीरिक अडचणी मानसिक खच्चीकरण करतात. कुठलाही आजार नसताना फिटनेस कमी होण्यासारखं दुःख नाही. हे आपल्याला जमेल का, झेपेल का सारखा जीव जाळणारा प्रश्न नाही. हे असले विचार करावं लागणंच काळीज कुरतडून टाकतो.
पण हा योगासनांचा क्लास केल्यामुळे बराच फरक पडला. गेल्या नऊ महिन्यांच्या कालावधीतील क्लासच्या व माझ्या सुट्ट्या धरुन 150 दिवस योगासनं नियमित केली गेली. या 5 महिन्यात शरीरात बरीच लवचिकता आली. टोनिंग झालं आणि मुख्य म्हणजे मनात आणलं आणि नियमित राहिलो तर आपण नक्कीच पुर्वीसारखी आसनं करु शकतो हा विश्वास आला. प्राणायमाच्या अभ्यासामुळे श्वसनमार्ग मोकळा होऊन डोकं धरणं, दुखणं कमी झालं. सायनसायटीसचा त्रास कमी झाला. ग्रुपमधे योगासनं करत असल्यामुळे एकमेकींचा सराव बघून, फिटनेस बघून अजूनच स्फुरणं चढू लागले. एकेकाळच्या आपल्या हुकमी पण ऍडव्हान्स्ड 10 आसनांपैकी 7-8 आसनं व्यवस्थित जमू लागली.
अजून काय पाहिजे ?
योगाभ्यास हा तुमच्या जगण्याचा way of life झाला पाहिजे म्हणतात. ते अत्यंत खरं आहे. कुठल्याही रोगावर योग आभ्यासक रामबाण उपाय देत नाहीत. पण शरीरातील चापल्य, लवचिकता, मसलस्चे, हाडांचे स्ट्रक्चरल दोष काहीप्रमात नक्कीच बरे होतात. बहुतांश रोगांच, व्याधींच मुळ असलेली आपली पचनशक्ती सुधारते. प्राणायमामुळे श्वसनक्रिया सुधारुन त्याचे फायदे होतात. एकूणच आपण आपल्या अंतर्बाह्य आरोग्यासाठी सजग होतो आणि तसे प्रयत्नही करु लागतो. वयाच्या या टप्प्यावर it acts like a booster.
केल्याने होतची आहे आधी केलीचे पाहिजे हे पटतं. मुख्य म्हणजे पुढील संभाव्य शारीरिक व्यांधींशी आपण मनात आणलं तर टक्कर देऊ शकतो हा विश्वास या योगाभ्यासाने येतो. माझा दंड 90% बरा झाला. टाचा मात्र नाही. Inflamed tendon साठी मला दुसरी थेरपी अबलंबवावी लागणार आहे.
पण तब्बल दहावर्षांच्या गॅप नंतर पन्नाशीच्या पुढची मी, आमच्या वर्गातली एक उत्तम आसनं करणारी विद्यार्थिनी आहे असं आमच्या विख्यात शिक्षिकेचं मत आहे.
अजून वेगळा तो बुस्टर काय असतो हो ?
No comments:
Post a Comment