लेह ते बिमा..आर्यन व्हैली.
पहाटेसच उठलो. नेहमीप्रमाणे कॉरिडॉरमधले सगळे लाईट बंद करत मी खाली आले. चहा घेतला. स्टेन्झिंगने थर्माकोल वापरुन फ्लास्कस् व्यवस्थितच पैक करुन दिले होते. कोणी तरी त्याला याकचं शिंग दिलं होतं. घेऊन जा म्हणाला. मोह तर पडलाच होता. पण बांधलेलं सामान बघून आणि श्रीनगरच्या संभाव्य टाईट सिक्युरिटीबद्दल ऐकल्यानंतर जरा डगमगलेच. परत वाईल्ड लाईफच्या ऍक्टचाही धाक होताच. सारासार विचार करत शिंग तिथेच ठेवलं. ट्रिप संपत आल्याच्या हुरहुरीत सगळ्यांनी ब्रेकफास्ट आवरला. आल्यापासून आमच्या दिमतीला असणाऱ्या हॉटेलमधल्या या तरुण पोरांना हिरण्यला कामासाठी, अजिंठा-वेरुळ बघण्यासाठीच आमंत्रण दिलं, सगळ्यांबरोबर एक छान फोटो घेतला आणि हुरहुरत लेह सोडलं. आज पावसाचा रंग आहे. आम्ही दोघं श्रीनगरला चार दिवस रहाणार होतो. रबाब वादक गुलामजींचाही खूप आग्रह होता त्यांच्याकडे येण्याचा. पण आम्ही आता थकलो होतो प्रवास करुन आणि पहाड बघूनही. उगाचच श्रीनगरवर अन्याय झाला असता. परत श्रीनगरही अशांत झालंच होतं. सगळा विचार करुन श्रीनगरला रहायचा बेत रद्द केला.
कालपासून आमच्या गाड्या आणि ड्रायव्हर्स बदलले. श्रीनगरच्या गाड्या आणि कश्मीरी ड्रायव्हर्स. दिसायला देखणे, बोलणं अदबशीर. गाड्या चकाचक.
सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघालो. परत कधी येऊ आपण इथे असा बालसुलभ प्रश्न पडलाच. किती पाहू आणि किती नको असं करत डोळे भिरभिरताहेत. हे लेह काही काळासाठी आमचं उबदार घर झालं होतं. सोडताना पावलं जड होणारच.
नभं उतरु आलेलं, आसमंत झाकोळलेला, भिजलेलं निवांत लेह मागे पडतय. सगळेच गुमसुम झालेले. आणि परवेझ ड्रायव्हरने गाडीत गाणी लावली.
पहिलीच ट्युन आणि मनावर त्या संगीताने जादू केली.
ये शाम..फिर नही आयेगी..कुछ ना कहां तो, कुछ ना सुना तो..युंही ढल जायेगी..ये शाम...
शब्दात अफाट जादू, आवाजात रोमांचित करणारी मोहिनी...
गाण्याने मनाची जबरदस्त पकड घेतली. नुसरत फतेह अलींनी गायलेलं हे गाणं मी पहिल्यांदाच ऐकलं आणि अक्षरशः वेडावून गेले. खर्जातला आवाज..सहजसुंदर शब्द, मनावर मोहिनी टाकणारं संगीत..लेह सोडतानाची मनाची घालमेल, बाहेरच रुमानी वातावरण...बस्स ! Nothing can be more sentimental at this moment.
🌧️ये शाम..फिर नही आयेगी..
ये शाम.. फिर नही आयेगी
कुछ ना कहां तो कुछ ना सुना तो युंही ढल जायेगी
ये शाम.....
आजही करलो दिलकी बात कल पछताओगे
आज अगर तुम पास ना आये फिर कब आओगे
ये पल बीत गया तो जानम कहां जाओगे
तनहाई का दर्द कभी तुम सह ना पाओगे
ये शाम...ये शाम..फिर नही आयेगी..
कुछ ना कहां तो कुछ ना सुना तो युंही ढल जायेगी
ये शाम.....
पुन्हापुन्हा गाणं ऐकलं तरी समाधान होईना. तनामनाचं सगळं लक्ष खेचून घेण्याची जादू त्या आवाजात होती.
ये..शाम..फिर नही आयेगीच्या संमोहनात अक्षरशः हुरहुर लावणारं लेह कधी मागे पडलं कळलंच नाही.
