"काकू... सांगा बरं पटापटा कामं..आज लई उशीर झालाय. आज पान्याचा दिवस हाय..घरला पानी आलय, मी तर पानी आलेलं पाईलं पन तश्शीच भुर्रकन पळून आल्ये. सासू लई करवादती माजी. तिला वाट्ते की लगी पान्याच्या दिशी मी कुट्टच कामाला जाउ न्हाई. लगी पानी असेस्तोवर धुनंधानं करीतच बसावं. पानी तं लगी अडीच वाजेपत्तूर -हातया पन ह्यी म्हतारी लईच भुस्कट पाडीती. आता मला बी कामं हायत का न्हाय ? मला बी बाया बोलू बोलू घ्येत्यात. मला म्हन्ती कामाला नगं जात जाऊ पान्याच्या दिशी. ह्यिचा पोरगा देनारं हाय का मला खायला आनून ? ती माय बी तसलीच, त्यो सासरा बी तसलाच, त्यो भाया बी तसलाच आन मह्या नवरा तं सगळ्याचा अर्क हाय. सगळे पिऊ..पिऊ..घरला येतेत आन बसत्येत तमाशा करत. काल तं मह्या नवरा इतकं प्येऊन आलता की विचारुच नका लगी. लई प्येला, चिखलात पडला..कुनीतरी घरला पोचिवलं त्येला. मग लई दांगोडा क्येला त्यानं. मग लगी म्हतारी म्हनली सोडा आमची खोली, कुटं बी जा आन काय बी करा. रोजचा तुमचा तमाशा. आता कुटं जाऊ मी भाड्यानी रहाया. फुकटची खोली हाय तं कसंबसं भागतया. त्या थेरडीला काय झालयं म्हनायला घर सोडा म्हनून. आदी स्वताचं लेकरु बगना बये. धडाचं न गोडाचं. गळा कापला माजा. लई बेक्कार घरं हाये माजं काकू. सासू बी तशी नंदा बी तसल्याच. आले कुनी पावने की असं तोंड वाजिवत्यात मायलेकी की विचारु नका तुमी. आमच्या सूना अशा..तशा..बस्स, बोलतच जाती सासू. सोताची भैन,भाऊ आले की तं लगी वारंच शिरते तिच्या अंगात."
"..काकू तुमी माजे फोटो काडू -हायलात ?
(पदर सारखा करत) काकू..सर्व्या फोनमदी ते वाट्साप नसते का ? माज्या नव-यानी सात हजाराचा फोन घेतीला पन त्यात वॉट्सेप नाई वाट्ते. काकू..फोटू वॉट्सेपला नगा टाकू..नव-याला कळीलं तर हानेल मला धरुन. म्हनल कुटं जाती ? काय करीती ? कोन फोटू काढू -हायलं तुजे ? लय वाकडं चालीतो त्यो."
"काकू..तुमी राखीला इथंच हाईता ? मी चाल्ले माज्या आईकडं. खूप दिसात गेलेच न्हाई. लयी वात आला काकू सोंसाराचा. जातेच आता मायकडे दोन दिवस. रोजची कटकट काकू..मला तं कदी कदी असं वाट्ते लगी जीवच द्यावा. पन ल्येकरं आठवत्येत हो माजी.
ही म्हतारी अशी, त्यो म्हतारा पिक्कड, नवरा असा..बाप नाई मला, आईला बरेच नस्ते, लहानपनीच जळ्लेली बहीन आहे. आईला तिचाच फार घोर अस्ते. हिचं लगीन कसं व्हईल म्हनून. माजं बी असं. भान्डनारी सासू, मारकुटा-प्येनारा नवरा..ती तरी कुटं कुटं बगील ? बस्स आपल्ये नशीब म्हनायचं आन सोसायचं."
"काकू..झालं माजं काम, चाल्ले मी. "
No comments:
Post a Comment