Tuesday, 24 July 2018

लेह-लड्डाख ट्रिप...११

आर्यन व्हैली ते श्रीनगर.

सुंदर व्हैलीतली सुंदर पहाट अनुभवली. रुमच्या खिडकीत बसत, सिंधूचा अथक प्रवाह टिपत चहाचा आस्वाद घेतला. झटपट ब्रेकफास्ट घेतला आणि निघालो. पल्ला दुरचा होता आणि मधे कारगिल मेमोरियल पण बघायचे होते. परवेझ पण घाई करत होता. अमरनाथ यात्रेकरुंमुळे बरेचदा रस्ता ब्लॉक होतो म्हणून. त्यांचा तर हा नेहमीच्याच सरावाचा रस्ता आहे.

भरपावसात सामान गाडीवर चढवलं, प्लास्टिक लावून बंदोबस्त केला आणि आर्यन व्हैलीला टाटा करुन निघालो. पुढे लगेच वस्ती लागली. इतक्या आडबाजूला आणि धोकादायक ठिकाणची वस्ती बघून कमाल वाटली. कधीही ढासळू शकेल, पूर येऊ शकेल असा हा अस्थिर परिसर आहे. तरी माणसं चिवटपणे सुखनैव रहाताहेत.

पावसात भिजलेले गडद जांभळे-निळे पहाड, त्यात अडकलेले-पिंजलेले धवल ढग, अरुंद जागेतून खळखळ वाहणारी चहाच्या रंगाची सिंधू, दोन्ही बाजूंनी शुचिर्भूत हिरवी, ओली झाडी आणि गाडीत किशोरकुमारची मदमस्त गाणी..बस्स ! मौसम हो तो ऐसा हो, नजारा हो तो ऐसा हो.
वळणदार रस्त्यानी बाजू बदलली की वेगळंच सौंदर्य. विस्तीर्ण हिरवी कुरणं, त्यावर चरणा-या गब्दुल्या
बक-या, कुरणांवरचे कच्चे रस्ते, पत्र्यांची उतरती छपरं असलेली कश्मीरी घरं..श्रीनगर जवळ येतय याची चाहूल लावणारी ही घरं पहाडांच्या, कुरणांच्या कोंदणात फार छान दिसतात. इथेही हिमालयच आहे पण इथला हिमालय माणसाळलेला वाटतो. ईस्ट लड्डाखी सडाफटिंग लुक इथे अज्जिबातच नाही.

काही वेळातच द्रास इथले कारगिल वॉर मेमोरियल लागले. इथे स्टॉप होताच. भुरभुर सुरुच होती. श्रीनगरलाही चिनाबला पुर येण्याची शक्यता होती.
सिक्युरिटीमधून ऐंट्री घेतली. प्रशस्त जागेतलं, टायगर हिलच्या पुढ्यातलं कारगिल वॉर मेमोरियल देखणंच आहे. पाऊस असूनही गर्दी होती. परिसरात फिरलो. रणगाडे, बोफोर्स बंदुका पाहिल्या. माझ्या नव-या कडनं कारगिल लढाईत एग्झाक्टली काय झालं होतं ते समजून घेतलं. १९९८ ची ही लढाई-चकमक आहे. या काळात मी माझ्याच संसारात, अडचणीत नखशिखांत बुडलेली होते त्यामुळे मला फार काही या विषयी माहित नव्हतं. इथेच कारगिल युध्दाची चित्रफितही दाखवतात. तीही पाहिली. या जीवनापासून आपण कोसो दूर असतो त्यामुळे त्याचे चटके आपल्याला बसत नाहीत. पण या समोरच्या पहाडांच्या मागे शत्रुची पोस्ट आहे असं म्हटलं की किती धोका या लोकांना, आपल्याला, परिसराला, देशाला आहे हे कळतं. एकदोन मोमेंटोज विकत घेतले आणि जरा घाईतच श्रीनगरकडे निघालो.

