आयुष्य बेमालूमपणे आक्रसतंय.
हल्ली कुठलीही अवाजवी धावपळ नको वाटते. अगदी छोटीमोठी कारणं देखील पुरेशी होताहेत घराबाहेर, परिघाबाहेर पडणं टाळायला. मग तो शरीराचा-मनाचा थकवा असो का, वातावरणातला उष्मा असो वा रस्त्यांची परवड असो वा ट्रैफिकचा अंदाधुंद गोंधळ असो वा अगदीच गेला बाजार आत्मारामाची इच्छा असो. अगदी नकोसं होतं बाहेर पडायला.
सकाळची कामं दुपारवर, दुपारची संध्याकाळवर तर संध्याकाळची कामं उद्यावर बिनदिक्कत ढकलली जाताहेत.
आणि आलाच कधी बाहेर पडायचा जोर, तरी ती चारचाकी तर मुळीच चालवावीशी वाटत नाही. गल्लोगल्ली, रस्तोरस्ती गाड्याच गाड्या. त्यात ते आमचे शहर-ए-औरंगाबादचे कायमचे तुटकेफुटके-तहहयात दुरुस्तीला काढलेले दिव्य रस्ते आणि ट्रैफिकचा तो भस्मासूर. अरा..रा..रा..नको ते बाहेर पडणं. जागा शोध शोधून कामाच्या ठिकाणापासून निदान फर्लांगभर तरी दूर गाडी लावा. चालत जाऊन २-४ फुटकळ कामं करा. परत सिग्नल्स, त्यात गाड्या वळवणं. त्यात मला तर गल्लोगल्लीच भटकत कामं करायची सवय. चारचाकी म्हटली की भरपूर मनस्ताप आणि पायपीट होते.
बरंय आपलं घरंच. शांत-निवांत.
तरी पण कधीतरी निघावंच लागतं घराबाहेर.
एकेकाळी गाडी चालवायला फार आवडायचं.
मस्त आशा-किशोर-तलतची गाणी ऐकत मजा यायची कितीही वेळ गाडी चालवायला. पण हल्ली ड्रायव्हर असला तरच ती गाडी सर्वार्थाने परवडते आणि हवीशी पण वाटते. नसता चल मेरी स्कुटर आहेच. खरोखर दुचाकी, स्कुटर चालवणं सुखाचच आहे.
आता थोडंफार असुरक्षित वाटण्याचा होतो त्रास पण कामं फार झटपट, सुटसुटीत आणि ब-यापैकी स्ट्रेस फ्री होतात.
तर आज रात्रीची स्कुटर काढली. हवेत सायंकाळचा गारवा. जवळच जायचं होतं. डाव्या हाताने शेजारी एका स्कुटरवरनं आवाज आला..हैलो मैडम.
☺️ हैलो..पाहिलं तर दोन अनोळखी महिला-मुली फक्त डोळ्याच्या फटी उघड्या ठेवून, स्कार्फमधून हसत होत्या.
🤔अहो..मी ओळखलं नाही तुम्हाला.
😀☺️..फेसबुक.. फेसबुक..आपली ओळख तिथली.
🤓ओहो..आपण फेसबुक फ्रेंडस आहोत का ?
☺️☺️ हो..हो..
😊..काय नाव आपलं ?
☺️..*** *****
😐..होका ?
🤗..तुम्ही फार छान लिहिता मैडम. मला खूप आवडतं. बरं झालं तुम्ही भेटलात. छान वाटलं तुम्हाला भेटून.
वेळ रात्रीची. बरोबरीच्या समांतर अंतराने जोडीने स्कुटर हाकायची मला सवय नाही. तरी पण समान स्पीड ठेवत संवाद चालू ठेवला.
🙂..थैंक यू..थैंक यू. बरोबर मुलगी का ?
☺️😊..हं, ही लहानी. हिला पण मी कधीतरी तुम्ही लिहिलेलं वाचून दाखवते. तिलाही आवडतं. अचानक भेटलात. छान वाटलं.
परत थोडाफार असाच संवाद. तोपर्यंत गाडी चालवणारीने चेह-यावरचा स्कार्फ काढलेला. गाडी चालवताना, तोल सांभाळत, समोरचा रस्ता बघत जेवढा बघता येईल तेवढा चेहरा निरखला. तरी चेहरा ओळखीचा वाटेना.
रोजच्या रामरगाड्यातलं रुप आणि मेहनतीने काढलेल्या, एडिट केलेल्या डिप्प्यांमधे जमीन अस्मानाचा फरक असतो हो. 😬
कसं ओळखणार मी ? तेही रात्रीच्या वेळी आम्ही दोघीही स्कुटरवर असताना. त्यात मी डगमगताना.
तरी बाजूची स्कुटर खूपच उत्साहात होती. भरभरून बोलत होती. अगदी हेवा वाटेल अशा निखळपणे माझ्या लिखाणाच कौतुक करत होती.
बापो..आपल्याला कधी असं कुणाचं खळखळून कौतुक करणं जमावं ?😒
म्हणजे एक हाथ से कौतुक किया, दुसरे हात से कॉम्प्लेक्स दिया. 🙄
खरंच निरलस भक्तांच्या आहेराला तोड नाही.😍
म्हणजे स्कुटरची अडचण झाली तरी स्कुटरवर असल्यामुळेच आमची भेट झाली.
No comments:
Post a Comment