महाराष्ट्रातल्या विसाव्या शतकातल्या एक महान विदुषी म्हणजे दुर्गाबाई भागवत. साहित्य, राजकारण, समाजकारण, निसर्ग, पाक संस्कृती, विणकाम-भरतकाम अशा अनेक विषयांमधे पारंगत असलेल्या, विपुल लिखाण केलेल्या दुर्गाबाईंनी सुगरण कोणाला म्हणायचा याचा एक किस्सा सांगितला होता, तो माझ्या एकदा वाचनात आलेला आणि कायमचा मनावर ठसलेला.
एकदा त्या कोकणात कामानिमित्त फिरत होत्या. काही निमित्ताने त्यांना एका गरीब कुटुंबात जेवायचा प्रसंग आला. घरात ठाण मांडलेली गरीबी, दारात पाहुणी. घरातल्या गृहिणीने दारातलाच लाल भोपळा तोडला आणि अख्ख ताट भरेल असे तिखट गोडाचे बरेचसे पदार्थ त्या एका लाल भोपळ्याचेच बनवून दुर्गाबाईंना जेवू घालून तृप्तही केलं आणि सुगरणपणाने चकीतही केलं.
दुर्गाबाईंच्यामते उपलब्ध साहित्यात अवडंबर न माजवता जी चतुरस्त्र आणि रुचकर स्वैपाक करते ती सुगरण.
तर आज दुर्गाबाई आठवायचं कारण, आज पाहुणे आहेत. घरात ताजातवाना दांडगा दुधी भोपळा आहे.
भारंभार विविध भाज्या, पदार्थ न वापरता आहे त्या भाजीतच आजचे मेजॉरीटी पदार्थ केले आहेत.
आपल्याकडे दुधीभोपळ्याला फार दुय्यम समजलं जातं. का ते कळत नाही. खरंतर कुठल्याही चवीत, मसाल्यात चपखलपणे मिसळून जाणारा दुधीभोपळा मला तरी फार आवडतो. फार वैविध्यपूर्ण कौशल्याने चिरता येणारी दुधी फार छान फळभाजी आहे. रंगही झकास असतो दुधीचा.
But somehow Bottle gourd is very much underrated vegetable of Maharashtra. गुजरातेत, आंध्रात फार छान प्रकारे दुधी वापरुन एक से एक पदार्थ बनवले जातात. मी स्वतः एकदा दुधीचा कीस घालून केलेला तांदुळाचा अप्रतिम चवीचा ढोकळा खाल्ला होता. अजूनही त्याची चव आठवत आहे. आंध्रातलं दुधीचं सांबारही चविष्टच लागते.
तर आज तीन पदार्थ दुधीचे केले आहेत.
दुधीची खीर.
दुधी सालं काढून जाडसर किसून घ्यावा. कढईत साजूक तुपावर हा कीस छान वाफवून घ्यावा. मग त्यात उकळून जरा आटवलेलं दूध घालून खीर उकळावी. दुधी शिजून बेताचा एकजीव झाला की वेलदोडे पूड आणि साखर घालावी. एका उकळीनंतर गैस बंद करावा. नंतर वरुन बदामाचे काप आणि थोड्या तुपात परतलेल्या काजूंनी खीर डेकोरेट करावी. मंद चवीची, सौम्य गोडीची ही खीर फार छान लागते.
दुधीचं भरीत.
साल काढून दुधीच्या बिया काढून टाकाव्यात आणि मध्यम फोडी करुन घ्याव्यात. थोड्या पाण्यात मीठ टाकून या फोडी गैसवर कींवा मायक्रोवेव्हमधे वाफवून घ्याव्यात. वाफवलेल्या फोडी गार झाल्या की निथळून घ्याव्यात. मग त्यात फेटलेलं दही आणि चवीचं साखर-मीठ टाकावं. साधारण झणक्याच्या आवडीप्रमाणे दोन चमचे कच्ची मोहरी भरडून घेऊन या दह्यात टाकावी, कोथिंबीरही मिसळून घ्यावी. नंतर वरुन या मिश्रणात मोहरी, हिंग, कढीपत्ता, मिरची आणि कणभर हळदीची चुर्र फोडणी दिली की झालं भरीत तयार. भरडलेली मोहरी मस्त झणकेदार लागते. हे भरीत जरा मुरलेलंच छान लागते.
Though absolutely I do not have very strong likes and dislikes in veg food,
but if at all someone insists for my favorite dishes, then this bottle gourd bharit is my one of the favorite dish for sure.
दुधीच्या सालांची चटणी.
वरील दोन्ही पदार्थ करताना आपण दुधीची साल काढून टाकली आहे. तर या सालींची चटणी पण सुरेख होते. अदरबदर कापलेली साल थोड्या तेलात कढईत मिरच्या, कढीपत्ता टाकून खमंग परतून घ्यावी. साल बरीच कुरकुरीत होत आली की इच्छा असल्यास त्यात सुकं खोबरं आणि तीळ टाकावेत आणि नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये मोठाड असं वाटून घ्यावं. चवीपुरते मीठ टाकले की झाली चटपटीत कोरडी चटणी तयार.
आज मी जरासं दोन चमचे पाणी घालून चटणी केली आहे. ही पण चटणी छान लागते.
पण कोरड्या चटनी दा जवाब नही.
दुर्गाबाईंचा दाखला देऊन मला सुगरणपणाच्या पंगतीत बसायचं नाहीये. पण त्यांनी जे नमूद केलय त्यात खरोखरच तथ्य आहे.
आहे त्यात साजरं करणं कधीही कौतुकास्पदच आहे नाही का ?
No comments:
Post a Comment