जीवाच अगदी फुलपाखरु करायची ताकद या गाण्यात आहे. त्यात हे चारचांद लावणारं लेहचं ओलेतं सौंदर्य.
Just unforgettable moment.
एखाद्या स्वप्नातल्या सारखी गाडी अलगद वळणावळणांनी खाली उतरत आहे..ढगांची पहाडांशी लटकी छेडाछेडी चालू आहे..पाऊस त्यात आणिक भर घालत आहे...आणि गाडीत नुसरतजी जिव्हारी लागेलसं गाताहेत.
♥️दिलरुबा ओ मेरे दिलरुबा क्या किया ये तुमने क्या किया
दिल मेरा क्युं कहां खो गया पल में क्युं तेराही हो गया.
जाने क्या नशा है तेरी आखोंमे
जादू सा भरा है तेरी बातों में
सांसे तेरी महेकी मेरी सांसो में
तेरीही झलक मेरे ख्वाबों में
तेरे सिवा है क्या दुनिया में मेरी जान
तु है मेरी जिंदगी पास आ..
ये शाम..फिर नही आयेगी..
ये शाम..फिर नही आयेगी
कुछ ना कहां तो कुछ ना सुना तो युंही ढल जायेगी
ये शाम...
रस्त्यातच जाताना पत्थरसाहिब गुरुद्वारा पाहिला. गुरु नानकांनी लेहला भेट दिल्याच्या आठवणी प्रित्यर्थ एक छोटेखानी गुरुद्वारा आहे पहाडांच्या कुशीत. पाऊस आणि जोडीला थंडी. वातावरणात एक सुखद नमी. जवळचच मॅग्नेटिक हिल नावाचा प्रकार होता. पण कुठलच चुंबकत्व तिथे जाणवलं नाही. मुळात लेहचा वियोग आणि नुसरतजींच्या ये शाम..ने माझ्यावर एवढा परिणाम केला की या भेटी माझ्यासाठी नाममात्र महत्वाच्या ठरल्या.
पुढचा थांबा जिथे सिंधू आणि झंस्कारचा संगम होतो तिथल्या निमू इथला. उंचावरच ठिकाण त्यामुळे दोन्ही नद्यांचा खालचा संगम विलोभनीय दिसतोय. एमेराल्ड ग्रीन कलरची संयत सिंधू तर तिला रेटत रोंरावत वाहणारी गढूळ पाण्याची झंस्कार. अतिशय विहंगम दृश्य. दोन्ही नद्या आपापल्या रंगरुपानी, स्वभाव वैशिष्ट्याने मोहवून टाकणा-या. पात्राजवळ उतरलो. इथे झंस्कारमधे रिव्हर राफ्टिंगची सोय आहे. आमच्या ग्रुपचं शायोकमधे ऑलरेडी एकदा राफ्टिंग करुन झालं होतं आणि वेळही हातात नव्हता. वाहत्या पाण्याकडे कितीही वेळ बघत बसा वेळ कसा जातो कळतच नाही. परत फोटो सेशन झाले आणि आम्ही दोघ रेस्टॉरंटमधे चहा घ्यायला गेलो. इथे कश्मीरी पेय काहवा पण मिळत होता. मग काहवाच घेतला. इतक्या सुरेख वासाचा, चवीचा काहवा पहिल्यांदाच चाखला. तबियत खूष हुवी. निघालो आणि श्रीनगरच्या रस्त्याला लागलो.
लेह ते श्रीनगर हे अंतर ४२५ किलोमीटरच आहे. ब्रेक जर्नी कधीही चांगलाच. पहाडांमुळे इथले रस्ते कुठे मार्ग आणि पहाड बदलतात कळतच नाही.
ये शाम..च्या अनेक आवर्तनानंतर परिसरात बदल जाणवू लागला. थोडीफार शहरी सुखवस्तू हिरवाई दिसू लागली. पहाड जरा दुरावले. मधल्या कुरणांवर बक-या, एखादं माणूस दिसू लागला. निर्मनुष्य लड्डाखच्या पार्श्वभूमीवर हा बदल लगेच जाणवला. नुकत्याच झालेल्या पावसामुळे शुचिर्भूत हिरव्यागार झाडीतून जाणारे रस्ते, तपकिरी पहाडांवर रेंगाळणारे शुभ्र ढग, गाडीतली मदमस्त गाणी..Romantic mood was at its best.
