एक अतिशय किडकिडीत बांध्याचा आमच्या इथला सुरक्षा शिपाई. बराचसा वयस्क.
आज सकाळी हिरण्यला जुनी-नवी झाडं बघत सकाळचा फेरफटका मारुन आलो तर कसं काय कोण जाणे त्यांनी एकदमच बोलणं सुरु केलं.
म्याडम काल तुमी फन्साची झाडं लावलीत हे फार ब्येष्ट केलं बघा. फनस पायजेच. हे येवढालं फळं लागतेत बुंध्याला. मस्त झाडी लावली आहे तुम्ही सगळीकडे.
मी जेजेला होतो तेव्हा तिथे पन असचं मस्त वाटायचं बगा. तिथे पन फन्साची ही ऊंचच ऊंच झाडं व्हती.
...जेजेला तुम्ही ?
हां तिथल्या हास्पिटलात होतो ना मी महिनाभर. जावायाला बरं नव्हते. मंग मी बी त्यासंगे -हायलो तिथं. काय झाडी आहे तिथं. लयी मोठे-मोठे थोरले झाडं. हे मोठाले फन्स लागलेले. काय हास्पिटल हाय ते ! व्वा.
***** नावाचे डॉक्टर हाईता तिथं..सेक्शन दोनला. काय देवमाणूस. घरचं कुनी न्हाई त्यांना. यान्ला तीन लाख पगारे. आपल्या पुरतं ठेवतेत स्वतःजवळ बाकीचं गरजूंना वाटून टाकतेत. हातगुण लयीच चांगला हाय त्यांचा. लगी कुठून, कुठून लोकं येतेत डॉक्टरचं, दवाखान्याचं नाव ऐकून. दवाखाना पन बेतशीर. एक पैसा तं लागत न्हाई तुम्हाला. बरोबरच्या मान्साचा खर्च तुम्ही करायचा पन बिमार मान्साचा सगळा खर्च दवाखाना करते. आपरीशन,आवषीधं, खानंपिनं सगळचं लगी हास्पिटलच करते. लयीच सोय आहे वो तिथं.
लगी प्रत्येक प्रांताच्या आमदाराचे, खासदाराचे दोन चार लोकं असतेतच तिथे. गेला आपल्या गावचा मानुस की लगी आमदाराचा फोनंच जाते तिथे. लगी त्यांचे कार्यकर्ते लोकं बिमार मान्साला काय लागते काय न्हाई बघतेत. लईच चांगली सोय हाये वो.
...तुम्ही कुठले बाबा ?
मी डांगरीचा बाई. दोन वर्षापासून हाय इथं. फार चांगलं वाटते इथं. जागा चांगली, मान्स चांगली. आपली डांगरीची मास्तरीण कदीची माझ्या मागं लागली व्हती इथे या म्हनुन कामाला. पन काय सांगू तुमाला ? माझ्या यका पोराचं आन पोरीचं लगीन बाकी व्हतं. आता समाज कसा असते ? इज्जतीने राहवं लागतय मान्साला समाजात. लोकं म्हन्ले अस्त्ये, ऑं पोराचा बाप हॉटेलीत काम करतोया, कशाला पोरगी द्यायाची इथे आपली ?
म्हनुन मंग मी दोगांच बी लगीन उरकलं आन मंग इकडं आलो. पोरगा म्हन्तो नगा काम करु आता. पन मीच म्हन्तो घरी बसून तरी काय कराचे ? आपला बी जीव लागतो. तब्येत बी बरी -हाती. येकदम ठणठणीत आहे मी. फक्त माहे सगळे दातं गेल्येत त्यामुळे खायाची पंचाईत व्हती इथे. पन मी बी आता यकदाच जेवतो. रातच्या फक्त दुध, ग्लुकोज बिस्कीट आनि यखादं केळ खातो. येकदम वेवस्थित तबेत हाय माझी. आणि इथं लगी लयी जीव लागतो. ह्ये हॉटेलसारखं वाटतच न्हाई.
बरका साहेब...ही यक मोठी कंपनीच हाय. शंभर लोकांचे घरंदारं तुमी सांभाळू -हाईलेत. ह्ये फार मोठं काम हाये साहेब. मी पन इतकी दुनिया पायली आहे ना. ही झाडं लावून, इतक्या लोकांना मार्गी लावून तुम्ही चांगलं काम करु -हायले. मला बी लय हौस व्हती शिकून पुढं जायाची. मी मुंबैच्या आरपीएफमदी शिलेक्ट पन झालो व्हतो. पन बापाचा एकूलता येक पोरगा पडलो. बापानी मला सोडलच न्हाई. बसलो मंग गावीच शेतीवाडी करत.
...अरेवा, कीती शेती आहे तुम्हाला ?
व्हती बरीच शेती. पन तीन पोरी, यकेकीचं लगीन करुन देता देता सगळी शेती गेली. आमच्या कडचं लगीन काई सोपी न्हाईता. लगीन बी द्यायाचं करुन वरता मुड पन द्यावा लागते.
...मुड म्हणजे ?
पोरीला सगळा सोंसार द्यावा लागते सासरी जाताना. भांडीकुंडी, ग्यास, कपाटं, पलंग, मिक्सर, टीव्ही..लगी घरामदी जे जे लागते ते समदं. पोरींच्या लग्नात सर्वे शेती गेली.
तुमाला काय सांगू सर, मला जं परिस्थितीने साथ दिली अस्ती तर मी लई यगळा मानुस झालो अस्तो.
पन आंशी सालापासून जो काळ बदलला म्हन्ता माजा, की मला सुदरलंच न्हाई. पन आता सर्वे जबाबदा-या संपल्या. पोरगा बी सुरतेत टेंपो चालिवतो. म्हतारी गावी -हाती. मी बी इथं लईच रमलो. बस, आपली ड्युटी करायची आन खोलीमदे वाचीत पडतो.
...अरेवा, वाचायला आवडतं का तुम्हाला ? काय वाचता तुम्ही ?
मी का ? सद्याच्याला सहदेव भांडाळी वाचू
-हायलोय. त्यात आपलं भविष्य कळते आपल्याला. पन आविष्यात सगळं खुशाल हाय आता.
बरय सायब. मी बी सकाळी-सकाळी तुमाला माझी कर्मकहाणी सांगित बसलो.
बरयं. नमस्कार.
सकाळच्या निरवतेत, पाखरांच्या चिवचिवाटात फुलं-पानं बघत मारलेल्या फेरफटक्यानंतर एका नितळ माणसाची मनोज्ञ कहाणी विचारात पाडून गेली.
No comments:
Post a Comment