नुकती महाराष्ट्रातल्या दोन विख्यात मराठी नाट्य-चित्रपट-मालिका महिला दिग्दर्शिकांची आत्मचरित्रपर पुस्तकं वाचली. नाट्य-चित्रपट क्षेत्रच असं आहे की दैनंदिन दिवक्रमाची वाट लागते. त्यात महिला म्हणजे तर अजूनच कसरत. घर-कुटुंब सांभाळून कार्यरत रहायचं आणि त्यातही पुरुषप्रधान व्यवसायात, क्षेत्रात नावं कमवायचं. सोप्पी गोष्ट नाहीये ही. म्हणजे आई-गृहिणीच्या भुमिकेतून वेळोवेळी कामासाठी कुटुंब बाजूला सारुन न्याय द्यायचा आणि परत कार्य क्षेत्रातही पुरुषांच्या पुरुषी वृत्तीकडे दुर्लक्ष करत आपलं कार्य नेटाने पुढे न्यायचं. प्रत्येकच स्त्री साठी ही अग्नीपरिक्षाच असते. या दोघी लेखीकांनी वेळोवेळी कामाच्या निमित्ताने घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष झालय हे नमुद केलयं. घरातल्या इतरांच्या पाठिंब्या शिवाय त्या त्यांच कार्य सिध्दीस नेऊ शकल्या नसत्या याचीही त्यांना जाणीव आहे.
तर पुस्तकं हाता वेगळी केली की त्यातल्या संदर्भातल्या गोष्टी नेटवर, विकिपीडियावर पडताळून पहायची, अधीकचा शोध घ्यायची मला सवयच आहे.
त्याप्रमाणे मी सई परांजपेंच्या आणि विजयाबाईंच्या कुटुंबियांचा शोध घेतला. तर विजयाबाईंच्या कन्येचं फेसबुक अकाऊंट चेक केलं. तर त्यांच्या मुलीने एक पोस्ट "Me Too" एवढ्याच मथळ्याची टाकलेली दिसली.
मध्यंतरी बहुतांश मुलींना, महिलांना सेक्शुयल एब्युझला सामोरं जावं लागतं याची जनजागृती करण्यासाठी आणि स्त्रीजातीच्या मुलभूत समस्येची ग्रेव्हीटी समाजाला कळावी, त्याविषयी निकोप चर्चा व्हावी म्हणून एक "Me Too" एवढ्याच दोन शब्दांच्या पोस्टींची चळवळ सोशल मिडियावर चालली होती.
फार काही लिहायचं नाही. फक्त आपल्याला याचा अनुभव आला असेल तर आपल्या पोस्टवर Me Too हेच दोन शब्द निर्भिडपणे लिहायचे. अशा गोष्टींच्या नादी मी लागत नाही. पण या चळवळीमुळे ब-याच प्रथित यश अभिनेत्री, कलाकार, व्यावसायिक, गृहिणी महिला कनेक्ट झाल्या. बोलक्या झाल्या. विशेषतः जगन्मान्य कलावंतांच्या मुली, फायर ब्रैंड अभिनेत्री पण या सेक्शुयल एब्युजला बळी पडलेल्या होत्या.
तर सांगायचा मुद्दा की स्त्री ही घरात बसू देत का बाहेरच्या जगात तळपू देत तिच्या मागचा हा लैंगिक छळाचा ससेमिरा सुटतच नाही. म्हणजे स्वतःसाठी देखील जागरुक रहायच आणि आपल्या पोटच्या मुलीसाठीही काळीज पोखरुन घ्यायचं. एक करायला जावं तर दुसरं हातून सुटतं. सतत कुठल्यान कुठल्या कृतीची किंमत तिही अशी चुकवावी लागणं ही स्त्री जीवनाची ही फार मोठी व्यथा आहे.
ख्यातनाम मराठी महिलांची नुकतीच वाचलेली पुस्तकं आणि नंतर त्यातल्या एकीच्या मुलीच्या Me Too च्या पोस्टमुळे उठलेलं हे माझं वैचारिक वादळ आहे.
स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारत श्रावण-भाद्रपद-नवरात्राची झिंग समाजावर चढत्याभाजणीने चढत असताना तमाम दुनियेतील एकतरी महिला अशी भेटावी जी अशा छळाला आजपर्यंत बळी पडलेली नाही. हे माझं एक दिवास्वप्न आहे.
No comments:
Post a Comment