उ उवाच.
"आई..माझे केस विंचरना, शाळेत जायची वेळ झाली."
...राहुदेत आज जरा वेणीफणी, एकदिवस नाही विंचरले केस तर काय आकाश कोसळणार आहे का ? जा बस लपून त्या मोनूच्या पेडात.
"नाही गं आई..मला शाळेत खेळायच असतं, बागडायचं असतं..आणि माहितै उषा आणि उमा आम्ही मज्जा करतो शाळेत. एकदा ही वेणी, एकदा ती वेणी असा लपंडाव खेळतो आम्ही तिघीजणी शाळेत. मग मोनूचा ड्रॉईंगचा क्लास असला की आम्ही झटपट जेवण करतो आणि तिचं ते सुरेख चित्र रंगवणं आम्ही कपाळावरच्या बागेत जाऊन लपतछपत बघतो. आई मला असे रंग आणून देना."
...ए गपे..कारटे..मोनूबरोबर शाळेत जायाला लागली तं भलतेच शिंग फुटू -हायले तुला. थांब तुला त्या कमाज्जीच्या भुस्कुटावानी डोक्यात सोडते एकदा. म्हणजे तुझा हट्टी पना कमी होईल.
"आई...मी चालले शाळेत."
...शानी गं माझी बाय. निट जा, निट -हा, बाहिर फार फिरु नको. आणि हे बघ मला मैतीये तुला मराटीचा तास, कविता आवडतात ते पन लगेच ती चष्मिष्ट मास्तरीण आली की बाहेर नको डोकावू. हकनाक जीव जाईल बाळा. आलं का लक्षात. करायचय काय आपल्याला गवत फुलारे गवत फुला किंवा गाई पाण्यावर काय म्हणूनी आल्या या कविता ऐकून ?
"आई..टाटा..."
...परमेश्वरा या मोनूमुळं शाळा, खेळाचं मैदान, बगिचा, फुलंपानं, वाढदिवस, बाजार तरी माझ्या बबडीला पहायला मिळतोय रे. नाही तं आम्ही ? बसलोय वृध्दाश्रमातल्या झिंज्यात रडकथा ऐकत. तो मपला दादला कधीच उलथला पदरी खंडीभर पोरं टाकून. आता मी बसलेय संसार रेटत. एवढं खटलं घ्येऊन हे शेहरात निभणं काय खरं हाय का ? दिसायला लई मोप गर्दी दिसत्ये, गलिच्छपना दिस्त्ये पन आमच्या समाजाला कुन्नी टिकू देईनात हल्ली. किती का डोस्क्यांची स्थलांतरं करा. जीव मुठीत घेऊनच राह्वे लागत्ये. त्या मोदी-फिदीनं तं सोच्छतेचा ईडाच उचिल्ला हाय म्हनं. रस्ते काय, संडासं काय, ड्रेनेजा काय, बागा काय, इमारती काय, ट्रेना काय, बसा काय...
सगळं सम्दी चकाचक करु -हायलाय जो तो.
त्या रिकामटेकड्या सिरियला पाहना-या आया-बाया पन लई चतुर झाल्याईता. कुटं म्हनुन टिकू देईनात. दिसलो आम्ही कुनाच्या डोस्क्यात की लावलंच समजा अवषिध भसाभसा. "अगं ये टवळे..किती लावशील अवषिध ? ऑं ? आमचा बी जीव चाल्लाय आन तुजी पोरगी बी बोंबलू लागली ना ठणाणा."
अशा फराफरा इंचरत्यात कि ज्याचं नाव ते. मी म्हन्ते अशा वातावरनात कुटं जावं आमी आन कसं प्वोट भरावं आम्चं ?
त्या मान्सांच्या ह्युमन राईटस्वाल्यांसारखं कुनी आमच्या बाजूनी बी भांडनारं हवं आता.
Saturday, 25 August 2018
उ'उवाच...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment