उत्तर ऑस्ट्रेलियातल्या केनर्स या गावातलं रस्टीज मार्केट. फक्त शुक्रवार, शनिवार आणि रविवार भरणारा गजबजलेला बाजार.
फळं, भाज्या, दैनंदिन गरजेच्या वस्तू, फुलं-पानं-रोपं, कारागिरीच्या वस्तूंचा ऐसपैस ऑस्ट्रेलियन बाजार. गडबड, गोंधळ, आवाज अगदी आपल्या भारतातल्या आठवडी बाजारासारखा. काकणभर कमी म्हटलं तरी चालेल.🙂
भाजी-फळं आणि इतर काही ताज्या गोष्टी सोडल्यास बराचसा माल चीनी बनावटीचा.
जापान, ब्राझील, थाईलंड, फिलीपिन्स आणि इतर देशातल्या आणि चक्क आपल्या भारतातल्या अनेकानेक वस्तू, गोष्टी इथे विक्रीला दिसतात.😍 थोडीफार स्वस्ताई असते. पण खरं भावतं ते इथलं माणसांनी, रंगांनी, स्वादांनी, आवाजानी रसरसलेलं रुप.😊
एका ठिकाणी जिन्सच्या सुरेख पिशव्या दिसल्या. चौकशी केली तर एक बाई स्टॉलच्या मागे मशिनवर टिपा घालत बसलेल्या. काहीतरी उसवणं पण चालू होतं. तुरु तुरु चालत आल्या आणि हसून स्वत:च्या हाताने मशिनवर शिवलेल्या जून्या जीन पॅन्टच्या एकसे एक क्रियेटीव्ह पिशव्या दाखवल्या. किंमतही वाजवी होती. इतक्या परक्या ठिकाणी शिवणात रमलेल्या कलासक्त बाई बघून अस्मादिकांना भलताच आनंद झाला.🤩
बाई थाईलंडच्या. शिवणाची आवड असणाऱ्या. आणि आत्ता या क्षणी पण शिवणातच सगळं लक्ष असलेल्या.
त्यांचं लक्ष शिवणात. माझं लक्ष त्यांच्या मग्नतेत. नाव विचारायचं मीही विसरले, त्यांनाही संभाषणात गम्य नव्हतं. तरीपण शिवण शिवण्यात रमलेल्या या थाई सखीचा कार्यमग्न फोटो मात्र काढलाच.☺️
Monday, 19 November 2018
थाई सखी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment