Monday, 17 September 2018

माहेरवाशिणी महालक्ष्म्या...

ठरवल्याप्रमाणे कालही हिरण्यजवळच्या मौसाळा या गावी महालक्ष्म्यांसाठी गेले. गेले चार वर्ष नियमित जाते. मागच्या वर्षी माझ्याच मिस्टरांना बरं नव्हतं म्हणून जाऊ शकले नाही.
विसवर्षापुर्वी या गावातल्या दोन महिला काम मागायला म्हणून आमच्या शेजारच्या जमीनवाल्याकडे गेल्या. त्यांच्याकडे तर काम नव्हतं पण त्यानी त्या बायकांना आमच्याकडे पाठवलं. आम्हालाही माती कामाला माणसं हवीच होती. या दोघींना लगेच कामावर घेतलं. अशाप्रकारे हिरण्यमधल्या पहिल्या इमारत बांधणीत मौसाळ्याच्या भामाबाई आणि शशीकला या दोघींचा हात लागला आहे.

कालांतराने हुरडा पार्टी सुरु झाली. रात्रीपर्यंत लोकं यायचे. मग भाक-या करायला कुणी नसायचं. मग भामाबाई रात्री नऊवाजेपर्यंत थांबायला लागली. हिरण्यपासून तिचं घर मेनरोडने निदान पाच किलोमीटरवर, तेही घाटावरच्या टेकाडावर. म्हणजे रिक्षातनं मेनरोडवर उतरलं तरी बरच चालत जावं लागायचं. इतक्या रात्री काळी पिवळी शेयर रिक्षापण नसायची. मग व्यक्तीशः आम्ही तिला घरी सोडायला जात असू.
अक्षरशः टिचभर खेड्यातली एक संसारी बाई हॉटेलच्या गाडीतून रात्री घरी परतते म्हणजे काय ? भामाबाईला गावातनं खूप त्रास झाला. बायकांनी टोचण्या मारल्या. पण ती आणि तिचा पती धीराची निघाले आणि भामाबाई आमच्याकडे नियमित येऊ लागली.

कालांतराने आमचा व्याप वाढत गेला आणि मग या गावातूनच ब-याच महिला-पुरुष आमच्याकडे कामाला सातत्याने येत राहिले आणि हिरण्य कुटुंबाचेच एक भाग झाले. तर या महिलांना रात्री घरपोच सोडायच्या निमित्ताने माझं रात्रीच फार येणं-जाणं व्हायचं मौसाळा या गावी.
आता अनेक वर्षांच्या सहवासामुळे या लोकांशी खूप नातेबंधही तयार झाले आहेत. मग या महिलाही मला कौतुकाने, आग्रहाने महालक्ष्म्यांना बोलावू लागल्या.

मग या महिलांच्या आमंत्रणाला मान देत मी आणि आमचा इतर स्टाफ या महालक्ष्म्यांसाठी म्हणून या मौसाळा गावात दरवर्षी जाऊ लागलो. घरोघर दर्शनं घेताना त्यांच्या इतर कुटुंबियांशी ओळखी झाल्या. आपली सून, बायको, आई ज्यांच्याकडे कामाला जाते त्या बाई, ज्यांच्याबरोबर काम करते ते सहकारी आपल्याकडे आले म्हटल्यावर इतर कुटुंबियांबरोबर निश्चितच एक विश्वासाचं, जिव्हाळ्याचं नातं तयार होतं. मला हे फार महत्वाचं वाटतं. म्हणजे मी या महालक्ष्मींच्या निमित्ताने या गावात जातेच ते मुळी या कारणासाठी.

अगदी छोट्या गावाजवळच्या टेकाडावरचं टिचभर गाव.
सगळी घरं आपापसातल्या नातलगांचीच. आता हुरडा पार्टीत या गावातल्या निदान आठ-दहा महिला तरी आमच्याकडे कामाला असतात. सासू-सून, जावा-जावा, नणंद-भावजया, नवरा-बायको अशा जोडीने कामाला येणाऱ्या पण महिला इथे आहेत. नेहमीच्या सहवासामुळे मलाही त्यांच्या कौटुंबिक घडामोडींची बरीच माहिती असते. साहजिकच मला एका विस्तारित कुटुंबात सामील झाल्यासारखं वाटतं.

तर कालही हिरण्यवरनंच मौसाळ्याला महालक्ष्म्यांच म्हणून मी आणि इतर महिला गेलो.
गावात शिरलंकीच एका मोठ्या सणाची चाहुल पदोपदी जाणवत होती. दारोदार सडा रांगोळ्या, भपकेबाज लोकरीची तोरणं दाराला, घरोघरच्या दारासमोर मोटरसायकल्स्, चारदोन चारचाक्या, एखादी टवेरा.
घराच्या ओसरीवर घरातले सोफासेट आणून ठेवलेले. त्यावर वडीलधारे, शहरातले कमावते तरुण मस्त गप्पा ठोकत बसलेले. मुलांच आतबाहेर चाललेलं. षोडश पोरी झकास तयार होऊन बसलेल्या. आणि घरामधल्या बैठक खोलीत महालक्ष्म्यांची ऐसपेस आरास मांडलेली.
मोठ्या चौकटीवर झुळझुळीत साड्या सोडलेल्या. नखशिखांत चमचमत्या देखण्या, गौरांगी जेष्ठा-कनिष्ठा, समोर त्यांची राजस मुलं, चौफेर रंगीत दिव्यांची रोषणाई, उपलब्ध फुलापानांच देखणं डेकोरेशन, धान्यांच्या राशी, फळांचे ढिग, वैविध्यपूर्ण पारंपारिक खाद्यपदार्थांची सुबक मांडणी. उरलेल्या जागेत घरातली मुलांची खेळणी, समोर आरतीच्या बत्तीस दिव्यांच ताट, हळद कुंकाच तबक...
घरातल्या अंधा-या रुपाला झळाळून टाकणा-या, घराघरात चैतन्य आणणा-या, तमाम कुटुंबीयांना एकत्र आणणा-या  चिरंजीव महालक्ष्म्या.

घराघरातनं माझ्या येण्याच कोण कौतुक !
घरोघर जेवायचा आग्रह. स्वैपाकघरात महालक्ष्म्यांसाठी म्हणून खास आलेल्या बहिणी-नणंदा-भाच्यांची फौज. आपापल्या हात खंड्याप्रमाणे त्याही लवलवून कामं करण्यात तरबेज. फराळाचे लाडू, चकल्या, करंज्या, शकंरपाळे, साटो-या इत्यादी दोन-चार किलोंच्या मापाने करणे, डेकोरेशन करणे, महालक्ष्म्या ऊभ्या करणे-नटवणे, नैवेद्याचा स्वैपाक करणे, घरं आवरणे, आलेल्यांना जेवायला वाढणे...भराभर मदत करणारी, कामं हातावेगळी करणारी ही उत्साही, हसरी महिला फौज असते.

भराभर आसनं मांडली, ताटं वाढली गेली.
पदार्थांच कौतुक करायचाच अवकाश पदार्थ पानात पडलाच समजा. पुन्हापुन्हा माझं (मोठे लोक) त्यांच्याकडे (गरीबाकडे) येण्याचं मनापासून कौतुक.
गेल्या वीसवर्षातली वाढती संपन्नता घराघरातनं जाणवण्या इतपत. स्लॅबची घरं, शिमिटाच्या हवेशीर खोल्या, सिरेमिकच्या टाईल्स, घरपरत संडास, चुली घराबाहेर गेलेल्या, घरोघर टीव्ही, फ्रीज, मिक्सर...पाहून छान वाटलं.

