Wednesday, 10 October 2018

जागर देवीचा...


आज आमची स्वैपाक करणारी सारिका लवकरच आली. चौकशी केली तर ताई आज नवरात्र बसवायचं आहे ना म्हणून मग लवकरच आले. अगं पण तू सकाळीच नवरात्र नाही बसवलंस का ? आता असं चार घरची कामं करुन नवरात्र बसवलेलं चालतं का ?
आता चालत नाही तसं. पण आपली पण कामं असतात ना ? आणि देवीच करायला दोनतीन तास लागतात. मग इतकं सगळं सकाळी थोडीच होतं. आता पटापट कामं करुन जाणार आणि दुपारपर्यंत नवरात्र बसवणार.

बापरे ! दोनतीन तास काय असतं एवढं ?

देवघरापासची सगळी साफसफाई करायची. देवपाट धुवून घ्यायचा. ते मी कालच केलय. आमच्याकडे मुखवट्याची देवी असती ताई. देवीला दुधपाण्याची आंघोळ घालायची. नवीन वस्त्र चढवायची. अत्तरात कालवलेला शेंदूर तिच्या चेह-याला लावायचा. आधी गंध मग त्यावर कुंकू लावायचं. भांगात गुलाल भरायचा. ओठांना पण कुंकू लावायचं.

ओठांना कुंकू ? लिपस्टिक सारखं ?

हं..छान दिसतना ते. मग देवीला डागिने घालायचे. मंगळसुत्र, ठुशी, नथ, कानातले घालायचे. आमच्याकडे तर कानातले सोडता बाकीचे डागिने सोन्याचेच आहेत. फुलं वहायची, गजरा लावायचा देवीला. शेंगदाणा-साबुदाण्याचा लाडू, राजगि-याच्या पीठाचा शिरा असा नैवेद्य देवीला दाखवायचा आणि मग आरती करायची. नऊ दिवस अखंड दिवा तेवत ठेवायचा. नऊ दिवस उपास करायचे. सकाळ-संध्याकाळ आरती करायची. रोज उपासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा.
सप्तमीला आम्ही भजन करतो. १५-२० बायका येतात. मग त्यांची ओटी भरायची, त्यांना दुध द्यायचं.
अष्टमीला दुध-ड्रायफ्रूट्सच्या पायसचा नैवेद्य असतो देवीला. फुलोरा पण अष्टमीलाच करतो.
११ पु-या रव्याच्या, ५ चुडे (म्हणजे बांगड्या)
२ खोब-याच्या वाट्या, २ वेण्या, ५ मुरडलेल्या साखर करंज्या असतात.

बापरे खूपच असतं की. आणि वेणी म्हणजे गजरा का ?

नाही ताई..आपल्या वेणीसारखी तिपेडी वेणी घालायची कणकेची आणि तळायची.
मग नवमीला साग्रसंगीत कुलाचार असतो. सवाष्ण-ब्राह्मण जेवू घालायचे. कुमारीकेलाही मान असतो आजच्या दिवशी. पुरणावरणाचा स्वैपाक करायचा. देवीला पुरणाचा नैवेद्य दाखवून जेवणं झाली की झालं नवरात्र.

अच्छा..म्हणजे पुरणावरणानी उपास मोडायचा ?

मोडायचा नाही ताई..सोडायचा ! 🙂
ताई तुम्ही कोकणस्थ का ? त्यांच्यात खड्यांच नवरात्र असतं ना ?
हं मी ना माहेरुन देशस्थ, पण आडणाव क-हाड्यांच आणि वळण कोकस्थांसारखं. माझ्या सासूबाई कोकणस्थ, सासरे क-हाडे. एकूण सरमिसळ आहे. तू ते एकमाळ, दोन माळ असं नवरात्र नाही वाटतं करत ?
अहं..आमच्याकडे माळेचा प्रकार नाही. तुम्ही या ताई माझ्याकडे दर्शनाला.
हो..येईन की. भजनाला पण येईन.
अरेवा. मग तर अजूनच चांगलं. 🙂😃

