Monday, 6 August 2018

उसकी कमीज...

हल्ली आम्ही दोघंच असल्यामुळे विकेंडचे दोन दिवस हिरण्यलाच रहातो. दोघंच असल्यामुळे घरातली कामही फारच माफक असतात हल्ली. कामवाल्यांना काही कामच नसतं हल्ली. त्यामुळे अतिरेकी गृहकृत्य दक्षतेने त्यांच्या मोबदल्याचा काटा रुततोच. तर दोनेक दिवसांपूर्वी एकीकडनं जुन्या सुटकेसेस सटीकपणे धुवून घेतल्या. दुसऱ्या बाथरुममध्ये तिने आमच्या बाथरुममधला रिन साबण नेऊन त्या सुटकेसेस धुतल्या आणि साबण तिथेच राहिला.
मला माझे रोजचे आणि नजाकती भरतकामाचे कपडे रोजच आंघोळीच्या वेळी स्वतःच धुवायची सवय आहे. (या गोष्टीच महत्व मला माझ्या उषाताई नावाच्या चुलत बहिणीने तत्वतः पटवून दिलं आहे. ते मलाही पटलं आहे आणि मी ते तहहयात अमलात आणते.
Come may what, स्वतःचे आतले कपडे तरी 'प्रत्येकाने' आपापलेच धुतले पाहिजेत या मताची मी आहे. बेसिक स्वावलंबनाचा तो धडाच आहे.
असो. तर आज नेमका तो रिन साबण दुसरीकडे राहिलेला. मग काय लक्सनेच कपडे धुतले.
मी कपडे शक्यतो हातानेच धुते. अगदी गरज वाटलीच तर ब्रश वापरते. तर सांगायचा मुद्दा.. आपण अतिरेकी स्वच्छतेच्यापायी आपले कपडे विनाकारण स्ट्रॉंग साबणानी धुवत असतो. आपली अशी मानसिकताच तयार करण्यात आली आहे की जेवढा जास्त स्ट्रॉंग साबण तेवढे कपडे जास्त स्वच्छ निघणार. मुळात वेल टु डू घरातल्यांचे कपडे असे किती मळत असतील हा अभ्यासाचाच विषय आहे. मळणं वेगळं आणि घामट होणं वेगळं. एकदा मुंबईतल्या एका जैन कापड व्यापाऱ्यांने त्यांच्या घरातले रोजचे आणि ठेवणीतले कपडे लाईफबॉय साबणानी धुतले जातात हे सांगितले होते. डिटर्जंटस् फक्त चादरी, पडदे, टॉवेल्स अशा कपड्यांना वापरला जातो त्यांच्याकडे. अशा सौम्य साबणांमुळे कपड्यांचा रंगही टिकतो आणि धागेही कमजोर होत नाहीत. अल्ट्रा, एक्सल अशा कडक पावडरींच तर नाव नको.
पण आपण टीव्हीमुळे जाहिरातींच्या इतके आहारी गेलो आहोत की घरोघर त-हेत-हेचे देशी-विदेशी साबणं-पावडर्स फक्त कपडे धुण्यासाठी म्हणून असतात. त्यात पुन्हा ते मल्टी लेव्हल मार्केटिंगवाले साबण म्हणजे तर विचारायलाच नको. अवाढव्य किमती आणि प्रत्येकच विविधप्रकारच्या सफाईसाठीचे (तेलकट, मातकट, घामट, रंगीत कपडे, पांढरे कपडे, कॉटन, सिंथेटिक, सिल्क, वुलन्स...) वेगवेगळे साबण. आणि वर स्वच्छता आणि बचतीची साळसूद सारवासारव. सगळंच हास्यास्पद वाटतं. घरातल्या यजमानिणीला कामवाली करायचे उद्योग आहेत हे. (With due and highest respect to physical workers) हे असले सोप्स वापरुन हातांवर रेशेस, एलर्जी आलेले कितीजणी तरी माझ्या परिचयाच्या आहेत. साबणांचा अतिरेकी वापराने आपले आरोग्यच काय कपडाही खराब होतो आणि पाणीही अवास्तवरित्या प्रदुषीत होतं.

No comments:

Post a Comment