🌈आज हम ऐ सनम आज हम
भुल कर दुनिया के रंज-ओ-गम
ये कसम कसम है प्यार की
साथ हो साथ हो हर कदम
युंही तेरी आंखो में यह आंखे हो
छोटी छोटी प्यार भरी बाते हो
भिगी भिगी रंग भरी शामें हो
जागी जागी राते तेरी यादे हो
तेरे सिवा है क्या दुनिया में मेरी जान
तु है मेरी जिंदगी पास आ..
ये शाम..फिर नही आयेगी..
ये शाम..फिर नही आयेगी
कुछ ना कहां तो कुछ ना सुना तो युंही ढल जायेगी
ये शाम...
शाळेत निघालेले, कामावर निघालेले लड्डाखी माणसं, मुलं बघून बरं वाटलं. एकुणच प्रवास सुखद होत होता. आमचा आजचा मुक्काम आर्यन व्हैलीत होणार होता. या व्हैलीतील लोकं स्वतःला आर्यांचे ओरिजीनल वंशज समजतात. यांची जीवनपद्धती, राहणीमानही जरा तिबेटीयन्स पेक्षा वेगळं आहे म्हणे. त्यांना बघायचीही फार उत्सुकता होती. ईस्ट लड्डाख पेक्षा इथे बरच नागरिकरण झालेलं आहे त्यामुळे अधूनमधून गोम्पाज, शाळा, फुटकळ दुकानं दिसली की दिलासाच मिळतो. रस्ता मात्र तसाच खडतर आहे. त्यात मधूनच पाऊस पण इथले ड्रायव्हर्स म्हणजे खरच यांना तोड नाही. हसत-खेळत लिलया सगळी आडवळणं पार करतात. केसाला धक्का लागत नाही आपल्या. खाचखळग्यांचा रस्ता, डाव्याहाताला खाली रोंरावणारी सिंधू, उजवीकडे कधीही ढासळायला तयार असणारा हिमालय आणि वरुन पावसाची रिपरिप. तरी पण सुखरूपपणे आर्यन व्हैलीतल्या बीमा इथल्या एका गेस्ट हाऊसमध्ये पोहोंचलो.
अप्रतिम असं गेस्ट हाऊसच लोकेशन. समोरच्या अगदी पंचवीस फुटांवरन त्वेषाने वाहणारी सिंधू आणि पाठच्या पंचवीस फुटांवर महाकाय पहाड. रुम्सवर सामान टाकलं आणि लगेच वॉकला बाहेर पडलो. नदीपात्रात महाकाय शिळा आणि त्या शिळांवरन धुंवाधार वाहणारी सिंधू. अशा प्रलयकारी पाण्यावर नजर ठरत नाही. जरा पुढे गेलो आणि नदीवरचा पण खोलातला पुल लागला. दुस-या किनारी घरं दिसताहेत. या अशा पुलांनी अख्ख्या ट्रिपमधे वेड लावलं होतं. कितीतरी फोटो अशा पुलांचेच घेतले आहेत. अंदाज घेत खाली उतरलोच पुलापाशी. मग पुलावरती झक्कास फोटोसेशन केलं. रोंरावणारी, काळजात धडकी भरवणारी सिंधू अजूनच जवळून पाहिली.
पहाडांच्या कोंदणातली ही दरी..दरीतून तुफान खळाळती सिंधू..सिंधूवरचा इटुकला पूल..आणि पूलावरती आम्ही..मी..
आपलेच मराठी मावळे.
One of the best experience of this trip.
कुणीतरी हेलिकॉप्टरमधून आमचा हा आयकॉनीक फोटो काढायलाच पाहिजे होता.
🎵आजही करलो दिलकी बात कल पछताओगे
आज अगर तुम पास ना आये फिर कब आओगे
ये पल बीत गया तो जानम कहां जाओगे
तनहाई का दर्द कभी तुम सह ना पाओगे
ये शाम.. फिर नही आयेगी..ये शाम.....
परतलो. गप्पांना ऊत आलेला. गेस्ट हाऊससुध्दा एकदम टकाटक होतं. मऊ फुलक्यांसह गरमागरम चौरस जेवण मिळालं. नजर आणि मन तृप्त करणारं हे ठिकाण आहे. रात्रीच्या चिडीचुप वातावरणात हिमालय उशाशी घेत आणि अक्षरशः सिंधूच्या रोंरावण्याचं अंगाई गीत ऐकतच सुखासीन निद्रेच्या अधीन झालो.
No comments:
Post a Comment