Tuesday, 9 October 2018

जावे चाळीशीच्या वंशा...

मंडळी कुठलीबी, कोन्तबी स्थित्योंतर, बदलाव मान्य कराया गेलं की खडखड ही व्हतेच. त्यातही हाये त्यापेक्षा सरस बदलाव अशेल तर गोष्टी चट बिनबोभाट व्हतात. पन त्योच बदलाव जर आपली कमकुवत, उतरती स्थिती दर्शवनारा असला तर पैल्यांदा लयीच वैताग येतो. कोड्यात टाकलं का राव म्या तुमाला?
जावू द्ये ताकाला येऊन भांडं का लपवायच बरं ?
तं गोष्ट हाये रसरशलेल्या, तजेलदार आन सुदृढ जवानीतून प्रौढपणाकडे जान्याची, वय जास्त होन्याची आन ते शरीरावर जानवन्याची.

पैली गोष्ट ऐन पंचवीशीतच डोक्यात ठान मांडून बसनारे चुकार चारदोन रुप्येरी केस. पैल्या प्रेमप्रकरनासारखं पैल्या रुप्येरी केसांबद्दल चारचौगात अपुर्वाईने सांगाला कवतिकंच वाट्ते. वय पन अल्लडच असतैय आन पुढं काय वाढून ठेवलय याची जर्राही जानीव नस्ते. पन हे रुप्येरी केसं जेव्हा एकाचे दोन, दोनाचे चार आन चाराचे आठ या गतीने वाढीतंच जातात तवा लगी धाबंच दनानतं. मग म्येंदीचे प्रयोग करुन लपवालपवी कराचे प्रयत्न व्हतात. पन नंतर त्येही प्रयोग त्वोकडे पडू लागल्ये की पितळ स्वॉरी रुप्येरी पट्टे उघडे पडायला वेळ लागत न्हाई. भईंकर अस्वोस्तता येती या येळी जीवाला. जास्तकरुन महिला मंडळाला. काय हे यवढी तरुन, जेमतेम पस्तीशीची बाय, दोन लहान लेकरांची माय आन केसं मात्र पांढर्रे ?
समाज तुमाला जसं काही बरं वाईट द्येत असतो तस्सचं समाज तुमच्याकडनं कायतर्री चांगल्याची अपिक्षाही करीतंच असतो. त्या काईतरी मधली यक गोष्ट म्हंजी तुमचं दिसनं, तुमचं राहनं. चटपटीत, कामसू बाईमान्साकडून तर ब्येष्ट, टंच दिसन्याच्या फारच अपेक्षा असत्यात हो.
जसं साळेकडून धावीतल्या हुकमी च्यारदोन हुश्शार पोट्ट्याकडनंच म्याट्रिकच्या मेरीटची छातीठोक अपिक्षा असती तश्शीच सुंदर रुपाची, रसरशलेल्या तारुन्याची..थोडक्यात सदाबहार नवलाखी रुपाची अपिक्षा कायमच सर्व्या महिलांच्या बाबतीत समाजाकडून केली जाती हो.
म्हंजी ऋतू कुठला का अशेना, अवर्षण-फवर्षण काय पन असू देत..बाग कशी फुललेलीच व फुलं कशे टवटवीतच पायजे या न्यायाने या अपिक्षा असत्यात.
चूक काय वं त्यात ? काय पन व्हऊ द्या पन फुलं नेह्मी तजेलदारच, नेत्रसुखदच पाईजेत !
नस्ता फुलांच महात्म्य त्ये काय ? बरोबर की नाई ?
आवो काय शुल्लक गोष्ट सांगत बसलो म्हनुन हसन्यावारी न्येऊ नका. सुंदर दिसन्याच्या खटाटोपापायी दुनियेची अख्खी बाजारपेठ लगी रसरशलेली हाये, वसंडून व्हाते हाये. आहात कुटं तुमी पाव्हनं ? जर का एकादी जादूची कांडी फिरली आन सुंदरच, तरुनचं दिसन्याचं-बघन्याच खुळ जर तमाम पब्लिकनं आपल्या डोक्यातून काडून टाकलं तं जगभर्चे आर्थिक डोलारे भुकंप, त्सुनामीसारके भईंकर आक्रीत आल्यासारके धडंधडं कोसळतेल.
समिजलं का ? वाट्ते तशी छोटी गोष्ट नाहीये ही भाऊ.
आवो मी म्हन्तो जग, समाज गेला चुलीत. पन डोईवरचे दहावीस रुप्येरी केसं सुध्दा बाईच्या जीवाची झोप उडीवत्यात. मानशिक स्वास्थ सुद्दा थेट बिघडवित्यात ह्ये चांदी चोर.

विषयांतर व्हायलंय का ?
आता इथवर वाचलंतच ना आता पुढचंही वाचा की.

