परवा एका आडबाजूच्या जरा दुर्लक्षित इमारतीत ओल्या किचन वेस्टपासून खत बनवायच्या प्रॉडक्टच डेमो पहायला गेले होते. कार्यक्रम आटोपून बाहेर पडले तर एका ओबडधोबड खिडकीस कशीबशी बांधलेली पोस्टाची पेटी दिसली. आधुनिकीकरणामुळे कीती अनेक जून्या गोष्टी आता आपल्या आयुष्यातून हद्दपार होताहेत याची जाणीव झाली.
लहानपणी, तरुणपणी या पोस्टाच्या पेट्या, किराणा, रॉकेल दुकाना इतक्याच महत्वाच्या होत्या. जर किराणा-रॉकेल-भाजीची दुकानं जगण्याची गरज भागवत होती तर या पोस्टाच्या पेट्या कौटुंबिक भावनिक गरज भागवत असत, नातेसंबंधातला ओलावा टिकवत असत.
खरंच पुर्वी लिहिता येणारे लोकं किती आठवणीने आणि नियमित एकमेकांना पत्र लिहीत असत.
माझी आईची आई बहुदा लिहू शकायची नाही त्यामुळे आपल्या मुलींना सविस्तर पत्र लिहायची जबाबदारी आजोबांचीच. दर दोनेक महिन्यांनी त्यांची, मावश्यांची ख्याली खुशालीची आणि छोट्या मोट्या घटनांचा उल्लेख करणारी पोस्ट कार्ड यायची. बरेचदा मोठ्यांना, वयस्कांना पोस्टकार्ड आणि इनलैंडस आणून द्यायचं आणि त्यांनी लिहिलेली पत्र पोस्टपेटीत टाकून यायचं काम शाळकरी नातवंडांचच असायचं.
लालजर्द रंगाची भक्कम पोस्टाची पेटी म्हणजे रस्त्यावरचा डिग्निफाईड लैन्डमार्क असायचा. फार काही अर्जंट काम असेल तर पोस्टमन पेटी रिकामी करायला कधी येतो याची वाट पाहिली जात असे. सगळ्यात उशीरा रिकामी होणारी पोस्टपेटी म्हणजे रेल्वे स्टेशनवरची असायची.
पत्र पोस्टात पडणं, पेटीतून काढलं जाणं, ते पत्र परगावी जाणं आणि इच्छित माणसाच्या हाती पडणं यासाठीचाही एक निश्चित कालावधी असे. फारंच तातडी असेल तर टेलिग्राम केल्या जात असे. टेलिग्राम सहसा अपत्यप्राप्ती, निधन किंवा नौकरीवर रुजू होण्यासंबंधीच असतं. अवचित आलेला टेलिग्राम घरातल्यांच्या पोटात खड्डा पाडत असे.
एकदा मी आणि माझी मोठी बहिण शाळकरी पण समजदार वयात बीडला आमच्या मामाकडे गेलो. अजून एक शेजारी मैत्रीणीची आत्या पण बीडला रहायची. बहुदा हिंमतीने तिघीच एकट्याने प्रवासा करुन गेलो.
चार -पाच दिवस राहून परत तिघीच एकट्या परतणार होतो. पण त्याकाळी बीडला डब्ब्यांचे संडास होते. पहिल्या दोन दिवसातच आमचं बहिणींच तंत्र बिनसलं. माझ्या बहिणीने जे परत जायचा हेका लावला की बस. मामा, मामी, आजोबा सगळे समजूत घालताहेत, पण ही काही ऐकेचना. शेवटी तिघीही एकमेकींच्या सोबतीने तातडीने औरंगाबादला परतलो. नंतर मात्र आजोबांच आईला पत्र आलं की तुझ्या मुली अशा हट्टीपणाने वागल्या. मुलींच्या जातीला असा हेकेखोरपणा बरा नाही वगैरे..वगैरे. हा मजकूर मला लख्ख आठवतोय. छोट्या छोट्या गोष्टीत देखील कीती इतिहास दडलेला असतो नाही. खरोखर सुरम्य त्या आठवणी.
त्याकाळी सर्वसाधारण एक समज होता, नियमितची ख्यालीखुशाली किंवा एखादा तातडीचा मेसेज
(म्हणजे अपत्यप्राप्ती, निधन, चौदावा, नौकरी मिळाली, यंदा कर्तव्य नाही..वगैरे) पाठपोट पोस्टकार्डांवर पाठवला जायचा. आणि डिटेल कौटुंबिक मजकूर असेल तर दुपानी इनलँड पाठवलं जायचं, आणि प्रेमिकांचे प्रेमाचा, नातेसंबंधातले गैरसमज दूर करणारा, मनमोकळं करणारा दिर्घ मजकूर असेल तर दोन चार पानं लिहून पाकिटात घालून, जास्तीचे स्टैंप्स लावून ते पाकीट पाठवलं जायचं. प्रेमिकांमधे गुलाबी पाकिट कौतुकाने वापरलं जायचं. आणि सरकारी टपाल ब्राऊन पाकिटातनंच यायचं.
