झाडूपोछा करणारी राधा आज स्वतःला बरं नसल्यामुळे गावातल्याच पाहुणी म्हणून आलेल्या सख्ख्या, धाकट्या बहिणीला मदत म्हणून घेऊन आली.
बहिण म्हणजे विशीतली किडकिडीत मुलगी. लांबसडक, काळेभोर केस, चेह-यावर ओढूनताणून हसू कारण तिचा बराच चेहरा जळालेला आहे. ती बारा वर्षाची असताना स्टोव्हवरचं दुधाचं पातेलं काढायला गेली आणि ओढणी पेटली. ओढणी पिनअप केलेली. त्यामुळे चेहराही जळाला. त्याघटनेतून बरी झाली. आता चांगली, व्यवस्थित कामं करते. एकट्या आईबरोबर रहाते. स्वतःच्या हिमतीवर गल्लीत किराणा दुकान चालवते. पण लग्नाचं घोडं विशी आली तरी थांबलेलं. आईला आणि बहिणीला हीच चिंता आहे. अशी जळ्ळेली पोरगी कोण पत्करेल म्हणून ?
हिचं नाव पमा.
आम्ही पमाच म्हन्तो ताई हिला. आमची खर्री नावं अनुराधा आणि अनुपमा हाईता. पन आता मी नुस्ती राधा आनी ही नुस्ती पमा. दोनी बी नावं माह्या वडलांनीच ठेवलीता. लई हौशी होते त्ये. त्यांना नं लग्नानंतर बर्रेच दिवस लेकरंच झाले न्हाईत. मंग एक बहिन झालती. तिचं नाव शिला. पन काह्यीतरी झालं आन ती म्येली. मंग मी चारपाच वर्षानी झाल्ये. काय न्हाय केलं माह्या बापानं लेकरं व्हावीत म्हनून.
उपासं-तापासं, डाक्टरं, मन्नती मागितल्या. मंग आमी दोगी झालो. पन लेकरं न व्हायच्या काळात जे दारुचं व्यसन लागले म्हन्ता त्यांन्ला, ते लगी जीव घेऊनच सुटलं. मी पाच वर्साची व्हते जेव्हा बाप गेला माझा. पमी तं लगी लईच धाकली व्हती. जळ्ळली तवा कोनीबी नवतं घरी. शेजा-यानं नेलतं घाटीत. महिन्नाभर व्हती तिथे. माजं नुकतच लगिन झालं व्हतं. नवरा तं लगी घरी बी, दवाखान्यात बी जाऊ देयाचा न्हाई मला.
माह्या आईन, येकलीनच हिचा दवाखाना, अवषिध-पानी केलं.
मामा-गिमा काय कामाचे नसत्येत काकू. आपलं आपल्यालाच निस्तरावे लागते सर्वे. आता हिचं लगिन कदी आन कसं व्हावं हिच चिंता हाय आमाला.
घरोघरच्या अशाच कहाण्या. बाप म्हणून, भाऊ म्हणून, नवरा म्हणून, लेक म्हणून कोणीही पुरुष या महिलांच्या जीवाभावाचा नसतो, साथीदार नसतो, अडीअडचणीला तर मुळीच नसतो.
आया-आज्या पदरातल्या निखा-यांसारखं आयुष्य स्वतःही जगतात आणि पोरीबाळींनाही तसच जगवतात.
काळाची गरज म्हणून, जगरहाटी म्हणून लग्न होतात, एकदा का २-४ लेकरं झाली की या सर्वार्थाने कोमेजलेल्या महिला संसार ओढत रहातात.
कुठल्याही भावनिक ओलाव्याशिवाय, समजदार सहजीवनाशिवायच. पोटच्या मुलांकडे बघत काबाडकष्ट उपसतात आणि संसार निभावतात.
खरंच कुठली अंतर्यामीची ज्योत या तमाम महिला पेटवत असतील बरं ?
दिवस उजाडला की दबादबा कष्ट उपसतात. उद्याची चिंता करतच संसाराचं अग्निहोत्र एकहाती अव्याहतपणे प्रज्वलित ठेवतात. पोरांच्या शिक्षणासाठी मरमर करतात, आणि समाजाच्या सुव्यवस्थेसाठी दारुड्या, बेजबाबदार, नाकर्त्या नव-याच्या अधीन होतात.
जीवनावश्यक कोणतं पोषणमुल्य यांना मिळतं कळत नाही पण कुठल्याही विपरीत परिस्थितीत बहरणा-या चिवट्ट बाभळीसारख्या या महिला चिकाटीने जगतात, छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधतात,
संघर्षाला भीक न घालता अगदी सहजपणे बहरतात आणि जगण्याचा एक बहुमोल परिपाठच आपल्यासमोर ठेवतात.
No comments:
Post a Comment