Friday, 24 August 2018

सय आणि झिम्मा...

श्रावणी सुक्कीरवारची पोस्ट.

एकांना भेट द्यायला म्हणून आणलेली दोन कार्य आत्मचरित्रपर पुस्तक गेल्या दोन आठवड्यात वाचून काढली.
'सय' माझा कलाप्रवास' हे सई परांजपेंच एक आणि दुसरं विजया मेहतांच 'झिम्मा' आठवणींचा गोफ' हे पुस्तक.
दोघीही प्रथितयश कलावंत, नाट्य दिग्दर्शिका, चित्रपट दिग्दर्शिका, निर्मात्या आणि लेखीका पण. थोडक्यात दोघीही मराठी महिला या कलेच्या प्रांतात चतुरस्रपणे वावरलेल्या.
दोघींचही मराठीपण आपल्याशी फार आत्मीय नातं निर्माण करतं. दोघींनाही सरळधोपट आयुष्यातही काही वेगळं दान मिळालेलं. आणि दोघींनीही त्याच चिज केलेलं. सईला मिळालेले आजोळचे बाळकडू तर विजयाबाईंना तरुणपणी मिळालेलं आंग्लभाषेच, वातावरणाचं बाळकडू. दोघीही तथाकथित उच्चभ्रू आणि पुरोगामी घरातल्याच. त्यातही नाट्य, चित्रपट, टीव्ही माध्यमात वावरणाऱ्या तरीही या दोघींच मुळातलं मराठीपण ठाईठाई जाणवतं.

आपापल्या कलाप्रांताप्रतीचं त्यांच प्रेम, सखोल डुबी मारायची वृत्ती, सकस तेच समोर आणायचा अट्टाहास, त्यासाठीची जीवतोड मेहनत आणि भारतीयत्वाचा जाज्वल्य अभिमान...हे सगळं वाचणं, जाणवून घेणं फार मनोज्ञ आहे.
माझ्यामते घरोघर ही आणि आणिक दोनचार(नासिरुद्दीन शहा, गिरीश कर्नाडांची आत्मचरित्र) पुस्तकं वाचली गेली तर भारतीय समाजावरचं बटबटीत, ढोबळ चित्रपटांच, मालिकांच गारुड नक्कीच कमी होईल.

संहिता, त्याचं नाट्य-चित्र रुपांतरणं, सादरीकरण, चित्रीकरण, त्याचं नेपथ्य, संगीत, अभिनय अशा विविध अंगांचा या दोन्ही मराठी स्त्रियांनी केलेला सखोल अभ्यास पाहिला की खरोखर आपण अंतर्मुख होतो.
परत त्यांच्या नाट्य, चित्रपट कलाकृती एका वेगळ्याच दृष्टीकोनातून, समजून उमजून पाहाव्यात असं प्रकर्षाने वाटतं रहातं.
एकूणच नाट्य, चित्रपट निर्मिती विषयी आपल्या जाणीवा रुंदावणारं हे वाचन ठरतं.
दोघींचेही वैयक्तिक स्वभाव वैशिष्ट्ये या पुस्तकांमधून अनाहूतपणे झिरपत रहातात.
दोघींनीही या पुस्तकातून प्रामुख्याने त्यांच्या कलाजीवनाविषयालाच झुकतं माप दिलं आहे. तरीही अधून मधून वैयक्तिक, कौटुंबिक स्थित्यंतराचीही कलाबूत आहेच.

सई परांजपे आणि विजया मेहता या दोघींनी आपापला स्वाभाविक पण वैशिष्ट्यपूर्ण ठसा त्यांच्या दिर्घ कलाप्रवासावर उमटवलेलाच आहे. काहीप्रमाणात 'सय' आणि 'झिम्मा' या पुस्तकांवरसुध्दा तो ठसा उमटलाय.

मराठी घरात रशियन वडिलांच लख्ख गोरेपण आणि भुरे-निळे डोळे घेऊन जन्माला आलेल्या, मांजरांच अतोनात प्रेम असलेल्या सई पंरांजपेंच या पुस्तकातलं कौटुंबिक वर्णन अतिशय माफक आणि जेवढ्यास तेवढंच आहे. अर्थात 'सय' हे पुस्तक त्यांच्या कलाप्रवासाचीच नोंद घेणारं आहे.
तर विजया मेहतांच्या 'झिम्म्या'त देखील कलाप्रवासाच्याच ओघवत्या, सखोल नोंदी आहेत. पण बाईंच्या लोभस हास्याप्रमाणेच कौटुंबिक गोष्टींचा देखील एक लोभस गोफ त्यांनी या पुस्तकात विणलाय.
त्यामुळे या झिम्म्याच पारडं जरास जड झालयं.

No comments:

Post a Comment