माझ्या माहेरी कधी नवरात्र केल्याचं, केल्याचं कानावर आलेलं सुध्दा आठवत नाहीये. आई उपास करायची का नाही हे ही आता आठवत नाही. माझ्यासाठी नवरात्र म्हणजे औरंगाबादची कर्णपू-याची जत्रा. या नऊ दिवसात निदान एक दिवस तरी पहाटे ५लाच उठून आंघोळी उरकून, झुंजूमुंजू वेळेला कर्णपूरादेवीच्या दर्शनाला मैत्रिणी मिळून पायी जायचं. सो कॉल्ड दर्शन घ्यायचं. कपाळावर ओम आकाराचं पांढूरकं गंध छाप्याने रेखून घ्यायचं. असलाच वेळ हातात तर या निमित्ताने भरणाऱ्या जत्रेतून लाल चिंचा, पिटपिट्या, आणि रबराचे योयो झटपट विकत घ्यायचे.
भरभर घरी यायचं आणि परत पायीच शाळेला पळायचं. आणि मोठ्या दिमाखाने आपलं गंध शाळेत फुशारकीने मिरवायचं. मीठ लावून लाल चिंचा मैत्रीणींसोबत चटकमटक खायच्या. चिंचा ओठांवरनं फिरवून ओठ लाल करायचे. आपण कसे दिसतो हे मैत्रीणींना विचारायचं. हे उद्योग मुलींचे.
मुलं ललाटभरचं गंध मिरवणार आणि अख्खी शाळा त्या पिटपिट्यांनी-पिपाण्यांनी दणाणून सोडणार. एकमेकांना योयोनी नेम धरत मारणार. थोडक्यात अख्ख्या शाळेला कळलं पाहिजे की तुम्ही पहाटेसच काय तीर मारुन आला आहेत ते.
पण मग एखाद्या निवांत दिवशी या जत्रेत दुपारी जायचं आणि धम्माल करायची जीवाची. परत चिंचा, आवळे, पिटपिट्या, योयोंची खरेदी. लाकडी रहाट पाळण्यात, मेरी गो राउंडमधे बसायचं. असलाच तर बाईस्कोप बघायचा. विजेच्याही पाळण्यात बसायचं. बुढ्ढी के बाल, भेळ आणि चोकोबार अशी मेजवानी हादडायची आणि थकूनभागून घरी यायचं. हा नियम इतका घट्टमुट्ट होता ना की आजही नवरात्र म्हटलं की मला त्या जत्रेतल्या लाल चिंचा आणि पिटपिट्याच आठवतात.

वर सारिकाने दिलेली माहिती छान वाटते. ज्यांनी ती प्रसन्नता वर्षानुवर्षे अनुभवली आहे त्यांनाही अशा नवरात्रीच्या छान आठवणी असतील.
हल्ली सोशल मिडियावरनं तर इतक्या शुभेच्छा येतातनं नवरात्रीच्या की बाप रे बाप.
देवीची अनेक रुपं. भाग्य देणारी, आरोग्य देणारी, सौख्य देणारी, धन देणारी, शत्रुचा संहार करणारी.
सृजनशील स्त्रीयांची अनेक रुपं. विचार करायला गेलं तर सर्वकल्याणकारी आशिर्वाद देणारी मॉं देवी.
वेळ पडल्यास अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आणि संहारालाही मागेपुढे न बघणारी.

देवीची उपासना करताना, तिला वंदन करताना तिच्याप्रतीचा आदरणीय भाव मनी असणं योग्यच आहे. पण हल्लीच्या जगण्यात खरोखरच न्यायीपणाने स्त्रियांना वागवलं जातय का, असा विचार मनामधे आल्याशिवाय रहात नाही. आणि एखादी उठलीच रौद्र रुप धारण करुन तर तिला पाठिंबा मिळतोय का? न्याय मिळतोय का ? हा विचार अस्वस्थ करतो.
नेमकच बोलायचं तर चित्रपट तारका तनुश्री दत्ताने एका संघटीत पुरुषी वृत्तीवर केलेला आरोप मनाला फार सलतोय.
काही वर्षांपूर्वीची ही घटना आहे. चारदोन पुरुषांनी समजून उमजून या गोष्टीकडे कानाडोळा केला. पण आशादायी एक गोष्ट नजरेत आली की तनुश्रीच्या निमित्ताने अनेक दिग्गज स्त्री कलावंत आता बोलक्या झाल्या आहेत. तिच्या सपोर्टसाठी पुढे आल्या आहेत आणि मोकळेपणाने सिनेक्षेत्रातल्या महिलांच्या अन्यायाविरुद्ध बोलू लागल्या आहेत.
एकेक करुन ब-याच कलावंत महिला तनुश्रीच्या निमित्ताने अन्यायाला वाचा फोडत आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे संघटीत अन्याय होत असेल तर संघटीत वाचासुध्दा फोडली जात आहे हे फार स्पृहणीय आहे, हा जागर आशादायी आहे.

पल्ला दूरचा आहे, रस्ता तर अवघडच आणि संघर्षमय आहे. पण एकमेकींची साथ असेल तर काहीच अवघड नाही.

No comments:

Post a Comment