आमचे तर बहुतेक नातेवाईक कार्डावरच पत्र पाठवायचे. स्वस्त आणि मस्त. मला वाटतं तेव्हा पाच का दहा पैशाला कार्ड मिळायचं आणि इनलँड पंधरा पैशांना. कार्डावरच अक्षर दुरुनच बघून कळायचं की पत्र कुणाचं आहे म्हणून.
एखाद्या क्रुशियल इश्युवरती समोरच्याकडून तातडीने निरोप हवा असेल तर समोरच्याने कार्ड आणायचा कंटाळा या कारणास्तव उलट टपाल पाठवायला उशीर करु नये म्हणून पाठवणा-याकडनंच कोरं जोड कार्ड पाठवण्यात येई.
अशी वेळ बहुदा आई-वडील आणि दूरगावी असलेल्या तरुण अपत्यांच्या बाबतीत येई. किंवा मुलींची स्थळं बघताना, मुलाकडच्या झटपट उत्तरासाठी म्हणून मुलीच्याच कावलेल्या वडीलांना ही डबल कार्डांची तजवीज करावी लागत असे.
सर्वसाधारणपणे इतकं विश्वासाचं वातावरण सगळीकडे असायचं ना त्याकाळी की कार्डांवरचा मजकूर कुणीही वाचू शकायचं, पण कोणी ति-हाईत तो वाचत नसे.
खेडोपाडीतर अशिक्षित लोकांची पत्र ति-हाईत लिहून द्यायचे, वाचूनही दाखवायचे. कितीतरी कथा ह्या ह्रद्य प्रसंगांभोवती गुंफलेल्या आहेत.
पाकिटांवर समोर ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता आणि मागे पाठवणा-याच नाव आणि 'Personal' असं लिहिलेलं असलं की कुणाची बिशाद आणि नियतही नसायची ही पाकिटं उघडून पत्र वाचायची.
दुपारच्या वेळी पोस्टमनंन आवाज देत दारातून सरकवलेलं कार्ड, इनलँड अथवा पांढरं पाकिट दिसलं की अपार उत्सुकता वाटत असे. कुणाचं पत्र ? काय मजकूर असेल ? चांगला का वाईट ? आपल्या आयांचा तर माहेरच्या पत्रातला मजकूर कळेपर्यंत मनाचा तळ्यात-मळ्यात हा खेळच खेळून होत असावा.
'Personal' पत्रांची तर कथाच वेगळी. धडधड काय, थरथर काय, रोमांच काय..रोमांसचा एक ट्रेलरच अनुभवायला मिळत असावा प्रेमिकांना नाही ?
दूरदूरचे महत्वाचे निरोप या टपालखात्याने बेमालूमपणे पोहंचवलेत. कुठलीही आधूनिक तंत्रज्ञान नसताना या पत्रांच्या भरवश्यावरंच घरोघरच्या सगळ्या पोरी उजवल्या गेल्या, लग्नपत्रिका बिनबोभाट गावोगावी पोहंचल्या, बारशांचे निरोप गेले, मुंजी धुमधडाक्यात लागल्या, इंटरव्ह्यूजचे कॉल्स योग्य वेळी पोहंचले, नौक-या मिळाल्या, वास्तुशांती झाल्या, सहस्त्रचंद्र दर्शनाचे सोहळे झाले, सुखरुपतेचे, ख्यालीखुशालीचे निरोप देणे घेणे झाले.
याच पत्रापत्रीतून बाचाबाची झाली, भाऊबंदकी झाली, निधनांच्या, अपघातांच्या वृत्तानंतर आकाशं कोसळली, नातीगोती ताणली गेली, काहीवेळा कायमची तुटली, बरेचदा जुळली पण.
मानवी जीवनाच्या भावबंधनांचा अख्खा इंद्रधनुष्यी पिसारा या पोस्टपेटीने ऊन, पाऊस, वा-यात जीवापाड सांभाळाला. दूरदूरुन आपल्यापरत विश्वासाने पोहोंचवला.
अजूनही कुठल्या तरी कडी कुलपातली पिवळी,जर्जर पत्र आपल्याला खुणावतात. आपली माणसं काळाच्या उदरात कधीच हरपली पण त्यांची हस्ताक्षरं अजूनही त्यांची आपली ओळख सांगतात, त्यांच्या विचारांचा, जिव्हाळ्याचा सुगंध अजूनही या जुन्यापुराण्या पत्रातून आपल्याला रिझवतो.
जूनी पत्र वाचण्यासारखा असीम आनंद कशातच नसावा. पत्र पाठवणं आणि पत्र वाचणं या दोन्ही गोष्टी लाखमोलाचे क्षण पदरात टाकून जातात.
दुर्दैवाने या पिढीच्या नशीबी हे सुख नाही. तंत्रज्ञानाने जग जवळ आलं तरी मनं येतातच असं नाही.
मिनिटा मिनिटाला संवाद साधणा-या आजच्या सोशल मिडियावाल्या ब्रीडला पत्राची वाट पहाण्यातली हुरहुर कधीही कळणार नाही. उतावळ्या पोस्टस् आणि झटपट डिलीटींगच्या आजच्या खेळात 'बाकी सगळं क्षेम'ची खुशाली आपल्यापर्यंत पोहंचवणा-या पोस्टपेटीचं क्षेम विचारायला आता कुणालाच सवड नाही.
No comments:
Post a Comment