Tuesday, 2 October 2018

तू मला भेटायला ये. हयगय न करता नक्की ये.
पण प्रस्थान करायच्या आधी लक्षात घे की आता माझ्यापर्यंत पोहंचणं पहिल्यासारखं सोपं नाहीये. सहजसाध्य तर खचितच नाहीये.
तरी तू प्रयत्न कर.
तूच तर पुर्वी म्हणायचास ना की प्रयत्ने रगडीता वाळूतूनही तेल गळे म्हणून.
हसतोस काय ?
मला अजूनही ते सर्व काही आठवतय म्हणून आश्चर्य वाटतय का ?
अरे सर्व काही आठवतय म्हणूनच म्हणते तू ये.
आता माझ्यापर्यंत पोहंचण अवघड असलं तरी तूलाच ते शक्य आहे. मला माहितीये मी पुन्हापुन्हा तूला ये म्हणण्यातच बारा हत्तीचं बळ मिळेल तूला.

पल्ला जरा लांबचा आहे आणि रस्ताही बराच डोंगरकड्यातला, दुर्गम आहे.
मी असल्या कडेकपारीत रहातेच का म्हणून वैतागू नकोस.
हे माझ्या आवडीचे ठिकाण आहे.
माझं मीच शोधलेलं, माझी मीच पायवाट बनवली आहे इथे पोचायची.
इथे पोहंचण्याची मी फार मोठी किंमत दिली आहे.
भरपूर बरा-वाईट घाम गाळलाय, पण जागा मात्र जबरी आहे.
तर मी काय सांगत होते ?
हं..की तू नक्की ये.
मला खात्री आहे की माझ्या ओढीने तू नक्कीच येशील.
But take my word, इथे पोहोंचलास की तू मलाच विसरुन जाशील.
म्हणायचासना तुच की journeys are more interesting than destinations म्हणून.

तर तु लगेच प्रस्थान कर.
सुरवातीलाच तुला तनमन तप्त करणारं वाळवंट लागेल. आग ओकणारा सुर्य जाळून टाकेल पण द्वैताकडून अद्वैताकडे जाणारी दुर्दम्य मिलनेच्छा तुला यातूनही पार करेल. मग तुला लागतील निळे-जांभळे कराल पहाड. इथेही तू थांबू नको. निळ्या आभाळाकडे लावलेली नजर हलवू नको आणि चालतं पाऊल थांबवू नको. पुढे लागेल एक विस्तीर्ण घनदाट जंगल.
न सुर्याची तिरीप न चंद्राचा कवडसा पोहंचू देणारं. त्याच्या निबिडतेला घाबरु नको, चांदण चकव्याला मुळीच भुलू नकोस.
तिथल्या सुवर्णपंखी गरुडांशी निर्भयपणे मैत्री कर, तेच तुला पुढची वाट दाखवतील.
जंगल संपले की अख्ख आभाळ पिऊन टाकणारा रोंरावणारा अजस्त्र, महाकाय समुद्र लागेल.
मनात म्हणशीलच तू, काय अवदसा आठवली आणि नादी लागलो म्हणून. फुकाचा सुखाचा जीव दुःखात घालून बसलो.
खरं सांगते मलाही बरेचदा असंच वाटलं स्वतःच्या पायवाटा शोधत इथपर्यंत पोहोंचताना.
अनेकदा पडले, धडपडले, ठेचकाळले पण स्वतःची पाऊलवाट स्वतःच शोधण्यासारखं, बनवण्यासारखं मर्मज्ञ सूख कश्यातच नाही बघ.
पण दुर्दैवाने हे फारसं कुणाला उमजत नाही आणि उमजलं तरी जमत नाही.
मला हे उमजलं-समजलं आणि तेच अजमावयच्या नादात मी इथपर्यंत आले.
आता इथून पुढचं सगळं माझं मीच रचलंय, माझ्या आनंदासाठी, माझ्या सुखासाठी.

या खाऊ का गिळू करणा-या महासागरात बांधलय मी एक लहानसं बेट. उन्हामधे हिरवळणारं आणि काजळरात्री निळावणारं.
या बेटाभोवती बांधली आहे मी एक चिरेबंद भिंत. नात्यागोत्याची, गणगोतांची.
कुणीही पांथस्थाने डोकावू नये म्हणून.
हे काही येणाऱ्या जाणाऱ्यांसाठीच्या थांब्याच ठिकाण नाहीये.
This is a private land.
Trespassers are strictly prohibited.

हं..तर काय सांगत होते.
या भिंतीला न प्रवेशद्वार न चोर दरवाजा.
कडेकोट, चिरेबंद बंदोबस्त आहे म्हटलं आपला.
इतका प्रवास केल्यावर नक्कीच दमशील.
भिंतीवर डोकं आपटून वैफल्यग्रस्त होशील.
उमेद हारु नकोस. प्रयत्न सोडू नकोस.
किनाऱ्यावर शांतपणे लोळ.
थंडगार वाळू अंगभर लेऊन घे.
मोजता येतील इतक्या चांदण्या मनात भरुन घे. उरलेल्या डोळ्यांनी टिपून घे.
थकल्या-भागल्या शरीरावर पश्चिम वा-याची दुलई पांघर आणि निद्रादेवीच्या अधीन हो.
पहाटेच्या झुंजूमुंजू, निळ्या-जांभळ्या निरव प्रहरी तूला एक मंजूळ नाद ऐकू येईल.
जातीवंत असशील तर त्या आवाजाने रोमांचित होशील. जिगरबाज असशील तर त्या खळाळाचा मागोवा घेतच येशील.
या बेटावर मला सापडलाय एक स्वयंभू झरा.
वसुंधरेच्या अनघड पोटातून स्त्रवणारा.
उमाळून बाहेर पडणारा आणि आवेगाने महासागराला मिळणारा.
स्फटिकासारखं नितळ गारीगार पाणी.
तमाम आयुष्याची तृष्णा भागवणारं.
आपल्या स्पर्शाने अख्ख्या देहाचं सोनं करणारं एक चिरंजीव प्राणपाणी.
झरझरुन वहाणारं...
ये..या आवाजाच्या मागोव्याने ये.
चालत रहा..मार्गस्थ होत रहा.
इथेच मी असेन आणि आहेही. 
But take my word,
इथे पोहोंचेपर्यंतच तूला माझं विस्मरण झालं असेल.
घाबरु नको, दचकू नको. मला साद घालायच्या भानगडीत पडू नकोस.
तुझे थकले-भागले, रक्ताळलेले, भेगाळलेले पाय सावकाश पाण्यात बुडव.
पाण्याच्या शितल स्पर्शाने रोमांचित होशील, हर्षोन्मलीत होशील. एक पावन प्रसन्नता तुझ्या चेहऱ्यावर झळकेल.
हा आनंद तूला कुणाबरोबर तरी वाटावासा वाटेल. काळजी नको. मी इथेच आहे.
अरे...ही पहा इथे या खळाळात पाय सोडून बसलेली मी..एक शिळा झालेली.

No comments:

Post a Comment