Friday, 24 August 2018

पाहिजे जातीचे.

आज झटपट अकारण दुधी भोपळ्याची खिर केली आणि अचानक मन भुतकाळात गेलं.
माझा मुलगा जेमतेम दोन वर्षांचा असेल, आमच्या एक Co LPG dealerच्या मिसेस म्हणजे एका मारवाडी भाभींनी मला त्यांच्या समाजाच्या बीसीत सामील केलं. त्यांचं तिसरं अपत्य (मुलगा) आणि माझा पहिला मुलगा एकाच वयाचे. मी तशी फार सोशल नाही. त्यामुळे भाराभर मैत्रीणी, त्यांचे गोतावळे-कार्यक्रम याची रेलचेल माझ्या आयुष्यात नसते. तर मी जरा सोशल व्हावी या सदहेतूने त्यांनी मला 'त्यांच्या' बीसीत घेतले. मी पण विनातक्रार त्यांच्यात गेले. जवळपास वीस मारवाडी महिला. त्यातही काही जावा-जावा, नणंदा-भावजया अशा पण होत्या. एक दहाबारा पार्ट्या छानच झाल्या. चार तो सहाची वेळ. खाण्यापिण्याची रेलचेल. डोकं लढवून, शोधून काढलेले खेळ, अगदी कुणाशी मैत्री जरी नाही झाली तरी महिन्यातले तीन तास बरा वेळ जायचा. शिल्लकही पडायची. मुलगाही मित्राबरोबर रमायचा. माझीही एका वेगळीच करमणूक व्हायची. बाकी काही म्हणा बीसीमधले नवनवीन खेळ शोधून काढण्यात या मारवाडी महिलांचा हात कुणी धरु शकत नाही. खरोखर अचाट बैठे खेळ शोधून काढता. जिंकायच्या इर्षेने हिरीरीने खेळतात. बक्षिसांसाठी भांडतात, तंडतात. काही विचारु नका. त्यात एकाच घरातल्या जावा-जावा, नणंदा भावजया असल्या की ती एक कडकडीत फोडणी असायची या धुम्मसला.
या सगळ्यांमधे मी एकटी मराठी, ब्राह्मण महिला.
त्यांनाही मी मिसफिट आहे हे कळायच, पण फार जाचक कुणालाच होत नव्हतं म्हणून दहाबारा महिने निभलं.
मग एकदा माझाच नंबर लागला आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. छोटसं घर, लहान मुलगा, हाताशी कुणी नाही, एवढ्या वीसजणींसाठी शिजवायला भांडी नाही का खिलवायला क्रॉकरी नाही, तेवढ्या खुर्च्या नाही का सतरंजी पण नाही. भलतीच पंचाईत झाली.
आता निभावणं तर भागच होतं. तसही तरुणपणात दांडगा उत्साह आणि बेधडक आत्मविश्वास असतो.
मारवाड्यांमधे आपला मराठी बाणा दिसलाच पाहिजे. काय स्फुरण चढलं म्हणता.
पाककलेची पुस्तकं पालथी घालत मक्याचा उपमा आणि दुधी भोपळ्याची खिर असला वेळखाऊ, जीवकाढू बेत ठरवला. बहुदा इडली-चटणी पण ठेवली होती. नक्की आठवत नाही पण मक्याचा उपमा आणि दुधीची खिर असला खणखणीत मराठी बेत होता हे नक्की.
मी फ्लॅटमधे रहात असे या काळात. माझ्यासमोर उत्तराखंड मधलं साधंसुधं कुटुंब रहात असे. ही शेजारीण खूप साधी होती. या बाईंची मुलं, आई, सासरे माझ्या अवखळ मुलाला सांभाळायला कधीही तत्पर असत.
बीसीच्या आदल्या दिवशी आम्ही दोघी स्कुटरवरनं बाजारहाट करायला गेलो. माझं साठ किलो वजन, त्यांच ऐंशी, त्यात दहा-बारा किलो मके, पाच-सहा किलो दुधी आणि इतर सामान दोनेक किलोंच..ती स्कुटर कशी आणली माझं मलाच माहित. आदल्या दिवशी दोनतीन शेजा-यांकडनं मोठाली पातेली, झारे, सतरंजी काही खुर्च्या आणवल्या. पाककलेत मुरलेल्या शेजारी महिलांकडनं विशेष नुख्से प्राप्त करुन घेतले. मुलाला शेजा-यांकडे सोपवू अशी कामाला भिडले की ज्याच नाव ते. मका किसणं, फोडणीला टाकून वाफवणं, दुधी किसणं, वाफवणं, खिर करणं..राम..राम...राम...अक्षरशः नको नको झालं. तरी वेळेत सगळं झालं. पटापटा बायका आल्या, गप्पाटप्पा झाल्या. खेळही झाला. हारणं-जिंकणही झालं. त्यांचीच आपापसात तु..तु..मी..मी..पण झालं. माझी अवस्था तर शिंगरु मेलं हेलपाट्याने अशी अवस्था झालेली. सरबराई कर करुनच मी दमले. खाणंपिणं करुन जरा कुजबूज करतच महिला परतल्या. नंतरची आवरा आवर निस्तरायला मला चारदिवस लागले.
मग कधीतरी भाभींशी बोलणं झालं तर त्यांनी मोघमपणे खाण्याच्या मेन्युवर तमाम मारवाडी महिला नाराज झाल्याच सांगितलं. साहजिकच आहे. मी मला पटला तो मराठी पण अवघड मेन्यु ठरवला आणि अक्षरशः एकहाती पार्टी निस्तरली.
मारवाडी समाजात नातलगांची खूप येजा असते, कार्यक्रमांचीही रेलचेल असते. त्यासाठी घरात सगळ्या सोई असतात, मनुष्यबळ असतं आणि मुख्य म्हणजे अशा कार्यक्रमांसाठीची मानसिकता कारभारणीची असते. माझ्याकडे सगळीच वानवा होती. फक्त मराठी जाज्वल्य अभिमान, आत्मविश्वास होता आणि पाककलेचं पुस्तक हाताशी होतं. पण धोरणीपणाने मार्गदर्शन करणारं कुणीच नव्हतं.(हाही मराठी बाणाच बरं..आपण आपलं करायचं)

No comments:

Post a Comment