Thursday, 16 August 2018

श्रावणसरी...

गेले दोनतीन वर्ष झाले मी एक माझ्यापुरता नियम केला आहे. आमचे पाध्ये कुटुंबीयांचे हितसंबंधी, बाबांचे मित्र, कार्यालयीन सहकारी, आईचे दुरचे नातलग, मैत्रीणी या लोकांपर्यंत पोहंचायचा. निदान वर्षातून एकदा तरी त्यांच्याशी संपर्क साधायचाच असा. आणि त्यासाठी मी श्रावण महिना बाजूला काढून ठेवला आहे. शक्यतो या व्यक्तींना भेटणे, घरी बोलावणे, त्यांच्या घरी जाणे नसता निदान फोनवर तरी बोलणे या गोष्टी मी श्रावणातच करते.
आईला अचानकपणे जाऊन फार वर्ष झाली. तिचं अपघाती मरण, आम्हीतर फार भांबावलो, पार ढेपाळलो. आमचं आम्हीच स्थिर होण्यात इतके गुंग होऊन गेलो की आईमुळे येणारे जरासे दुरचे नातलग, हितसंबंधी नाही म्हटलं तरी जरा दुरावलेच. मग माझ्यासारखाच उत्साही असलेला माझ्या पाठचा भाऊ पण काही वर्षांनंतर गेला, बाबाही गेले आणि मग एकूणच फार मोठे, जूने पण ह्रद्य कौटुंबिक पुल मोडीत निघत असल्याच माझ्या लक्षात आलं.
जी मंडळी माझ्या बालपणाचा, किशोरवयाचा भाग होती, ज्यांच्या काही आठवणींशिवाय माझ्या आठवणी पुर्ण होऊ शकणार नाहीत अशी कितीतरी मंडळी कुठेना कुठे होती. समवयस्क भेटले की आवर्जून आई-बाबा-भावाची आठवण काढणारी होती, काढत होती. तर या मंडळींना आमच्याशी जोडणारे दुवे जरी निखळले तरी आठवणी अजूनही लख्ख होत्या.
मग मी ठरवलंच की जमेल तेवढ्या या सगळ्या मंडळींना परत शोधायच, संपर्क साधायचा, परत भेटायचं आणि जमेल तेवढे संबंध परत दृढ करायचे. आणि त्यासाठी खास म्हणून मी श्रावण महिना निवडला.

तर दोनेक वर्षांपूर्वी आईच्या एका भाचीला म्हणजे माझ्या  ***ताईला परत शोधून काढलं. खरंतर एक दहा वर्षांपूर्वी तिने मला तिच्या मुलाच्या लग्नाची पत्रीका दिली होती पण रिसेप्शन नंतर पुढे काहीच संबंध माझ्याकडून ठेवल्या गेला नाही. तर त्या ताईला परत कॉन्टॅक्ट केला. दरम्यान अजून एक दुरचे नातलग शहरातच स्थाईक झाले असं कळलं. मग त्या मामी आणि ताई दोघींनाही श्रावणातच घरी बोलावलं. एकदा हिरण्यलाही भेटलो. आजी-आजोबा-आईच्या आठवणींचा कितीतरी साठा होता त्यांच्याकडे.
पुन्हा संवादसेतू बांधले गेले. भेटी ह्रदयंगम झाल्या.

तर त्या ताईला गेले काही महिने बरंच नव्हतं. एकदोनदा मी भेटूनही आले. पण एवढ्यात जरा तिला भेटायला जायचा मानस होता तर आज अचानक ती गेल्याचच मला कळलं. आजारी होतीच त्यामुळे सुटल्यासारखंच झालं असेल तिला. पण मला धक्काच बसला.

ती ताई माझ्या आजीच्या आजोळची. गंगाखेडची. तिचं आणि माझं एकदा तरी गंगाखेडला जायच ठरलं होतं. तिथलेही नातलग शालूची मुलगी येणार म्हणून कौतुकाने वाट पहात होते. पण अचानक हिचं आजारपण निघालं आणि सगळंच हुकलं.
माझ्या आईच्या लग्नाचा अंतरपाट माझ्या आईने कागदी फुलं आणि कळ्यांचा बनवला होता म्हणे. त्या अंतरपाटाचं इतकं कौतुक झालं होतं म्हणे त्याकाळी नांदेडात. ही कथा त्या ताईनेच सांगितली.
ऐकूनच थक्क झाले.
आणि या १८-१९ वर्षाच्या ताईला दाखवायला एकदा आमच्याकडे औरंगाबादला आणलं होतं. मुलगा बाबांचा चुलत भाचा. तर तेव्हा ती आमच्याकडेच उतरली होती.
बघायला येणा-या पाहुण्यांसाठी आम्ही बैठक खोली जमेल तशी ठिकठाक केलेली. तर या ताईला तयार करताना मी लोखंडी फोल्डिंग खुर्चीवर उभं राहून पॉन्डसची गुलबट पावडर लावल्याचं मला लख्ख आठवतय. साधीशी फिक्या रंगाची वॉयलची साडी, तसाच मैचिंग ब्लाउज, कानात सोन्याचे रिंग, गळ्यात साखळी, कुरळ्या केसांची सैलसर वेणी आणि देखण्या चेह-यावर सुरेख हसू..इतकी छान दिसायची ही ताई की माझ्या भावाने जेव्हा तिला नकार दिला तेव्हा आईला काय आमच्याही बालबुध्दीला आश्चर्यच वाटलं होतं. असो.
आजही पॉन्डस, का लैक्मेचा पुठ्ठ्याचा गुलबट पावडरचा चपटा गोल डबा आणि सैटीनचा पफ बघीतला की ही ताईचं आणि तिचं ते रुपच प्रकर्षाने आठवतं.
असो.
तर नेमकी ही ताई या श्रावणात भेटायच्या आधीच गेली.
जीवाला एक चुटपुट लागली.
दुरस्थ गणगोतांशी, नातलगांशी संवादसेतू बांधायचा आपला मानस आपण विनाविलंब आणि सातत्याने अमलात आणलाच पाहिजे याची प्रखर जाणीव या ताईच्या जाण्याने झाली.

No comments:

Post a Comment