त्सो मोरीरी ते लेह.
कितीही थकलेलो असलो आणि गारठा असला तरी पहाटेच जाग येते इथे. इथली रहाण्याची जागा जरा अडचणीची आणि घळीतली आहे. त्यामुळे पहाटेचं मोरीरीचं दर्शन काही लक्षात ठेवण्या जोगं झालं नाही.
परत पिण्याचे गरम पाणी-चहाच रुटीन. निघायची तयारी. एकदोघांना सफोकेशन झाल्यामुळे ऑक्सिजन घ्यावा लागला. माझ्यामते हाय एल्टिट्युड पेक्षाही कडेकोट बंदिस्त तंबू आणि गलेलठ्ठ ब्लैंकेटस मुळे सफोकेशनचा त्रास जास्त झाला असावा. पण थंडीसाठी इतका कडेकोट बंदोबस्त आवश्यकच आहे. जेमतेम अर्ध बकेट गरमपाणी तोंड धुवायला मिळालं. तिथे काम करणाऱ्या मुलांकडनं इतक्या थंडीत आणि दमछाक वातावरणात गरमपाण्याचं अर्ध बकेटही आणून घेणही गुन्हा वाटत होता. तरी सगळी मुलं हसतमुखाने, न कंटाळता काम करतात.
आंघोळ हा शब्दही इथे चार-चार दिवस उच्चारला जात नाही. तरी उन्हाळा आहे सध्या. हिवाळ्यात तर आठ-दहा दिवसातन एकदाच आंघोळ करतात इथली लोकं.
साधारण पर्यटनाच्या चलतीच्या सिझनमधे पर्यटन स्थळी महागाई असते. आणि स्लॅक सिझनमधे स्वस्ताई असते. इथे हवामानामुळे उलट परिस्थिती आहे. उन्हाळ्यामुळे जरा तरी सोई मिळतात त्याही माफक किमतीत. हिवाळ्यात तर वाट्टेल तेवढी किंमत दिली तरी गरमपाणी, थांब्यावरचं डिझेल-पेट्रोल अतिशय दुरापास्त होतं.
निघालो. परत एकदा हिमालयीन तलावाची निळाई डोळेभरुन पाहून घेतली. परत इकडे येऊ न येऊ. त्सो मोरीरी अगदी दिसेनासा होईपर्यंत फोटो काढले. चुकार सुर्यकिरणात उजळून निघणारे निळाईचे सप्तरंग डोळ्यात, मनात भरुन घेतले आणि निघालो. एवढ्यात मला पांढरट हिरवं फुलपाखरु तलावावर उडताना दिसलं. हिमालयात दिसलेलं पहिलं फुलपाखरू. थोडं पुढे जात नाही तो काल संध्याकाळी पाण्यात विहरणारं बदकांचा कुटुंब काबीला मनमस्त पोहताना दिसला. माणसांप्रमाणे प्राणी-पक्ष्यांचही भाग्य असतं नाही ?
परत नोमेडिक वसाहत लागली. वाळवणाची उन्हाळी कामं सुरु आहेत. घरांवर उन्हात (?) गोव-या वाळत घातल्या आहेत. आपल्या गोधडीसारखं याकचं कातडही इथे वाळवताना दिसलं. नोमेडिक लोकं याकच मास खातात. मला याकच्या दुधाचं पनीर चाखायचं होतं, पण त्यासाठी अशा ठिकाणी वेळ ठेवून फिरायला पाहिजे. नोमेडिक लाईफस्टाईल जाणून घ्यायला असा विचार करायला हरकत नाही. सध्या फक्त दुरुनच दर्शन घेणं सुरु आहे. परत जुनाच आर्मी पोस्ट लागला, सिंधूवरचा पूल लागला आणि आम्ही डावीकडून लेहचा रस्ता पकडला. उताराचा रस्ता. डाव्याहाताला विस्तीर्ण पण कोरड्या पात्रात वाहणारी हिरवी सिंधू..बाजूला वाळूमधली हिरवी-पिवळी कुरणं..त्यावर चरणारी स्वच्छ, देखणे गाढवं-घोडे.. मधूनच थोडी उंचशी झाडी..मधूनच भरारी घेणारा एखादा पक्षी..आणि चहूबाजूंनी तपकिरी डोंगरांची महिरप..त्यातून अतोनात ओघळलेली वाळू, रेती, दगड..एक सुरेख निसर्गदृश्य..सिंधूकाठचं. पुढे एका ठिकाणी सिंधूकिना-यावरच वाफाळत्या गरमपाण्याचे झरे आहेत. पाण्यात हात घालणं अशक्यच होतं पण वाफेच्या शेकापासून दूर व्हावसं वाटत नव्हतं. वॉशरुमचा परत एकदा आनंदी आनंद.
आमची टूर ऑर्गनाइझ करणाऱ्या हर्षद बर्वेंना मी आधीच सांगून ठेवलं होतं कि काही झालं तरी मला सिंधूत पाय बुडवायचेच आहेत म्हणून. तो सहज स्पॉट लगेच आला. अगदी रस्त्या लगत सिंधू...शांत-संयत हिरवा रंग गमावत, फेसाळत खळखळ वहाणारी. काठावर गुळगुळीत गोलाकार गोटे. सगळेच उतरले.
गारीगार फेसाळत्या सिंधूत पाय बुडवताना अक्षरशः शहारले. एक स्वप्न पुर्ण झालं. मला आजपर्यंत कधीही गंगेची आस लागली नव्हती पण या सिंधूने मात्र कधीचं काळजात घर केलं होतं. कलेच्या इतिहासात सिंधू संस्कृती अभ्यासली होतीच. आणि जसं कळू लागलंय तसं ही भारतात उगम पावणारी, आपल्या नावानी भारताला जगदविख्यात करणारी सिंधू नदी आपली जरी असली तरी आता राजकीय खेळीमुळे प्रामुख्याने पाकिस्तानची नदी झालेली आहे याची एक खोल बोच मनात होतीच आणि आहेही. फाळणीच्या जखमा उरापोटी बाळगत, हिमालयातल्या कडेकपारीतनं वाहणारी आणि पुढे परकी होणारी ही सिंधू म्हणजे भारताच्या भाळीची एक चिरंजीव वाहती जखम आहे.
How somebody can disown their mother river ? Anything is possible in this wicked politics.
एज युज्वल फोटोंच एक दमदार सेशन पार पडलं. इथला एक तरी दगड मला न्यायचाच होता. छोटे-मोठे एकसारखे करडे गोटे. शतकानुशतकांच्या प्रवाहामुळे गोलाकार झालेले. वजनाच्या धाकाने एक छोटाच दगड उचलला. या वर झकास पैकी मेरा भारत महान असं लिहावं. आयडिया पटली. दगड उचलला. निघालो.
पुढच्या प्रवासात जवळजवळ आलेल्या पहाडांच्या रांगा लागल्या. सिंधूही अरुंद होत शांतपणे वहाणारी. भल्यामोठ्या दगडी शीळांचे पहाड. त्यातल्या अंतर्गत घळीत आर्मीची ऐसपैस ठाणं. रस्त्यांची कामं जोमात सुरु आहेत. Seems to be an ambitious project.
फोटोंचा मोह टाळत सगळं फक्त नजरेनी टिपलं. आणि थोड्याच वेळात उपशी हे गाव आलं. मनालीहून लेहला येताना देखील हेच गाव लागलं होतं. चौरस्त्यावरचं महत्वाचं ठिकाण. तिथेच पराठ्यांच जेवण केलं आणि लेहकडे रुमच्या उबदार ओढीने मार्गस्थ झालो.
No comments:
Post a Comment