याच वाटेवर जोझिला पास लागतो. आम्ही खारदुंगला पास पचवला होता त्यामुळे फारसं इथल्या उंचीकडे लक्ष दिलं नाही, अर्थात लक्षात यायला या उंचीवर थांबलो देखील नाही. पण भर झिमझिम पावसात इथल्या चढावाच्या रस्त्यावर गाडी चालवणं म्हणजे खरोखरच एक दिव्य आहे. अति उंचावरचे हे रस्ते इतके अरुंद आहेत की एखादी गाडी बाजूच्या पहाडाला घासत कशी नाही याचच आश्चर्य वाटतं. सगळा हिमालयच फार ठिसूळ आहे पण इथला ठिसूळपणा पोटात खड्डा पाडतो. रस्ते वळणदार, खचलेले, एका बाजूला खोल दरी, दुस-या बाजूला कधीही ढासळणारा पहाड. अक्षरशः आपल्या बीआरओला डोळ्यात तेल घालून इथल्या रस्त्यावर लक्ष ठेवावं लागत असेल. लड्डाखच्या मानाने इथे वर्दळही फार आहे. खालच्या दरीत तर अमरनाथ यात्रेकरुंच्या हजारोंनी राहुट्या दिसतात. केवढा ताण आहे इथला रस्त्यांवर आणि सुव्यवस्थेवर. इथला निसर्ग उरात धडकी भरवतो. पण तरबेज चालक शिताफीने गाडी हाकत आपल्याला आश्वस्त करतात. जोझिला उतरला की व्हैलीतला रस्ता खूप निसर्गरम्य आहे. इथेच सोनामर्ग आहे. इथल्या जमिनीत सोनं आहे म्हणून याला सोनामर्ग म्हणतात म्हणे. चहासाठी थांबलो. मुंबई-पुणे वाटेवरच्या सारखंच रेस्टॉरंट, तसाच कलकलाट, कचकच, गर्दी.
कुठून इथे आलो असं झालं. मती गुंग झाली. टुकार चहा प्यायलो आणि निघालो.

आता पुर्णतः कश्मीर सुरु झालेलं. मुस्लिमांच प्राबल्य अर्थातच आहे. वुलनचे अंगभरचे चौकडीचे रोब्ज(या कोटाला विशिष्ट नाव आहे) घातलेले दाढीधारी, देखणे, गोरे, उंचेले, सडसडीत कश्मीरी माणसं पेंटिंगसाठी छान विषय आहेत.
श्रीनगरला पोहेंचेतो रात्र झालेली. शहरासारखं शहर. त्यात रात्र, त्यात आणिक पाऊस. एका अगदी बेतासबात असलेल्या हॉटेलमधे उतरलो. कुरकुर करण्यात अर्थ नव्हता. प्रश्न फक्त एका रात्रीचा होता. कालची आर्यन व्हैली आठवत चार घास पोटात ढकलले आणि झोपून गेलो.

दुपारची साडेबाराची दिल्ली फ्लाईट होती. झटपट आवरलं आणि हॉटेल आणि परवेझच्या सल्ल्याने तमाम महिला शॉपिंगला एका ठिकाणी गेलो. आम्ही टुरिस्ट गावातले असल्यामुळे असली सेटिंग्ज आम्हाला माहित असतात. पण वेळ कमी आणि ग्रुप सायकॉलॉजी. धडाधडा गेलो. भराभर थोडीफार खरेदी करत नाही तर तमाम नव-यांची कुमक आलीच आम्हाला उचलायला.
परत सामानाची उचलाउचली केली आणि विमानतळाकडे निघालो.

आमच्या या वर्षीच्या अभिजात महाराष्ट्र या एक मे निमित्तच्या कार्यक्रमातले कश्मीरी कलावंत गुलामजी आम्हाला भेटायला खास श्रीनगरमधे आले होते. त्यांनाही वाटेतच पाच मिनिटं भेटायचं होतं. फोनाफोनी करुन वाटेतच दोन मिनिटं भेटलो. आम्ही इथे अजून चार दिवस थांबणार होतो. पण एकूणच परिस्थितीचा अंदाज घेत बेत कैन्सल केला. कैन्सल केला ते एका परीने बरचं झालं. पावसामुळे सगळीकडचेच धोके वाढले होते. पण त्यामुळे झालं काय की न थांबण्यामुळे झालेली गुलामजींची नाराजी कमी झाली. त्यांनी अगदी कौतुकाने आमच्यासाठी आक्रोड आणले. पुढच्या वर्षी परत कश्मीरला यायचा वायदा केला, एक सेल्फी मी घेतला आणि त्यांचा निरोप घेतला.
श्रीनगरला जाऊनही, राहुनही दललेक न पाहता येणारे आम्हीच मावळे 'the great' असू.

