अनाहूतपणे जमलेली श्रावणातली मेजवानी.
हल्ली आम्ही जाणीवपुर्वक भाकरीच खातो. ग्लुटेन नको म्हणून. And believe me..गव्हानी शरीराला येणारा जडपणा कुठल्या कुठे पळून जातो. दिवसभर हलकं वाटतं.
तर गैसवरच्याच खरपूस भाकरी, दोडक्याची दाणेकूट, तिखट, काळामसाला, थोडा गूळ टाकून केलेली रस्सा भाजी. दोडक्याच्या शिरांची चटकदार चटणी. दुधी भोपळ्याची खीर आणि टोमॅटो सूप.
तर भाकरी-भाजी विषयी नो कमेंट.
पण यस्स...दोडक्याच्या शिरांची चटणी म्हणजे नुसती खावी अशी.
सोलाण्याने दोडक्याच्या शिरा काढून घ्याव्यात. कढईत अंदाजे कमीच तेल गरम करावं त्यात लसूण आणि तिळ टाकावेत. तिळ तडतडलेकी शिरांचे तुकडे टाकावेत. हाय फ्लेमवर कुरकुरीत करुन घ्यावेत. आवडत असल्यास कढीपत्ताही टाकून कुरकुरीत करुन घ्यावा. कुरकुरलेलं मिश्रण मिक्सरमध्ये अदरबदर काढून घ्यावं. चवीचं मीठ आणि तिखट टाकलं की झक्कास चटणी तयार. भाकरी बरोबर तर ही चटणी फर्मासच लागते.
दुधीची खीर...दुधीची सालं काढून दुधी जाडसर किसून घ्यावा. कढईत तुप टाकून हा किस व्यवस्थित वाफवून घ्यावा. नंतर शिजलेल्या किसात दुध टाकून दुधी पुर्णतः शिजवून घ्यावा. चवीप्रमाणे साखर आणि वेलदोडापूड टाकून खिरीला एक उकळी द्यावी. सर्व्हिंग बाऊलमधे काढल्यानंतर अगदी चमचाभर तुपात परतलेल्या काजू तुकड्यांच ड्रेसिंग करावं. हलकं फुलकं स्विट छानच लागतं.
मेजॉरीटी टोमॅटो वापरलेत म्हणून टोमॅटो सूप म्हणायचं.
५ टोमॅटो, १ कांदा, मुठभर मोडाची मटकी, दुधीचे काप, १ गाजराचे तुकडे करुन घ्यावेत. कुकरमधे पांढरं लोणी पातळकरुन त्यात लसूण, दालचिनी, तमालपत्र, मिरे, लवंग परतून घ्यावेत. चमचाभर कणिक देखील छान घमघमाट सुटेपर्यंत परतावी. मग या चिरलेल्या सर्व भाज्या आणि मटकी टाकावी. थोडंस परतावं. २ कप पाणी टाकून तिनचार शिट्या कराव्यात. कुकर गार झाला की मिश्रणात ब्लेंडर फिरवून मिश्रण एकजीव करुन घ्यावे व एका चाळणीने गाळून घ्यावे. कन्सिट्न्सीप्रमाणे पाणी घालून सूप परत गरम करावे. चवीनुसार मीठ-गुळ टाकावे. एकदम पौष्टिक आणि घरातल्या आहे त्या भाजीपाल्यात, जिन्नसात होणारं हे सूप आहे.
कधी कधी न ठरवताच बेत फक्कड जमून जातो नाही ?
No comments:
Post a Comment