Sunday, 23 September 2018

मनोगत

अगं..उठ की ! तीन तीन अलार्म वाजले तरी ही बाई उठेना. कान फुटले का काय ? मला इथे खिडकीत अलार्म ऐकू येतोय आणि हीला ऐकू येईना ? काय बाई आहे. हां...आज रविवार ना ! आता, नोकरी न करणाऱ्या बाईला रविवार काय आन सोमवार काय सारखेचकीहो. या बायकांच काही तंत्रच कळत नाही.
हं..खुडबुड ऐकू येतेय म्हणजे उठली वाटतं.
चला आता खिडकी उघडली की आपण लगेच घरात प्रवेश केलेला बरा. थंडी वाढल्यामुळे कडकडून भुक लागतीये हल्ली.

हं...झोप झाली नाहीये वाटतं बाईसाहेबांची? हळूहळू सुस्तपणे कामं चालू आहेत ती. कीतीही म्यांव.. म्यांव करा, कीतीही हिच्या पायात, पायात करा ही बया ढिम्म बधत नाही. माणुसकी नावाची चिजच नाही.
आता आधी टेलाभर गरमपाणी पितील बाईसाहेब, मग लुसलुशीत साय काढून दूध तापवायला ठेवतील, मग चहा ठेवतील, मग पाण्याची मोटर सुरु करुन मागच्या अंगणातला गवती चहा आणतील, तो चहाच्या पाण्यात टाकतील आणि मग चहाचं आधण उकळेस्तवर बसतील कुठेतरी नजर लावून निवांत ते गरमपाणी ढोसत.
मी म्हणते हे असले गरमफिरम पाण्याचे चाळे करायचेच का ? मागचा-पुढचा विचार न करता तिन्ही त्रिकाळ चापायच आणि मग हे गरमपाणी पी, योगासनं कर, फिरायला जा, जिमला जा असले उद्योग करायचे. म्हणजे आधी अर्धा दिवस खाण्यात घालवायचा आणि उरलेला अर्धा त्याच्या दुष्परिणामांच निराकरण करण्यात घालवायचा. खरोखर या माणसांची गमंतच असते.

बघा..बघा..आता चहा गाळतीये, दूधही गाळेल आता. मी कधीची भुकेजून कासावीस होत आरडून -हायले आहे पण हिला त्याचं काही नाही.
बस!
आपला चहा, आपला मोबाईल, आपला चष्मा आणि ती आरामखुर्ची मिळाली की दुनिया गई भाडमें.
घंटाभर हलत नाही जागची. आणि एकदा का त्या फेसबुकमधे डोकं घातलं की तं देहभानंच हरपतं तिचं. मग मोटरही तिकडे चालूच रहाते, इकडे दुधही उकळतच रहातं. म्हणजे मी सुध्दा कधी धडपडत दुधाला तोंड लावलं तरी देखील हिला कळत नाही. पण मीच हल्ली ठरवलंय ही कशी का वागेना आपण नाही तापवलेल्या दुधाला तोंड लावायचं. एकतर तोंडही पोळतं आणि पिल्या दुधाला जागणं मलाही कळतं म्हटलं. उशीरा का होत नाही पण गवळीबुवा आले की देते हं चांगलं सढळ हस्ते दूध. होना, उगाच खोटं का बोला. आता तोपर्यंत काढावी लागते आपल्याला भुकेची कळ. पण चलता है.
झक्कास कच्च दुध मिळालं की आपण समोरच्याला सौ गुन्हे माफ करतो.
आणि आता तर सुपुत्र पण लंब्या दौऱ्यावरुन परतलेत नशीब पोरगा आईवर नाही गेला तो. जरा अमंळशाने उशीराच उठतो म्हणा. पण कीतीतरी वेळ सुस्तच असतो.
पण आपलं भुकेनी कासावीस झालेलं म्यांव.. म्यांव कानावर आलं की लगेच पाझरतो आणि तातडीने डॉगफूड आपल्या ताटात टाकतो. (तो एक बरी आपली वाघाची मावशी म्हणून इज्जत करतो आणि अधूनमधून नॉनव्हेज देतो) अस्स क्लास लागतं म्हणता ते डॉगफूड की ज्याचं नाव ते !
अहाहा..काय ती चव त्या कच्च्या दुधाची आणि त्या डॉगफूडची.
मस्तच.
झक्कासच.
अप्रतिमच.
एकदा का असली येथेच्छ न्याहारी झाली की मग तर आपलं बघायचच काम नाही. पटकीनी एक खुर्ची पकडायची आणि जगाची फिकीर न करता उबदार उशीवर ताणून द्यायची.
मग करा लेको तुम्ही तुमची कामं, स्वैपाक, नौक-या,
धंदे. आपल्याला काही देणं घेणं नाही त्याच्याशी.

बरंय बाई आपण माणूसजातीत नाहीयेत ते !
हे असं रोज उठून रांधा-वाढा-उष्टी काढा, नौकरीला पळा, आलं-गेलं बघा असली ढुला पायलावून करायची कामं आपल्याकडून होणं अशक्य आहे.
आपण आपलं म्यांव.. म्यांव करावं, उशीराने का होईना पण आयतं जेवण मिळतय त्यात आनंद मानावा. कुणीतरी म्हणूनच ठेवलय ना सब्र का फल मीठा होता है म्हणून !

1 comment:

  1. खूप छान लेखन .बरेचसे अनिल अवचट लिहीतात तसेच. आणि खूपशा सवयी माझ्या तुझ्या अगदीच सारख्या. मला माझ्या काही stressमधून बाहेर पडता येत आहे.thanks a lot.

    ReplyDelete