ताई तुमाला फोटो काढायची लईच हाऊस हाय. दिसलं कुनी यगळं की काढलाच फोटो.
ताई..तुमी शिनेमातल्या ह्यीरो-ह्येरॉईनला कदी पायलत ?
..."काय ?"
अवो ह्यीरो-ह्यिरॉयीनला कदी आमनेसामने पायलत का ? आमनेसामने म्हंजी प्रत्याक्षात. न्हायी..तुमी फार इकडं-तिकडं फिरत्यानं. मंबईला जातात्यात. तर कदी पाईले का शिनेमातलं लोकं.
..."हं..एकदा प्रियंका चोप्राला पाहिलय."
प्रियांकाला ? अस्स..आमनेसामने ? म्हंजी आपन दोगी बोलू -हायलो तशे ?
..."तसं नाही दुरुनच पाहिलं आहे. का गं तुला आवडतं का सिनेमातल्या लोकांना प्रत्यक्षात बघायला"?
मंग कुनाला न्हाई आवडणार ? मला तं कदी बगायला मिळल कोन जाने ? कुट्ट बी भाईर मी आजतलक गेल्ये न्हाई काकू. लहानपनी यकदा सिद्दार्थ गार्डेन बगीतले तेवडच. नवरा बी असला मिळालायना. कुटं जानं नक्को का येनं नको.
तुमच्या सारक्याच त्या एक काकू हाईता. त्या कुटबी गेल्या की मला तिथले फोटो, विडियो दाखवत्यात.
त्या बी इकडं-तिकडं पुनं-मंबई तुमच्यासारकं फिरत्यात. माग कुटं काश्मीरात गेलत्या तं मला सर्वे फोटो दाखवले. काश्मीर न्हाई वो. उंट कुटं असत्येत?
तिथ्थ त्या गेलत्या.
हां..राजिस्तान. मला म्हनत्यात राधे..तुला आवडतं ना असं फिरायला..ह्ये बग फोटो. लई ब्येष्ट फोटो असत्येत त्यांचे
..."तुला कुणाला बघायला आवडेल गं ? सलमान, शाहरुख, अमिताभ का प्रियंका, कतरिना का करिना" ?
आता बया, कुनी का अशेनात ? शिनेमातले असले म्हंजी झालं. मला लई हाऊस हाय शिनेमातली लोकं बगायची. कदी जमावं त्ये आपल्याला ? त्ये कुटं आपन कुटं ?
### ऐकीव माहितीनुसार.
मध्यंतरी शहरातल्या एका संगीत कार्यक्रमात एक डमी अमिताभ बच्चन, ख-या अमिताभ बच्चनची स्टाईल मारत स्टेजवर सहेतुकच प्रवेशून गेला तर श्रोत्यांमधल्या तमाम स्त्री-महिलांनी त्या डमी अमिताभलाच इतकं वेड्यासारखं सळो की पळो करुन सोडलं की त्या डमी व्यक्तीला पळता भुई थोडी झाली म्हणे.
(ख-या अमिताभच काय करतील कोण जाणे ?)
ख-याखोट्याच्या सीमेवर झगमगणा-या या सिनेता-यांच इतक्या जणांना अप्रुप असत ना की वेळ आल्यास भले भलेही अक्षरशः आचरटासारखे वागतात.
कुठल्याही दृष्टीने यशस्वी असलेल्या, larger than life असलेल्या, तसं भासवणा-या व्यक्तींच्या मागे सामान्यांनी धावणं हा फार सखोलपणे अभ्यासावा असा मास सायकॉलॉजीकल प्रॉब्लेम आहे.
No comments:
Post a Comment