Tuesday, 11 September 2018

झाकोळ.

विज्ञानाने, तंत्रज्ञानाने आपल्या तमाम मानवजातीचे आयुष्य सुखकर झालेच आहे, अजूनही होतच आहे तरीसुद्धा कधी कधी तंत्रज्ञानाच्या, आधुनिक गोष्टींच्या अतिवापरामुळे, वापरण्याच्या आपल्या हलगर्जीपणामुळे आपल्याला बराच मनस्ताप सोसावा लागतो. बरेचदा तर आपल्या अशा चुकांची जबरी किंमत देखील आपल्याला मोजावी लागते.

आता आमच्या इथलंच उदाहरण तातडीची जनजागृती म्हणून देत आहे.

शाळकरी वयातल्या दोन बहिणी गंमत म्हणून एकत्र आंघोळ करायला म्हणून एकाच बाथरुममधे गेल्या. घरात इतरही माणसं होतीच. बाथरुममधे गैस गिझर होता आणि तो सतत गरम पाणी देणारा गिझर चालूच होता. थोड्यावेळाने बहुदा त्यांना श्वसनाचा त्रास होऊन गरगरल्या सारखं झालं आणि त्या बाथरुममधेच बेशुद्ध पडल्या. बाथरुममधून आवाज येत नव्हता म्हणून आईने दार वाजवलं तर मोठ्या मुलीने तशाही अवस्थेत दार उघडलं आणि ती पण बेशुद्ध झाली.
मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा न मिळाल्यामुळे त्या दोघीही अशा रितीने बाथरुममधेच क्रिटिकल झाल्या.
दोघींनाही तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दोघीही जणी दोन दिवस क्रिटिकल होत्या. सुदैवाने मोठी मुलगी दोन दिवसात बरी झाली. पण दुस-या लहान मुलीला मात्र दोन दिवस जीवाशी झगडून शेवटी देवाज्ञा झाली.

तर या दुःखदायक घटनेतला महत्वाचा मुद्दा म्हणजे छोट्या आणि सुयोग्य व्हेंटिलेशन नसलेल्या बाथरुम्स, बाथरुमचं बंद दार आणि आतला गैस गिझर चालू असणं.
हल्ली महाग पडणाऱ्या इलेक्ट्रिक गिझरला उत्तम आणि स्वस्त पर्याय म्हणून गैसवर चालणाऱ्या गिझरकडे बघीतलं जातं, आणि ते योग्यही आहे.
परंतू आपण स्वैपाकाचा गैस वापरताना काही पथ्य पाळतो तशीच काही क्रुशीयल पथ्य हा गैस गिझर वापरताना पण पाळलीच गेली पाहिजेत.
पहिली गोष्ट शक्यतो गैस आणि गिझर बाथरुमच्या बाहेर असल्यास अति उत्तम. कारण घरात बाथरुम असलेल्या भारतीयांमधल्या नव्वद टक्के लोकांकडे बाथरुम अगदी अडचणीच्या ठिकाणी असतात. तेही व्यवस्थित व्हेंटिलेशन नसलेले. पण हे शक्य नसल्यास निदान गिझर तरी बाहेर ठेवून काढलेल्या गरम पाण्याची बकेट उचलून बाथरुममधे न्यावी, आणि हे ही शक्य नसल्यास बाथरुमचं दार बंद करायच्या आधीच आंघोळीचं पाणी बाथरुममधल्या गिझरमधनं काढून घ्यावं आणि गिझर बंद करावा.
होतं काय की हा गिझर जेव्हा पेटतो तेव्हा तो हवेतला ऑक्सिजन सतत घेत रहातो आणि कार्बनडाय ऑक्साईड सतत बाहेर टाकतो. त्यामुळे अगदी व्यवस्थित व्हेंटिलेशन नसेल तर कुठल्याही छोट्या बाथरुममधे जीव गुदमरायची शक्यता नाकारता येत नाही.
जेव्हा गैस पेटतो तेव्हा तो हवेतला ऑक्सिजन खेचतो आणि कार्बन डाय ऑक्साईड हवेत सोडतो. आणि ह्या गैसला जर जळणासाठी ऑक्सिजन कमी पडला तर तो जळताना कार्बन मोनो ऑक्साईड (CO) बनतो.
(व्यवस्थित व्हेन्टिलेशन नसलेल्या बाथरुममधे ही शक्यता खूप आहे.)
शरीरातील हिमोग्लोबिनला ऑक्सिजनपेक्षा अडीचशे पट जास्त ओढ या खतरनाक कार्बन मोनो ऑक्साईडची असते. त्यामुळे हा तयार झालेला, होत रहाणारा CO श्वसनातून  फुफ्फुसात गेला तर आपल्या शरीराची प्रचंड हानी करतो.
वरच्या घटनेत हाच प्रकार झाला.

