एखादा दिवस असा उजाडतो कि आपणच आपलं चकीत व्हावं.
का बरं आजच असं वाटतय ? असं जाणवतय ?
अक्षरशः डोळे उघडल्यापासून सगळंच चूक, बिघडलेलं, हातातून निसटलेलंच वाटत रहातं. एकपरीस दुस-यांवर दोषाचे, चुकांचे चिखल गोळे फेकणं सोपं असतं, पण स्वतःच्याच चुकांची, दोषांची, निष्काळजीपणाची जाणीव आरपार अस्वस्थ करुन जीव जाळत जाते.
ऐसपैस संसारातल्या, आडमाप जगण्यातल्या चुकाही तशाच ढीगभर असतात. विणकामात कसं सुईवरनं एक टाका उतरला आणि थोडाजरी धसमुसळेपणा केला की भसाभस सगळं विणकाम उसवत जातं तसच कधी कधी आपल्या विचारांच होत जाते.
स्वतःच्या चुकांच्या आत्मपरिक्षणाची एक जाणीव जरी एखाद्या शुल्लक निमित्ताने झाली की आपल्याच भारंभार चुका, निष्काळजीपणा पदोपदी जाणवायला लागतो. मग तो जाळी धरलेला रवा असो वा पोरकिडे झालेला गहू असो. आर्ट स्टुडिओ मधला दुर्लक्षितपणा असो वा सिंक खालची अस्वच्छता असो. महत्वाचे पण वाचायचे म्हणून बाजूला ठेवलेल्या वर्तमानपत्रांची थप्पी असो वा थोडं थोडं काजळ राहीलेल्या काजळ डब्यांची चळत असो. महिनोंमहिने हात न फिरलेले घरातले कोपरे असो वा आठवडेच्या आठवडे पायतळी न आलेले बागेचे कोपरे असो. अकस्मात एक जाणीव होते आणि एक नाकर्तेपणाचा भस्मासूर आरश्यातून वाकुल्या दाखवू लागतो. स्वतःच स्वतःसाठी ठरवलेले नियम असो वा स्वतःवरचीच काही बंधनं असो. सगळ्याचाच फुफाटा झालेला पाहिला की वाटतं, where I am heading ?
भयंकर विमनस्कता येते ही अशी स्वतःविषयीची जागृती झाली की.
कुठल्यातरी कुमुहुर्तावर आपल्याच चुकांचा, निष्काळजीपणाचा, बेफिकिरीचा दहा तोंडी रावण आपलंच शरसंधान करायला उठला की कसं स्वतःला आवरु, कसं स्वतःला ताळ्यावर आणू हा प्रश्न जीवाला खाऊन टाकतो.
काय झालंय आपल्याला ? काय, कुठे आणि कसं चुकलयं-चुकतंय आपलं, काही कळेनासं होतं.
Everything seems to be hopelessly out of control.
आता या खजील करणाऱ्या जाणीवे नंतर सुध्दा हात चोळत बसायंच का खडबडून जागं होत पुन्हा स्वबळावर आयुष्याचं सुकाणू हाती घ्यायचं हे ठरवणं देखील छाप का काटा सारखं त्या त्या वेळच्या मानसिक स्थितीवर अवलंबून असतं
No comments:
Post a Comment