हं..तर काय सांगत व्हतो ? आपल्या उमरची जानीव करुन देनारे रुपेरी केस. तर म्येंदीचे प्रयोग तोक्डे पडाया लागले की त्ये डाय का फाय घ्येऊन बाजारपेठ लगी तय्यारच अस्ती. मंग तं काय इचारायलाच नको. म्हंजे इकडं त्वोंडाचं बोळकं जरी झालं तरी डोस्क मात्र काळंभोर ठेवायचं, कराचं सोयच झाली हाये आता. म्हंजी तारुन्याच्या यका शत्रुचा निदान दार्शनिक नायनाट करन्यात तरी आपन सर्वे यसस्वी झालो आहोत.
पन मंग रुप्येरी केसांप्रमानंच चाळीशीत हमखास लागना-या चस्म्याचं काय ?

आयला !
त्यो चस्मा म्हंजे तुझं माझं जमेना तुझ्या बिगर करमेनासारखं अवघडच काम किहो. बरं चस्म्याचा संबंध लगी डायरेक्ट शिक्षनाशी, सुशिक्षितपनाशी.
बरं म्या म्हन्तो तेही शानपन गेलं बोंबलत पन मंग ते सोसल मिड्यावर कसा उजेड पडल आपल्या ज्ञानाचा, इचारांचा ? म्हंजे किती बी चडफडाट झाला तरी बी आपल्याच सुखासाटी, मनस्वास्थ्यासाटी, वॉट्सेपसाटी तरी ऐनक लगी लावावाच लागीतो. तिथं हयगय चालतच नाई.
मंग तो जवळचा चस्मा असो वा दूरचा असो चस्म्यासिवाय गती न्हाई. ते बी भर ज्वानीत ?

आता काई लोकं करतेत ऑप्रिशन वगेरे पन डोळ्यांशी खेळन जरा बेतानच करावं राव. सेवटी काय ते विंग्रज म्हन्त्येत तसं ब्युटी लायीज यीन द आयीज आफ द बिओल्डर..त्येच खरं. डोळे बर्बाद म्हन्जे आविष्यातलं सौंदर्य बर्बाद. समजलं ?

बरं लागला तं लागला चस्मा. पन त्या चस्म्याशी आडजस्ट होनं म्हंजी बेक्कार काम. यक परीस
सासा-सूना, बाप-पोरगं यकमेकांशी आडजस्ट व्हतील पन चस्म्याशी लगी झापकन आडजस्ट व्हनारा जलमायचा आजून.
बरं हल्ली फ्याशनी पन आशा हाईत ना की इचारायची सोय न्हाई. वाचाचा चस्मा यगळा, टीव्ही-शिणेमे बघाचा यगळा, घरातला यगळा, बाहिरचा यगळा. 
आता चाळीशीतलं सोंसाराला, दुनियेला कावलेलं मानूस किती चस्मे सांबाळेल हो ?
म्हन्जे अगदीच वढूनतानून इनोदी बोलाचं तं यकपरीस दोन बायका सांभाळनं सोप्प हाये पन त्ये द्योनतीन चस्मे नगं.
तरी बरं आता त्ये बायफोकल का वोकल चस्मे मोप निगालेत. डोळं खाले केल्ये की वाचाचं आन डोळं वर केल्य की सौंदिर्य टिपाचंच काम हो. पन पुन्ना येक फजिती व्हती आपल्या पुर्शांची. आता चारचौगात बसले आन आपन आपले वाचाला इकडं-तिकडं बगायला डोळं वरखाले केल्ये की बाईमान्साला यगळाच सोंशय येतय.
परवाच मपल्या साल्यान मारुतरावानं लय मार खाल्ला लोकाईच्या हातचा. आता मारत्याच्या लगिनाला विसवर्स झालीता. मागल्या वर्सी पोरगी उजवली आन पोरगं आता शेहरात इंजेनियर बनू -हायलं. म्येव्हनीला दुखतं म्हनून यकलाच भागवताला जाऊन बशीला तो. आता ह्यो चस्मा घालून बशिला माऊली वाचायला. आता त्यो चस्मा म्हंजी प्वोराच आयकुन घेत्येला. बायफोकील म्हने. आता वाचायला बशीलं तं ह्यो लागलं न डोळं वरखाले कराला. आता या चस्म्याला ह्यो पठ्ठ्या आडजस्ट व्हयीस्तवर यका पोट्टीने ठोकली नं बोंब ह्यो मानुस मला इशारे करु -हायला म्हनून. मंग काय जमली लगी चारदोन जवान पोरं आन केली नं मारत्याला धक्का बुक्की. मंग काय आलं नं घरला गपचिप. घेनं ना देनं आन फुक्कटचा मार खानं.

तर मंडळी सांगाचा मुद्दा ह्यो हाय की उगा जवानीचं सोंग आनन्यात अर्थ न्हाई. जे आपल्या पदरात दान पडलय त्ये गुमान पवित्र मानाचं आन सोईनं रहाचं.
काय ?

No comments:

Post a Comment