कॉलेजच्या दिवसात आपल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बाहेर फिरायला सर्वांना लईच आवडतं. आणि सहजपणे आणि निकोपपणे ते हल्ली जमतं ही. या वयातले वाढदिवस म्हणजे बोनस व्हैलंटाईन दिवसच हो. मग काय निमित्तच मिळतं बाहेर पडायला, भावना पोहंचवायला.😉
आमच्या हिरण्यवरही असे बरेच युवा वाढदिवस सेलिब्रेट होत असतात. सुट्टीच्या दिवशी नाही. कॉलेजच्या दिवशीच.😃
पाच-सहा बाईक्सवरनं जोड्या कॉलेजमधनंच येतात. येताना छानसा केक आणतात. आजचं सेलेब्रेशन आधीच ठरलेलं असतं त्यामुळे मुली सुटसुटीत पण झक्कास ट्रेंडीली तयार होऊन येतात. मुलंही अपटूडेच असतात. अत्यंत निकोपपणे हसत खेळत मंडळी स्थानापन्न होते.
हिरण्यचा लोभसं, निसर्गरम्य परिसर..आल्या आल्या सगळ्यांची कळी खुलते. साधारणतः जोड्याच असतात. पण आजचा मान बर्थडे गर्लच्या जोडीचा. वाढदिवस अर्थातच जमलेल्या जोडीतल्या मुलीचाच असतो. मुलीच्या जोडीदाराने पुढाकाराने ही पार्टी ठरवलेली असते. त्यामुळे आल्या आल्या तो मेनू कार्डचा आणि खिशाचा अंदाज घेऊन आगावू सुचना रेस्टॉरंटमधे देवून ठेवतो. तोपर्यंत पोरी पोरींचा सेल्फिजचा खेळ रंगलेला असतो.😎
या दोघी, मग त्या दोघी, मग तिघी, मग असे केस पुढे, मग तसा गॉगल डोळ्यांवर..एकूण दुरुन बघताना करमणूकच होते. तेवढ्यात मुलींचे फोन वाजतात. कदाचित काही जणी घरी सांगून आणि काही जणी न सांगता येत असाव्यात. म्हणून मग सुखरुप पोहंचल्याच्या चौकशांचे घरगुती फोन येत असावेत.
जी ती मुलगी दूरचा कोपरा गाठून फोनवर बोलत आहे. होना, उगाच कुठे आहोत, का आहोत, कुणाबरोबर आहोत कुणाला कळायला नको ना. 😉
मग मागाहून एका मित्राचा तरुण फोटोग्राफर मित्र SLR घेऊन एका मित्राबरोबर हजर होतो. (मुलांनी, मुलींना खुष करायचा विडाच उचललाय जणू. 😊) फोटो म्हटलं की मुली खूष.😀
परत एकदा फोटोसाठींच्या पोजेसचं सेशन मग मात्र सगळेजणं ताटकळत बसलेल्या केककडे वळतात. बहुदा Dear **** Happy Birthday आणि गुलाबाचं एक फुलं असचं चितारलेला केक असतो. ❤️🌹
केक अर्थातच जोडीदाराने मागवलेला असतो. ऑर्डरबरहुकूम. (मित्रांकडनं उसनवारी घेत)
केक कापायच्या आधी परत जमलेल्या, जमू लागलेल्या जोड्यांचे लगटचे फोटो. त्यांच्यातली एखाद दुसरी मुलगी अवघडलेली. जरा वेगळ्या संस्कृतीत वाढलेली. त्यामुळे हाताची घडी घालून ती आपली मागे, मागे..फक्त हसण्यात हसणं मिसळवत, आणि ही खेळकर मैत्री बघत.🙄
मग शेवटी बर्थडे गर्ल केक कापणार. तिच्या शेजारी खेटून ऊभं रहायचा मान मात्र त्याचाच. जल्लोषात केक कापला जातो. तो तिला केक भरवतो. फटाफट फोटो निघतात. मग ती त्याला केक भरवते. मग झाडून त्याचे सगळे मित्र फोटो काढतात. परत एकदा दोघांचे खेटूनचे फोटो. एव्हाना त्याने तिच्या कमरेला विश्वासाने विळखा घातलेला असतो. एक तारुण्यसुलभ स्वप्नपूर्ती झालेली असते. 💕
हास्य विनोदात एकमेकांना केक भरवण्यात येतात.
सूत जमण्याच्या बेतात आलेल्या जोड्या एकमेकांना केक भरवताना भावनिकरित्या चारपावलं अजून पुढे जातात. 💞
ज्यांच अजून कश्यातच काही नाही ते एकतर यांचे फोटो काढतात किंवा सगळ्यांकडनं केक भरवून घेत केकचा फन्ना उडवतात.🎂🍰🍰🍰🍰
जरा स्थिरस्थावर झाली की मग तो प्रेमवीर रेस्टॉरंटमधे येऊन कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्सची जूळवा जूळव करतो.
आणि मंडळी ख-या अर्थाने दिलखुलास गप्पाटप्पांमधे गर्क होते.
दूरुन निरिक्षण करताना तरुण मुलामुलींमधली ही मैत्री छान वाटते. अत्यंत निकोपपणे ते एकमेकांच्या हास्य विनोदात सामील होतात. जगाची तमा नसते. आजचा दिवस आणि हाच क्षण असा सगळा मामला असतो. सतत हास्याचे फवारे उडत असतात. सहवासात चैतन्य सळसळत असतं. चराचरही ही तरुण खळखळ अपुर्वाईने बघत क्षणभर स्तब्ध होत असावं.😍
काही अंतरावरुन मी हे चैतन्य अनुभवते आहे. लॉनमधलं तण काढणा-या आमच्या कामगार महिला देखील डोळे भरुन हा शहरी उल्हास बघत आहेत. आणि रेस्टॉरंटमधे काम करणारी तरुण अविवाहीत मुलं दुरवरुन हा तारुण्यसुलभ अविष्कार बघताना
मनातल्या मनात आहेरे-नाहीरेच्या टाईटरोपवर हिंदकळत असावेत.🤔
No comments:
Post a Comment