नमस्कार,
औरंगाबादसारख्या ऐतिहासिक आणि अजिंठा-वेरुळचा वारसा जपणा-या भुमीतल्या चित्रकारांसाठी एक अद्ययावत 'मालती आर्ट गैलरी' आता शहरात सुरु झाली आहे.
शहरातील नामवंत मनोविकार तज्ञ डॉ. विनायक पाटील यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ ही गैलरी सुरु केली आहे. संपूर्ण पाटील कुटुंबीयांची आत्मीयता आणि शहरातील उत्साही चित्रकारांचा उस्फुर्त सहभाग यामुळे चार-पाच महिन्यात गैलरीने चांगलच रुप धारण केलं.
या नवीन उपक्रमाच्या निमित्ताने चित्रकारांच एक तीन दिवसीय वर्कशॉप देखील घेण्यात आले होतं.
या गैलरीच्या उभारणीच्या निमित्ताने शहरातले लहान-थोर असे सर्वच चित्रकार कलावंत एकत्र आले हे विषेश.
तर या मालती आर्ट गैलरीचा दिमाखदार आणि रंगारंग लोकार्पण सोहळा गुरुनाथ संकुल, काल्डा कॉर्नर इथे सोमवारी, १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी संपन्न झाला. शहरातल्या नामवंत चित्रकारांबरोबरच, अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि रसिक लक्षणीय संख्येने या वेळी उपस्थित होते.
या उदघाटनाच्या निमित्ताने शहरातल्याच कारवां ग्रुपमधल्या चित्रकारांच्या चित्रांच एक देखणं चित्र प्रदर्शन या गैलरीत भरवलेलं आहे. अद्ययावत गैलरीचं रुप अनेक रंगबिरंगी चित्रांनी नटलेलं पाहून सगळ्यांनीच काल फार कौतुकाचे उदगार काढले.
हे चित्र प्रदर्शन ३० सप्टेंबरपर्यंत रोज दुपारी १२ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत खुलं राहील.
गैलरीच्या समोरच रस्त्यालगत ओपन आर्ट गैलरी पण लवकरच कार्यरत होणार आहे. तिथे संध्याकाळच्या वेळेस विद्यार्थी चित्रकारांनी आपली कला नियमितपणे सादर करावी असा मानस आहे.
नियमितच्या चित्रप्रदर्शनाबरोबरच हौशी कलावंतांना, क्राफ्ट करणाऱ्या कलावंतांनाही ही गैलरी उपलब्ध केली जाईल. तसेच वेळोवेळी विविध प्रकारचे वर्कशॉप्स देखील आयोजित केले जातील.
एकुणच पाटील कुटुंबीयांनी शहरामधे चित्रकारीतेतील एक चांगली चळवळ सुरु करुन चित्रकारांमधे चैतन्य निर्माण केलं आहे हे निश्चित.
या उपक्रमाचा शहराच्या पुढील सांस्कृतिक घडणीत मोलाचा वाटा असेल. तसेच पर्यटनवृध्दीमधे सुध्दा ही गैलरी निश्चितच हातभार लावेल.
तरी सर्व शहरवासीयांना नम्र विनंती आहे की त्यांनी या गैलरीला आणि चित्र प्रदर्शनाला जरुर भेट द्यावी आणि चित्रकारांचा आणि व्यवस्थापनाचा उत्साह वाढवावा.
कारवां चित्र प्रदर्शन.
मालती आर्ट गैलरी.
गुरुनाथ संकुल. काल्डा कॉर्नर.
हॉटेल अमरप्रीत ते दर्गा रोडवर.
१० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर.
वेळ दु.१२ ते सायं ८ वाजेपर्यंत.
No comments:
Post a Comment