प्रसन्न घरधनीण.
पै पाहुण्यांनी भरलेलं, महालक्ष्म्यांनी उजळलेलं घर.
घरात बाळांतीण लेकबाई.
गुटगुटीत नातू.
या सणाची महिन्यापासूनच तयारी करावी लागती म्याडम.
सगळं धुनंधानं करावं लागतयं. ह्ये वरचे कपडे, कपाटातले कपडे, भांडी-कुंडी सगळं स्वच्छ करावं लागतं. पुढचं-मागचं अंगण सारवावं लागतय. पाऊसपानी बघत तं लगी लयीच कामं निघत्येत. मंग चारदिस आदीपासून दोन-तीन किलोंचे रव्याचे-ब्येसनाचे लाडू, करंज्या, शंकरपाळे, शेव करावी लागते.
स्वैपाक बी गंज करावा लागतो. लगी शंभर जनं आले तरी संपत न्हाई. लक्ष्मीच्या जेवनाला तोटा नसतो कधी.
माझ्या बहिनी, नंनदा लगी चार दिवसापासून इथंच हाईता.
घरच्या बाया महालक्ष्म्याचं तीन दिवस रोज डोक्यावरनं पानी घेत्यात. पाच वाजता उठीतो आम्ही. यकदोगी स्वैपाकाच बघत्यात. येकजन लक्ष्म्यांचं बगती, यकजन घरातलं बगती. ही माजी बहीन हाय म्याडम. लयीच कामाची हाय. ती आली का लगी काळजीच रहात न्हाय. सगळं सांबाळून घेती. गंज चार किलोंच पुरन घातलंय आज. किलोभराची कढी केलीये. ही सुक्की भाजी म्हंजी सोळाभाज्यांची यकच भाजी हाय. आता तुमाला तं माहितीच हात आमच्या गावात लगी काईच मिळत नाई. तर ही बहीन सगळ्या भाज्या तालुक्याहून घ्येवून आल्ती. सगळ्यांनी केल्या बिगर लक्ष्म्यांच होतच न्हाई म्याडम. मंग आपन बी सगळे बेतशीर करीतो. मंग काय आपल्याच्यानी पुन्ना कायपन द्येवाच करनं होत नाही. मग यव्हाच सगळं वेवस्तित कराचे. सर्वे गणगोत येतेत घरी. माहेरचे बी, सासरचे बी. औंदा त माजी लेकपन हाये. नातू झालाय मला.
घर भरले की बरं वाट्ते.
गोरटेली, किडकिडीत बांध्याची, ठसठशीत बोरमाळ, डोरलं, मणीमंगळसुत्र गळ्यात घातलेली, हळद-कुंकानी कपाळ भरलेली, प्रसन्न घरधणीन तृप्त होती.

शहरीमानाने कमी शिकलेल्या या एकेक अडाणी तरुण महिला म्हणजे प्रसन्नतेचे तृप्त झरे आहेत.
कुठलाही बडेजाव नाही. जमेल तशी, रुचेल तशी देवीची आराधना. दारी येईल त्याचं स्वागत, त्याला जेवायचा आग्रह.
स्वैपाकघर म्हणजे तर अक्षरशः अन्नपुर्णाचेच माहेर.
भजे, कुरुड्या, पापड, पुरणपोळी, साधीपोळी, सोळाभाज्यांची अप्रतिम चवीची मिक्स भाजी,
तांदुळ-दुधाची  पातळ खीर, कढी, भात, कटाची आमटी (ही आमटी तर बाहेर चुलीवरच उकळत होती. सर्वांना गरमागरम मिळावी म्हणून)..ऐसपैस ताटं देखील ओसंडून जावीत असा बेत आणि वाढणं.
सगळं वागणं एकदम मनमोकळं. देवींच दर्शन घेणं, एकमेकींना हळद-कुंकू लावणं. (म्हणजे भुवयांच्यामधे आधी कुंकू मग त्यावरच परत हळद लावणं..एक नवीनच पध्दत)
आग्रह अगदी मनापासून, तरीपण अवास्तवपणे नाही.
आलेल्यांच स्वागतच पण नाही कुणी आलं तर राग नाही. म्हणजे रितीने सगळं करायचं, पण त्याचं अवडंबर नाही. करण्यातही आक्रस्ताळेपणा नाही. कुणाचीही कुणाशी स्पर्धा नाही. दुजाभाव नाही. फोटोंचा सुळसुळाट नाही. एक शांत धार्मिक वाहणारा निर्झर. आवडल्यास थांबा, इच्छा असल्यास आनंद घ्या, तुमची मर्जी.
एक सहज सुलभ, निकोप साजरीकरण मला विशेष जाणवलं आणि भावलं पण.

हल्ली कॉस्मोपॉलिटन शहरांमधे कॉस्मोपॉलिटन मित्रमंडळीना बोलावून आपापले जातीवैशिष्ट्यं असलेले हळदीकुंकू वा इतर धार्मिक समारंभ तडाखेबंदरीत्या यशस्वी करण्याची अहमिकाच लागलेली असते हे फेसबुकवरच्या 'ड्रेसी' व 'पाऊटी' सेल्फीज बघून कळतं.
असो.

तर एका सामाजिक सदहेतूने आखलेली माझी ही भेट
मलाच संपन्न करुन गेली हे मात्र खरं.

No comments:

Post a Comment