Wednesday, 10 October 2018

खेळ मांडियेला...१

निर्मितीची अनन्यसाधारण क्षमता असलेल्या सृजनशील स्त्री शक्ती समोर खरोखर नतमस्तक व्हायला होतं. खरंतर पुरुषशक्तीही तोडीस तोड सृजनशील असते. पण या दोघांमधे स्त्रीजातीच्या ममत्वाचा, सहनशीलतेचा आणि उदारपणाचा अपर हॅन्ड आहेच आहे.
मला मानवाचं आणि निसर्गाच अतूट नातं फार लोभस वाटतं. जगण्यातल्या, संघर्षातल्या असंख्य गोष्टी आपण निसर्गाकडूनच शिकतो, उचलतो. पण आपल्या कलात्मकतेच्या विरंगुळ्याच्या गोष्टीतसुध्दा निसर्गच सतत डोकावत असतो. मग ते डोक्यात फुलं माळण्याचा, गळ्यात जोंधळ्याची, गहू मण्यांची माळ घालण्याचा, दंडात नागाचं वेटोळं घालण्याचा वा शय्येवर सुगंधी फुलांचा सडा टाकण्यासारख्या शृंगारीक गोष्टी असू देत वा आपल्या मनोरंजनासाठी शोध लावलेले खेळ असू देत. आपल्या जगण्यात ठाईठाई निसर्गच आहे. अक्षरशः आपल्या जगण्यातलं हे पदोपदीचं निसर्गाच असणं आपण काढून टाकलं तर कल्पनाही करवत नाही असं भकास आपलं आयुष्य होईल. निसर्गाची कास धरल्याशिवाय आपल्याला गती नाही.
पुरुषशक्ती पेक्षा स्त्री शक्ती मला जास्त निसर्गाच्या जवळची, निसर्गाशी जास्त घनिष्ठ संबंध असलेली वाटते.
आता हेच बघा आपण बालपणीचे कितीतरी खेळ निसर्गातल्याच गोष्टी आणि माणसाची बुध्दीमत्ता वापरुन तयार केले आहेत. हे सामान्य खेळ इतके बेमालूमपणे आपल्या आयुष्याशी एकरुप झालेले आहेत की दूर जाऊन त्रयस्थपणे या खेळांकडे बघायचं असतं, या खेळांनी आपल्याला काय दिलं, काय शिकवलं हे जाणून घ्यायच असतं हेच आपल्या लक्षात येत नाही. बालपणीचा अविभाज्य भाग असलेले हे खेळ आता नुस्ते आठवले तरी खुदकन हसू आल्याशिवाय रहात नाही.
काय ते खेळ शिकणं, मग काय ते त्या खेळात प्रविण होणं, काय ते जिंकणं, काय ते हरणं-हरवणं, काय ती इर्षा, काय ते डावपेच, काय ते खट्टू होणं, काय ती भांडणं आणि काय ते एकमेकांना सांभाळून घेत निरागसपणे परत मैत्रीचा हात पुढे करणं. हे खेळ म्हणजे पुढील जगण्याची एक हसत खेळत केलेली मिनियेचर ड्रेस रिहर्सलच असायची नाही ?
चला तर मग सैर करु या अशा खेळांची.

पुराण काळापासून, शिव-पार्वतीपासून सर्वांनाच आवडणारा खेळ म्हणजे चौसर, चंपल, चरलं साठ..अशी अनेक नावं असलेला हा खेळ. कमीतकमी दोघं किंवा जास्तीत जास्त चौघं खेळू शकतील असा. पाच ऊभ्या, पाच आडव्या रेषांनी केलेला चौकडीचा चौकोन. चौकोनाच्या चारी बाजूंपैकी एकेक बाजू एकाची. चौघांना चार प्रकारच्या पण प्रत्येकाला एक सारख्या चार सोंगट्या, प्यादी म्हणून. आणि दान पाडायला कधी कवड्या, कधी फोडलेले चिंचोके, बिट्ट्या नसता दानाच्या संख्या असलेल्या ठोकळेबाज गोट्या वापरायच्या. आणि प्यादी म्हणून काय वापरायचं तर विविध डाळी, बीया, फुलं, एकसारख्या छोट्या काड्या. थोडक्यात मैत्रिणी कुठेही जमल्या तरी खेळासाठी काहीच अडू नये इतका हा खेळ सुटसुटीत असतो. जमिनीवर, फरशीवर कोळश्याने चौसर मांडलं, एकसारख्या चार-चार सोंगट्या-प्यादी मिळाली आणि दानासाठी चिंचोके मिळाले की सुरु खेळ.
प्रांतवार खेळाची पध्दत थोडीशी बदलते, नियमही कडक होतात. पण जिंकण्याची, हरण्याची रीत तीच रहाते. पटापट दान पाडून घ्यायचं आणि चौकोनात गोलाकार फिरत फिरत आपल्या सगळ्या गोट्या मधल्या घरात पोहंचवून द्यायच्या. जो चारही प्याद्यांसह मधल्या घरात आधी पोहंचला तो जिंकला. अर्थात वाटतो तसा हा प्रवास सुखाचा आणि सुरळीत नसतोच हं. खेळ सुरुच करायला मुळी आधी हुकमी दान पडलं पाहिजे. फिरताना शक्यतो गुणाकाराची खुण केलेल्या सेफ घरातच आपण जायला पाहिजे. नसता मागच्याची प्यादी आपल्याला मारायला टपलेलेच असतात. अर्थात आपणही चलाखीने इतरांच्या प्याद्यांना परत परत स्वघरी पाठवू शकतोच म्हणा. 😉
सतत बुध्दीला जागृत ठेवणारा हा खेळ आहे. स्वतः व्यतिरिक्त इतर तिघांच्या खेळीचही व्यवधान ठेवावं लागतं. प्रतिस्पर्ध्याला जोखत पडेल त्या दानावर आपले डावपेच आखावे लागतात. हुकमी दान पाडून घ्यायचही कसब आत्मसात करावं लागतं. संख्येची गणना फटाफट करता यावी लागते आणि मुळात हरण्याकडे-जिंकण्याकडे एका दिलखुलासपणे बघायची वृत्ती अंगात बाणवावी लागते. हे झालं खेळाचं.
पण खेळण्यासाठी जे साहित्य लागतं ते जरी बघीतलं तरी अचंबित व्हायला होतं. मातीत रेघोट्या मारुन, फरशी, दगडांवर कोळश्याने रेषा मारुन चौसर मांडता येतो. अजिंठा-वेरुळच्या आणि इतरत्रच्या काही लेण्यात तर फरशीवर हा चौसर नंतरच्या पुर्वजांनी कोरुन ठेवलेला दिसतो. आणि प्याद्यांसाठी म्हणाल तर धान्य-बीया-डाळी-कडधान्य-काड्या-फुलं-फळं-शंख-शिंपले-दगड-काचतुकडे, मणी..अगदी काहीही वापरता येतं.
म्हणजे आहे त्या ठिकाणी निसर्गातलेच घटक घेऊन खेळ मांडायचा आणि उत्क्रांत झालेल्या मानवी बुध्दीने मनाचं मनोरंजन करणारा, बुध्दीला तल्लख करणारा खेळ सवंगड्यांबरोबर खेळायचा.
आहे की नाही गंमत ?

No comments:

Post a Comment