अस्ताव्यस्त वाढलेली मेट्रोपोलिटन शहरं, चाळींसारखे गिचमीड फ्लैटस आणि पुर्णतः दुर्लक्षित असलेलं बाथरुम संडासच व्हेंटिलेशन, अशा ठिकाणी असे अपघात अनावधानाने होण्याची खूप शक्यता असते.
वरील दुर्दैवी घटना घडायच कारण हेच आहे.
म्हणजे गैस गिझर वापरणं चुकीचं नाही पण त्याच्या सुरक्षिततेची पावलं नक्कीच घराघरातनं उचलली गेली पाहिजेत हे नक्कीच.

आमची गैस एजन्सी असल्यामुळे मी शहरा आसपासच्या ग्रामीण वसाहतींमधे अनेकदा सेफ्टी क्लिनिक्स घेते. कारण तिथे नवीनच गैस वापरायला सुरवात झालेली असते. तिथली स्वैपाक ओट्यापासची जनताही अशिक्षित असते, खूपदा लहान शाळकरी मुली-मुलं देखील गैसजवळ काम करतात. त्यामुळे तिथे सेफ्टी क्लिनिक्स घेणं फार गरजेचं असतं.
परंतु ग्रामीण भागापेक्षा आपण सुखवस्तू, शहरी लोकं गैसच्या वापरा बाबत बरेच जागरुक असतो आणि सुरक्षितही असतो. पण आता या वरच्या घटनेमुळे आपल्या सारख्या लोकांनाही जाणीवपूर्वक दक्ष रहायची गरज आहे. ऐसपैस वाढत्या शहरांच्या रेट्यामुळे निर्माण होणारी कंजेस्टेड फ्लॅट सिस्टीम, सुयोग्य घर रचनांचा अभाव आणि अत्यंत दुर्लक्षित अशा बाथरुम-संडासच्या जागा आणि त्यांचं अति दुर्लक्षित असं व्हेंटिलेशन सुध्दा. त्यामुळे घरोघर हा धोका आहे.

इलेक्ट्रिक गिझरपेक्षा अतिशय झटपट आणि सातत्याने येणारं कढत पाणी ही या गैसगिझरची जमेची बाजू आहे. त्यामुळे आंघोळीला वापरू तितकं पाणी कमीच आहे असं वाटून घेणारे आपण वेळीच जागरुक झालेले बरे.
तेव्हा कृपया सावध रहा, दुस-यांनाही जागरुक करा.
शक्य झाल्यास गैस आणि गिझर दोन्हीही बाथरुमच्या बाहेर खेळत्या हवेत राहतील असं बघता. बाथरुम्समधलं व्हेंटिलेशन वाढवता आलं तर अति उत्तम. पण जर हे काहीच जमत नसेल तर निदान मोठं बकेटभर गरम पाणी आधी काढून, गैस गिझर बंद करुन मगच आंघोळीला जा.
कुठल्याही परिस्थितीत गिझर चालू ठेवून आंघोळीला बसणं टाळा. आणि अशी सवय घरातल्या लहान मुलांना, वयस्कांना त्यातले धोके समजावून सांगत आवर्जून लावा.

खेळता खेळता एक सुकोमल कळी हकनाक कोमेजली याची फार चुटपुट लागली आहे जीवाला.

No comments:

Post a Comment