Tuesday, 24 July 2018

लेह-लड्डाख ट्रिप..A

प्रवासाची खुमखुमी म्हणा आवड म्हणा जी काय असेल ती असली की प्रवासाचे बेत आखलेच जातात. कधी व्यस्त जीवनशैलीमुळे आराम करण्यासाठी तर कधी नवा प्रदेश, नवी संस्कृती जाणून घेण्यासाठी तर कधी आपली दुस-यांची ऐतिहासिक ठिकाणं, धार्मिक ठिकाणं, कलात्मक, नैसर्गिक वैशिष्ट्यांची ठिकाणं  आपण निवडतो आणि बघायला बाहेरही पडतो. त्या त्या वैशिष्ट्याची ठिकाणं त्या त्या वैशिष्ट्यांनी तर भावतातच पण तिथल्या लोकांशी संवाद साधला की, तिथलं राहणीमान अनुभवलं की आपला एक ह्रद्य ऋणानुबंध त्या ठिकाणाशी, तिथल्या माणसांशी निर्माण होतो. आणि बहुतांश वेळा अनेकता में एकता आणि एकता में अनेकता असा चांगलाच अनुभव येतो. त्यामुळे प्रसिद्ध ठिकाणांबरोबरच असे छोटे मोठे प्रसंग यादगार बनून जातात आणि आपला प्रवास अविस्मरणीय करतात.

लेह-लड्डाख ट्रिपचा असाच अनुभव आला. एखाद्या ऑर्गनाईझ्ड ग्रुप बरोबर जायचा पहिलाच प्रसंग त्यामुळे जरा धाकधूकच होती. कारण आम्हाला जरा मनमौजी फिरायचीच सवय आणि आवड आहे. पण मस्त ग्रुप जमला, ग्रुप लिडरही स्वतः रसिक फोटोग्राफर असल्यामुळे आऑफ बीट स्टॉपस् समजूतदारपणे बिनबोभाट झाले.

ग्रुपचं ट्युनिंग छान जमलं त्यामुळे हसी मजाकला तर अगदी उतच यायचा. तसेच ते मनाली पासूनचे ड्रायव्हर्स पण फार छान मिळाले. आमचा चालक रिक्की अतिशय अबोल, तर दुस-या गाडीचा चालक टुंडुप एकदम हरफनमौला. दिसेल त्याच्याशी कुठल्याही विषयावर गप्पा मारणारा. हिमालयीन टेरेनमधे लिलया गाडी चालवणा-या या तिबेटीयन युवकांना डोळे झाकून दहा पैकी दहा मार्क. तसेच ती हॉटेल्स मधे काम करणारी तरुण मंडळी, बाजारातील विक्रेते. आत्ता आत्ता तर कुठे लेह-लड्डाख कौटुंबिक ट्रिपसाठी नावारुपाला येतय. त्यात मिळतो फक्त तिन महिन्यांचा सिझन. जो तो पर्यटकांच्या सेवेसाठी तयार असतो. पडेल ते, सांगाल ते काम मोबदल्याची फारशी आशा न धरता हे लेहवासीय आनंदाने करतात. हिवाळ्यातल्या भयंकर थंडीत तिथे कसंबसं राहतानाही कुणालाही लेह सोडावसं वाटत नाही हे विशेष. आपणच जरा त्यांच्याकडे नाकी-डोळी वेगळे, वेगळ्या धर्माचे म्हणून पहातो. पण सर्व लेह-लड्डाखी छाती ठोकपणे हम इंडियन म्हणूनच सांगतात.
आलेल्या पर्यटकांच तर कौतूक असतच. त्यातही मुंबईवाल्या महाराष्ट्रातन आले म्हटल्यावर तर फारच कौतुक वाटतं त्यांना. लेह पासून श्रीनगरपर्यंत सगळ्या तरुणांना मुंबई आणि गोव्याच फार आकर्षण. आपण रोड ट्रिप काढून लड्डाखला जातो तर ते लोकं रोड ट्रिप काढून मुंबई-गोवा फिरतात. जे जवळ नसतं, जे बघायला मिळत नाही याचच माणसाला फार अप्रुप असतं नाही. आपल्याला बर्फाच्छादित डोंगरकड्यांच कवतिक तर त्यांना समुद्र लाटांच कवतिक.
एकुणच या चालकांशी गप्पा मारल्या की सामान्य जनजीवनाची बरीचशी ओळख होते.
श्रीनगरचे चालक एकजात मुस्लिम. बहुतेक कश्मीरी देखणेपण असलेले. अतिशय आदबशीर पण चतुराईचं बोलणं. कश्मीरची हवा मुंबईच्या फैशनसारखी आहे यावर सगळ्यांच एक मत. जो आज है वो कल नही और जो कल रहेगा वो परसो नही होगा. जरासे धार्मिकच असतात हे लोकं. दिवसातनं निदान दोन-तीनदा तरी नमाज पडणारच. श्रीनगरचं आमचं वास्तव्य जेमतेम १४-१५ तासाचं. तेही रात्रीचं. त्यात पाऊस. चिनाबला पुर यायची शक्यता. रेड अलर्ट केलेलं. त्यात एयरपोर्ट वरची कसून तपासणी. उगाचच इथे अस्थिर मात्र वाटलं.

No comments:

Post a Comment