श्रीनगर एयरपोर्ट तसं लहानच आहे पण सिक्युरिटी मात्र तगडी आहे. इथेच मला माझा सिंधू नदीतला दगड लगेजमधून काढून टाकावाच लागला. फ्लास्कसही उघडून दाखवावेच लागले. एकूणच वैताग आला. कालचा दिवस आणि आजचा दिवस यात अमुलाग्र बदल होता.
विमनस्कपणे सवयीने लोकांच निरिक्षण करत बसले. कश्मीरी लोकांमधेही किती विविध वंशाचा संकर आहे नाही. जवळपास सगळेच गोरे आणि देखणे असले तरी एकेकाचे फिचर्स फार वेगळे आहेत. You can make out the difference.
एकसारखं टोंगळ्यासारखं टक्कल असलेले, मध्यमबांध्याचे, जबरदस्त सफरचंदी गोरा रंग असलेले, बसक्या बोंडूल्या नाकाचे आणि निडर डोळे असलेल्या फिचर्सचे चार-पाच जणं दिसले. अगदी सख्खे भाऊ वाटावेत इतकं साम्य प्रत्येकाच्या दिसण्यात. लालबुंद गोरेपण सोडल्यास कश्मीरी सौंदर्याचा लवलेशही नसलेले ही माणसं. कुठे पाहिलंय, कुणाला पाहिलंय ? आठव..आठव..आठवतीये.
काही केल्या आठवेना. समोरचा त्रस्त होईल इतकं समोरच्याला टक लावून पहायची मला फार आर्टिस्टीक(?) सवय आहे. नव-याने डोळ्यानेच फटकारलं. तरी नजर हटेना..नाव काही आठवेना. बैचेन झाले. मला तर ही मंगोल रेसचीच वंशावळ वाटली. कालही जेवताना असाच एकजण दिसला होता. Very unique and identical features they all are having.
कश्मीरी पंडीत तर नसावेत ? पण कश्मीरी पंडीत नाकी-डोळी सुरेख असतात. हे वेगळेच आहेत. कोण असावेत बरं. आता आठवू तरी किती ?
हां..आठवलं. आपले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान श्री. नवाझ शरिफ डिट्टो असेच दिसतात. आयला खरंच की !कुठल्या प्रांतातले हे लोकं असावेत बरं ? किती एकसारखे दिसतात. ओरिजीनल रेस कुठली असेल बरं यांची ?
बरं झालं डोक्याला एक खुराक मिळाला आणि काल रात्रीपासूनच्या वैतागावर एक रामबाणी उतारा झाला.

विमानात बसलो, विमान उडालं. खिडकीजवळची जागा मिळाली. उंचावरून दिसणारे खालचे हिमाच्छादित पहाड विहंगम दिसत होते. या विलोभनीय निसर्गरुपाचं जमीनीवरच खडतर रुपही या ट्रिपच्या निमित्ताने पाहून झालं होतं. पुन्हा एकदा दुरुन डोंगर साजरे या म्हणीचा खणखणीत प्रत्यय आला होता.

ट्रिप संपली म्हणून हुरहूर असली तरी आता प्रत्येकाला घराचीही ओढ लागली होती.
का आपण पर्यटन करतो ?
या प्रश्नाची उत्तरं अगदी प्रत्येकाची वेळोवेळी वेगवेगळी असू शकतात.
आणि ह्याच वेगळेपणाचं अफाट कुतूहल आपल्याला पर्यटनोत्सुक बनायला भाग पाडत असावं.
घरात असलं की बाहेरची ओढ. बाहेर पडलं की घराची ओढ. एक सततचा तळ्यात-मळ्यातचा खेळ आपण खेळत असतो.
तळं काय मळा काय, दोन्ही घटकाभरचे सोबती.
पण खेळ खेळत रहाण्याची असोशी मात्र असीम आहे.

No comments:

Post a Comment